नवीन तंत्रज्ञान शिकणे तरुणांनाच जमते, आपले ते काम नाही, असा अनेक लोकांचा समज असतो. पण प्रयत्न केल्यास तो चुकीचा ठरवणे शक्य आहे ..

दोन वर्षांपूर्वीची गोष्ट, सकाळी उठून फोन उचलला आणि एक आनंदाचा धक्का बसला. आईचा पहिला व्हॉट्सअ‍ॅप संदेश मला आला होता, ‘उठलास का, नाश्ता झाला का’? गेल्या सहा महिन्यांपासून तिचा व्हॉट्सअ‍ॅप शिकण्याचा आणि माझ्या फोनवरून शंकानिरसन करण्याच्या प्रयत्नांना अखेर अल्प का होईना पण यश मिळाले. आईला स्मार्टफोन वापरायला शिकवताना मला आपल्या समाजातील अनेक ‘वयवादी वृत्तींचा’ अनुभव आला. याचे एक उदाहरण पाहू. जाहिराती समाजाच्या आणि बाजारांच्या प्राथमिकता दर्शवितात. जाहिरात गाडीची असो, खाद्यपदार्थाची असो किंवा मोबाइलसारख्या नवतंत्रज्ञानाची, जाहिरातीतील वापरकत्रे (नायक) हे तरुणच असतात. फक्त तरुण लोक ही उत्पादने विकत घेतात का? अनेक लोकांना ही ‘वयवादी वृत्ती’ (वयाच्या आधारावर, विशेषत: वयस्करांशी भेदभाव) आहे याचे भान नसते, ते अशी प्रवृत्ती कळत-नकळत स्वीकारतात आणि काही तर अशा प्रवृत्तीला आपल्या संस्कृतीचा भाग मानतात. अशी मानसिकता फक्त तरुणांमध्येच नाही तर स्वत: वयस्कर व्यक्तींमध्येही आढळते. तसे पाहिले तर ही वृत्ती बुद्धीविरोधी आहे, वयस्क लोकांकडे तरुणांपेक्षा अनुभव जास्त असतो आणि बऱ्याच वेळा त्यांची व्ययशक्तीही जास्त असते.

Loksatta kutuhal Artificial intelligence that avoids potholes
कुतूहल: खड्डे चुकवणारी कृत्रिम बुद्धिमत्ता!
mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’
ie think our cities
IE THINC Second Edition: “लवकरच असमानता आणि हवामान बदल ही आपल्या शहरांसमोरची सर्वात मोठी आव्हानं ठरतील!”
Extraordinary women who make everyday life easier for common people
सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन सुकर करणाऱ्या ‘असामान्य स्त्रिया’

मोबाइल फोनचे उदाहरण पाहू. किती वयस्करांना, गृहिणींना घरातील तरुण मुलांसारखे अत्याधुनिक मोबाइल वापरायला मिळतात? ‘अहो आजोबा, फोनचा वापर तुम्ही फक्त फोन लावण्यासाठी करणार आहात. मग महागडा फोन कशाला घ्यायचा,’ असे प्रश्न विचारले जातात. या मानसिकतेमुळे बहुतांश गृहिणींच्या आणि वयस्क लोकांच्या वाटय़ाला घरातील जुने, टाकलेले, कालबाह्य़ किंवा सगळ्यात स्वस्त आणि जेमतेम कार्यक्षमता असेलेल मोबाइल येतात. एवढेच नाही, स्मार्टफोन जरी घेतला तर, आपल्याला तो वापरता येईल (किंवा आपल्याला त्याचा वापर शिकता येईल) असा आत्मविश्वास नसतो, त्याहून वर स्मार्टफोनचा वापर शिकवणे घरातील तरुणांना त्रासदायक वाटते. बऱ्याचदा स्मार्टफोन हे फक्त तरुण लोकांचे यंत्र आहे आणि स्मार्टफोन (किंवा कुठलेही नवीन तंत्रज्ञान) शिकणे आपल्याला जमणार नाही, अशा कल्पना लोकांच्या मनात दृढ झालेल्या दिसतात. परिणामी, स्मार्टफोनच्या भीतीने आणि आप्तजनांच्या निराशाजनक मानसिकतेमुळे हे लोक नवीन तंत्रज्ञान शिकण्यापासून परावृत्त होतात. खरे पाहिले तर स्मार्टफोन अशा लोकांच्या खूप कामी येऊ शकतो आणि त्यांना स्वावलंबी बनवू शकतो. कल्पना करा, घरातील आजोबांना रेल्वेची तिकिटे घरबसल्या काढता आली तर.. किंवा आजीला लग्नाला जाण्यासाठी स्मार्टफोनवरूनच टॅक्सी मागवता आली तर.. या आणि यांसारख्या कित्येक सोयी स्मार्टफोनच्या माध्यमातून शक्य आहेत. फक्त आपल्याला आपल्या मानसिकतेत बदल करून सगळ्यांना संधी देण्याची आणि प्रोत्साहित करण्याची गरज आहे.

लोक स्मार्टफोन वापरण्यात तरबेज कसे बनू शकतील? स्मार्टफोन शिकायला सोपे जाणे किंवा अवघड जाणे हा विषय एवढा महत्त्वाचा आहे का? विशेषत: भारतीय वापरकर्त्यांसाठी अ‍ॅप तयार करणाऱ्या अभिकल्पकांसाठी हा नक्कीच महत्त्वाचा विषय आहे. ज्या वापरकर्त्यांनी आधी संगणकाचा वापर केला आहे त्यांना स्मार्टफोन वापरणे सोपे जाते. असे होण्यामागचे कारण असे की स्मार्टफोनमधील क्रियाविधी या संगणकातील क्रियाविधींसारख्याच असतात. अमेरिका, जपान यांसारख्या देशांमध्ये संगणक व मोबाइलचा वापर गेल्या दोन दशकांपासून सुरू आहे. तेथील वापरकर्त्यांनी संगणक व मोबाइल फोनच्या अनेक आवृत्त्या अनुभवल्या आहेत. त्यामुळे तिथल्या बहुतांश उपभोक्त्यांना वापराच्या चालीरीती आधीपासून माहिती आहेत. याउलट आपल्या देशातील बऱ्याच लोकांसाठी स्मार्टफोन हाच प्रथम संगणक आहे. त्यामुळे आपल्या लोकांना या चालीरीती माहीत नसतात आणि म्हणून त्यांना स्मार्टफोन वापरायला अवघड जातो. याचे एक छोटे उदाहरण पाहू. तरुण मुले जी लहानपणापासून संगणक व मोबाइल फोन वापरतात त्यांना स्मार्टफोनचा वापर शिकायला एखादा आठवडा पुरतो तर त्याच घरातील एखादी गृहिणी जिने आतापर्यंत संगणक वापरलेला नसतो, तिला स्मार्टफोन शिकायला महिने लागतात.

या समस्येवर अनेक उपाय आहेत. स्व-अध्ययन, क्रियात्मक अध्ययनासोबतच, घरातील सदस्य व जवळचे मित्र नवतंत्रज्ञान शिकण्यास खूप मदत करू शकतात. पण बऱ्याचदा जेव्हा फोन वापरताना एखादी अडचण येते त्याच वेळी शंकानिरसन करायला कोणी उपलब्ध नसते, मित्रांना पण शंकेचे उत्तर माहीत नसते. काही वेळा, लोकांना आपल्यामुळे त्रास होईल का, न्यूनगंड व इतर कारणांमुळे लोक चाचरतात व शंका विचारायला संकोच करतात. बहुतांश पालकांना ही अडचण येते, कारण त्यांची मुले नोकरीसाठी किंवा शिकण्यासाठी लांब राहत असतात. या मुलांनासुद्धा कितीही इच्छा असली तरी फोनवरून शंकेचे पूर्ण निरसन करणे शक्य होत नाही. शंकेचे निरसन होण्यास उशीर झाला की शंका विचारायचे राहून जाते. त्यामुळे अशा लोकांना स्मार्टफोन शिकवायला कोणीच उपलब्ध नसते. आमच्या संस्थेत केलेल्या अभ्यासातून हेही आढळून आले की छापलेली मदत पुस्तिका, इंटरनेटवरील व्हिडीओ शिकवण्या आणि फोनमधील मदतीचे अ‍ॅप्ससुद्धा वापरकर्त्यांच्या समस्यांचे निरसन करत नाहीत. याचे मूळ कारण या शिकवण्या वापरकर्त्यांच्या मातृभाषेत उपलब्ध नसतात आणि जरी उपलब्ध असल्या तरी त्यांचे स्थानिकीकरण नीट केलेले नसते.

अशा समस्या फक्त नवशिक्यांना येतात असे नाही, बहुतांश लोक उपलब्ध तंत्रज्ञानाचा परिपूर्ण उपयोग करीत नाहीत. स्मार्टफोनचे उदाहरण घेतले तर, बरेच जण मोजकेच अ‍ॅप वापरतात आणि त्या अ‍ॅपमध्ये पण त्यांना एक किंवा दोनच क्रिया करता येतात. अशा लोकांना तरबेज कसे बनवता येईल? याचा अभ्यास आम्ही एका प्रकल्पात केला. सर्वप्रथम आम्ही नुकताच स्मार्टफोन घेतलेल्या लोकांच्या मुलाखती घेतल्या आणि त्यांना येणाऱ्या अडचणी समजून घेतल्या. अभ्यासानंतर या समस्येवरील उपायांचा विचार करण्यात आला व त्यांच्या उपयुक्ततेवर लोकांचा अभिप्राय घेण्यात आला. अखेरीस, या अभ्यासातून ‘टिप्पी’ (ळ्रस्र्स्र््री) नावाच्या अ‍ॅपची कल्पना करण्यात आली. हे अ‍ॅप फेब्रुवारी महिन्यात प्लेस्टोरवर प्रकाशित केले व आज ते सर्वासाठी विनामूल्य उपलब्ध आहे. टिप्पी अ‍ॅपमध्ये २० पेक्षा जास्त लोकप्रिय अ‍ॅप्सच्या १५० हून अधिक शिकवण्या तयार आहेत आणि या शिकवण्या सध्या मराठी, िहदी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध आहेत. शिकवण्यांचा मजकूर सोप्या, मनोरंजक व सगळ्यांना समजेल अशा भाषेत लिहिला आहे. मजकुरात जाणीवपूर्वक बोली भाषेतले व रोजच्या वापरातील शब्द वापरण्यात आले आहेत. तांत्रिक व अवघड इंग्रजी शब्दांचा वापर आम्ही टाळला आहे. प्रत्येक शिकवणीमध्ये, विशिष्ट क्रिया करताना वापरकर्त्यांच्या कुठे चुका होऊ शकतात अथवा एखादी कृती केल्याने त्याचा काय परिणाम होऊ शकतो याची कल्पना आधीच देण्याचा प्रयत्न केला आहे. या वैशिष्टय़ांमुळे टिप्पीमध्ये शिकवणी बघून अगदी नवशिका व्यक्तीही स्मार्टफोनमध्ये हवे ते कार्य करू शकतो. शिकवण्या बघण्यासोबतच, टिप्पीमध्ये कुठल्याही अ‍ॅपची किंवा मोबाइल कार्याची शिकवणी तयार करता येते व तयार केलेली शिकवणी सहजरीत्या आप्तजनांना पाठवता येते. या सुविधेमुळे एखाद्या दूरगावी असलेली मुलगी पण आपल्या आजोबांना स्मार्टफोन शिकण्यास प्रोत्साहित करू शकते. शिकवण्यांची निर्मिती करण्यासाठी केवळ अ‍ॅपच्या स्थितिचित्राचा (स्क्रीनशॉटचा) वापर करण्यात येतो आणि हे चित्र काढण्यासाठी टिप्पीच मदत करते. फोनच्या प्रत्येक स्थितीत, कुठे काय करायचे आहे, हे हाताच्या चिन्हाने दाखवता येते व आपल्या मातृभाषेत आवाज आणि लिखित मजकूरही जोडता येतो. यामुळे समजायला सोपी जाईल अशी शिकवणी सहज बनवता येते.

टिप्पी हे एक नवतंत्रज्ञान शिकण्याचे साधन असून त्याचा वापर करून दुर्लक्षित वापरकर्त्यांना नक्कीच प्रोत्साहित करता येईल. पण खरी गरज सामाजिक मानसिकता बदलण्याची आहे. विषमतावादी वृत्तींना पूर्णविराम देऊन समाजातील सर्व वर्गाना तंत्रज्ञान शिकण्याची समान संधी देण्याची आहे. वापरकर्त्यांनी आपल्या मनातील नवतंत्रज्ञानाविषयीच्या न्यूनगंडावर मात करण्याची आणि गरजू वापरकर्त्यांना शिकण्यास प्रेरित करण्याची आहे. चला तर, सुरुवात आपण आपल्याच घरातून करू.

गिरीश दळवी हे आयआयटी मुंबई येथील औद्योगिक अभिकल्प केंद्र’ (आयडीसीइंडस्ट्रिअल डिझाइन सेंटर) येथे प्राध्यापक आहेत. संकेत कुलकर्णी हे या संस्थेचे माजी विद्यार्थी आणि अभिकल्प उद्योजक आहेत.

girish.dalvi@iitb.ac.in