प्रत्येक वस्तू कोणी तरी अभिकल्पित करत असते. अन्योन्यक्रिया असलेल्या या ‘धुक्यातल्या वस्तू’ संकल्पित करू शकणाऱ्या, त्या वस्तूचे रूप, त्यातील आशय आणि तिचे वर्तन यांमध्ये सुसंगती घडवून आणण्याचे काम करणाऱ्या लोकांना अन्योन्यक्रिया अभिकल्पक (इंटरॅक्शन डिझाइनर) म्हणतात. त्यांच्यासमोरील आव्हानांचा हा आढावा..
अलीकडच्या काळात माहिती तंत्रज्ञानामध्ये झपाटय़ाने प्रगती झाली आहे. हा हा म्हणता अनेक बदल आपल्या डोळ्यांसमोर होत गेले- नव्हे, होत आहेत. आयडीसीत येणारे अनेक तरुण अभिकल्पक माहिती तंत्रज्ञानामुळे होऊ घातलेल्या या प्रगतीने प्रभावित होतात. त्यातील काही जण या तंत्रज्ञानाचा लाभ भारतीय लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता नवनवीन कल्पना बनवतात. अमिशा बनकर ही आमची विद्याíथनी त्यापकीच एक. २००५ साली तिने फुले पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक अभिकल्प केला. प्रकल्पाची सुरुवात तिने मुंबईतील दादर स्टेशनाबाहेर केली. तिथे रोज सकाळी फुलांचा बाजार भरतो. फुले विकण्यासाठी तिथे येणाऱ्या शेतकऱ्यांबरोबर तिने हितगुज केले. त्यांच्याबरोबर ती त्यांच्या घरी, त्यांच्या शेतात गेली. त्यांची दिनचर्या तिने बारकाईने पाहिली. शेतकरी फुलांची तोडणी संध्याकाळी करतात. रातोरात ती फुले बांधून रात्रीच्या गाडीने पहाटे चार वाजता दादरला पोहोचतात. बाजार पाच वाजता सुरू होतो व सात वाजता संपतो. नेहमीप्रमाणे बाजारात गिऱ्हाईकांची आणि शेतकऱ्यांची घासाघीस चालते. अमिशाने पाहिले की सुरुवातीला बाजारभाव स्थिर राहतो पण अवघ्या तासा-दीड तासात भाव झपाटय़ाने घसरू लागतो. साडेपाच वाजता ज्या भावाला शेतकरी माल विकायला तयार नसतो, तोच शेतकरी, तीच फुले साडेसहाला त्याच्या निम्म्या भावातदेखील विकायला तयार होऊन जातो. याचे कारण सोपे आहे. फुले नाशवंत असतात. सात वाजेपर्यंत जर ती विकली गेली नाहीत, तर ती फुले आहेत तिथेच टाकून त्याला घरी जावे लागते.
फुलांच्या शेतकऱ्यांना आणि गिऱ्हाईकांना इंटरनेटवर खरेदी-विक्री करता येण्यासाठी अमिशाने एक संकेतस्थळ (वेबसाइट) बनवले. या लेखमालेच्या पहिल्या लेखात मी म्हटले होते की, अन्योन्यक्रिया (इंटरॅक्शन) असलेल्या अशा वस्तूंची रूपे ही सतत बदलणारी असतात. आपण जेव्हा या वस्तू वापरतो, तेव्हा आपल्या प्रत्येक स्पर्शाला त्या प्रतिसाद देतात. त्या प्रतिसादांना आपण त्याचे वर्तन (बिहेविअर) म्हणालो. वस्तूचे रूप, त्यातील माहिती आणि तिचे वर्तन यांमध्ये सुसंगती साधणे, म्हणजेच अन्योन्यक्रिया अभिकल्प. अमिशाने बनवलेल्या संकेतस्थळात शेतकऱ्यांना व गिऱ्हाइकांना लागणारा आशय होता. त्या आशयाला तिने एक विशिष्ट रूपदेखील दिले होते. पण त्याव्यतिरिक्त तिने त्या संकेतस्थळाला जे वर्तन दिले ते महत्त्वाचे. शेतकरी फुलांची तोडणी आधी करतात, मग त्याचे परिवहन करतात, शेवटी घासाघीस करून त्यांची विक्री करतात. त्यामुळेच त्यांना वाटाघाटीला फारसा वाव मिळत नसे. तेच जर त्यांनी आधी वाटाघाटी केल्या, भाव ठरल्यावर मग तोडणी केली व शेवटी परिवहन केले, तर त्यांना जास्त योग्य भाव मिळू शकेल असे अमिशाचे म्हणणे होते. २००५ साली हे संकेतस्थळ एक शैक्षणिक प्रकल्प म्हणून तिने संकल्पित केले खरे, पण ते तेव्हा वास्तवात येऊ शकले नाही. आज मात्र ते वास्तवात आणणे शक्य आहे.
रोज आपण अनेक अन्योन्यसक्रिय वस्तू वापरतो- संगणक, मोबाइल फोन, त्यावरील अनुप्रयोग (अ‍ॅप), इंटरनेटवरील विकिपीडियासारखे प्रचंड ज्ञानकोश, गुगल, याहूसारखी शोधइंजिने, ई-मेल, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि इतर सामाजिक माध्यमे, एटीएम, नेटबँकिंग, बस, रेल्वे आणि विमानांची तिकिटे, पुस्तकांपासून ते कपडय़ांपर्यंत खरेदी करण्यासाठी ई-कॉमर्स संकेतस्थळे. ही प्रत्येक वस्तू कोणी तरी अभिकल्पित करत असते. अन्योन्यक्रिया असलेल्या या ‘धुक्यातल्या वस्तू’ संकल्पित करू शकणाऱ्या, त्या वस्तूचे रूप, त्यातील आशय आणि तिचे वर्तन यांमध्ये सुसंगती घडवून आणण्याचे काम करणाऱ्या लोकांना अन्योन्यक्रिया अभिकल्पक (इंटरॅक्शन डिझाइनर) असे म्हणतात. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आज अन्योन्यक्रिया अभिकल्पकांची मोठी गरज आहे. अन्योन्यक्रिया अभिकल्पकांसमोरील महत्त्वाची आव्हाने कोणती? त्यातल्या काही वस्तू अतिशय लोकप्रिय होतात, तर काही वापरणेदेखील अशक्य असते, असे का?
अन्योन्यक्रिया अभिकल्पकांसमोरील पहिले आव्हान म्हणजे त्यांच्या कामात ते नेहमी एक ‘सॉफ्टवेअर’ (संगणकीय प्रणाली) अभिकल्पित करतात. सॉफ्टवेअर बनवणे हे नेहमीच एक कठीण काम असते. एक तर ते शरीरासाठी नसून ‘मना’साठी अभिकल्पित केलेले असते. शरीरासाठी अभिकल्पित केलेल्या वस्तूचे मूल्यमापन करणे त्यातल्या त्यात सोपे असते. म्हणजे घोडचुका तरी चटकन सापडतात. कुणी जर अशी एखादी खुर्ची बनवली की जिची बसण्याची जागा जमिनीपासून ६ फूट उंचीवर असेल, तर आपण लगेच म्हणू की सामान्य माणसाला या खुर्चीवर बसणे अशक्य आहे. पण वापरायला अशक्य असलेल्या अशा अनेक ‘मानसिक खुच्र्या’ तुम्हाला सॉफ्टवेअरच्या दुनियेत सापडतील. काही लोक एका प्रकारचा संगणक सर्रास वापरत असले, तरी तोच संगणक वापरताना इतर काही लोक बिचकून असतात. एखादा सामान्य माणूस जेवढय़ा बिकटपणाचे सॉफ्टवेअर वापरू शकतो, त्याच्या दसपट जास्त बिकटपणा असलेले सॉफ्टवेअर एखादा माहिती तंत्रज्ञ वापरू शकतो. त्यामुळे, मी बनवलेले सॉफ्टवेअर वापरायला कुणाला कठीण जाऊ शकेल, हे त्या बिचाऱ्याच्या ध्यानातदेखील येत नाही.
दुसरी गोष्ट म्हणजे सॉफ्टवेअर बनत असताना, ती एक अज्ञात वस्तू असते. तिला अजून एखादे छोटेसे सामान्य नाम प्राप्त झालेले नसते. याच्या उलट मूर्त वस्तूचे. उदाहरणार्थ कार. दिल्लीत नुकत्याच आयोजित झालेल्या ऑटो एक्स्पोमध्ये अनेक कंपन्यांनी सादर केलेली निरनिराळ्या कारची नवी मॉडेल्स आपण पाहिली असतील. त्यात एखाद्या अभिकल्पकाने ‘कार कार’ म्हणून जर एखादी सायकल दाखवली तर तुम्ही लगेच म्हणाल, ‘‘छे छे, ही तर सायकल आहे, कार नाही’’. कार, सायकल, स्कूटर, टेबल, खुर्ची, चष्मा ही सामान्य नामे आहेत. कार म्हणजे काय व ती सायकलीपेक्षा कशी वेगळी असते, याबद्दल आपल्या सगळ्यांच्या मनातल्या कल्पना ठाम असतात. अन्योन्यसक्रिय वस्तूंना मात्र असली सुटसुटीत सामान्य नामे क्वचितच असतात. ‘‘फुले विकणाऱ्या आणि विकत घेणाऱ्यांसाठीचे संकेतस्थळ’’ असल्या बिकट सामान्य नामानेच त्याचे वर्णन करता येते. आपण बनवली ती ‘सायकल’ आहे की ‘कार’, हे ना त्या बनवणाऱ्याला माहीत असते, ना त्या उपयोक्त्याला. एकोणिसाव्या शतकातील कार अभिकल्पक जसे सुकाणूसाठी चाक लावावे की दांडा बरा पडेल, असल्या प्रश्नांशी झटत असत, तसेच आजचे अन्योन्यक्रिया अभिकल्पक ‘रेडिओ बटन’ की ‘ड्रॉपडाउन लिस्ट’ असा विचार करत बसतात.
माहिती तंत्रज्ञांची एक नेहमीची तक्रार म्हणजे उपयोक्ते त्यांच्या मागण्या सतत बदलत राहतात. काय बनवावे, हेच जर बनवणाऱ्याला नक्की माहीत नसेल, तर बनल्यावर ते परिपूर्णच असावे ही अपेक्षा करणे योग्य नाही. म्हणून अन्योन्यसक्रिय वस्तू ही आधी व्यवस्थित संकल्पित करावी लागते. ती उपयोगी आहे का, सर्वसामान्य उपयोक्ते तिचा वापर करू शकतील का, ती लोकांना आवडेल का, अशा सर्व दृष्टीने तिचे मूल्यमापन करावे लागते.
अन्योन्यक्रिया अभिकल्पकांपुढे आणखी एक आव्हान म्हणजे बहुतेकदा ते ज्यांच्यासाठी वस्तू अभिकल्पित करत असतात, ते उपयोक्ते त्यांच्यापासून खूपच भिन्न असतात. वरच्या उदाहरणामध्ये अमिशा ही शहरात वाढलेली, महाविद्यालयात शिक्षण घेणारी मुलगी होती. प्रकल्प सुरू होण्याआधी तिला फूलशेतीबद्दल, शेतकऱ्यांबद्दल आणि फुलांच्या गिऱ्हाइकांबद्दल फारच कमी माहिती होती. पण आव्हान पाहा- शेतकरी फुले कशी विकणार, आणि गिऱ्हाइकेती कशी विकत घेणार हेच नेमके तिला बदलावे लागत होते. अन्योन्यक्रिया अभिकल्पक जेव्हा एक नवीन वस्तू अभिकल्पित करतात, तेव्हा ते एखादा शेतकरी आपला माल कसा विकेल, एखाद्या बँकेची व्यवस्थापक कुणाचे कर्ज कसे मंजूर करेल, एखादा रुग्ण आपली औषधे वेळेवर न चुकता कसा घेईल किंवा एखादी शल्यविशारद शस्त्रक्रिया कशी करेल, हे ठरवत असतात, बदलत असतात. त्याकरिता त्यांना त्या उपयोक्त्यांबरोबर वेळ घालवावा लागतो. त्यांच्या कामाबद्दल सखोल माहिती मिळवावी लागते.
आज सादर करायचे असलेले अन्योन्यक्रिया अभिकल्पकांसमोरचे शेवटचे आव्हान म्हणजे संकल्पित केलेली वस्तू वास्तवात उतरवणे. अभिकल्पासाठी कितीही मेहनत लागली असली, कल्पना कितीही नावीन्यपूर्ण असली, उपयोक्त्याला कितीही उपयोगी असली, तरी जोपर्यंत ती वास्तवात उतरत नाही तोपर्यंत ती फक्त कागदावरची रेघ असते. माहिती तंत्रज्ञान, व्यवस्थापन, विश्लेषण, संशोधन, गुणवत्ता, विक्री, विक्रीपश्चात सेवा इत्यादी विभागांतील व्यक्तींच्या सक्रिय सहभागाशिवाय अन्योन्यसक्रिय वस्तू वास्तवात येऊ शकत नाही. अनेकदा या प्रस्थापित विभागांमध्ये अन्योन्यक्रिया अभिकल्पाबद्दल जाणीव नसते. त्यामुळे त्या वस्तूंत अभिकल्पाचा अभाव राहून जातो. उपयोक्ता म्हणून आपल्याला तो जाणवतो.
अन्योन्यक्रिया अभिकल्प हा तसा नवा विषय आहे. परिणामी बरेच अन्योन्यक्रिया अभिकल्पक अजून तरुण आहेत. त्यांना अनुभव कमी असू शकेल. पण त्यांचा उत्साह दांडगा असतो. उपयोक्त्यांबद्दल त्यांना कळकळ असते. त्यांचे काही तरी चांगले व्हावे, करून दाखवावे या आशेपायी ते झटत असतात. आजकालच्या भांडवलशाही कंपन्यांच्या महासागरात अशी माणसे भेटण्याची शक्यता कमीच. पण जर कुठे भेटलेच, तर जरा सांभाळून घ्या बरं का..

 

is it good to work 12 hours during pregnancy
गर्भावस्थेत बारा तास काम करणे कितपत योग्य आहे? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात, गर्भावस्थेत किती काम करावे?
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
Benefits of Drinking Okra Water
एक महिना ‘हे’ पाणी प्यायल्याने झपाट्याने वजन होईल कमी; कोलेस्ट्रॉलही राहील नियंत्रणात, एकदा फायदे वाचाच!
this is a wedding card not aadhar card
आधार कार्ड नव्हे ही आहे लग्नाची पत्रिका! विश्वास बसत नसेल तर एकदा क्लिक करा अन् नीट बघा

अनिरुद्ध जोशी, गिरीश दळवी
लेखक द्वय आयआयटी मुंबई येथील ‘औद्योगिक अभिकल्प केंद्रा’त (आयडीसी- इंडस्ट्रिअल डिझाइन सेंटर) प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. ई-मेल : anirudha@iitb.ac.in