personal information
फिनिशर या खास भूमिकेसाठी रिंकूची संघात निवड होते. हाणामारीच्या षटकांमध्ये मोजक्या चेंडूत जास्तीत जास्त धावा चोपणं ही रिंकूची खासियत आहे. रिंकूचे बाबा घरोघरी सिलेंडर गॅसचं वाटपाचं काम करतात. आर्थिक परिस्थिती बेतास बेत असतानाही त्यांनी रिंकूला प्रोत्साहन दिलं. त्यांचं प्रेम, पाठिंबा आणि विश्वास रिंकूने सार्थ ठरवला आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाचा रिंकू तारणहार आहे. आयपीएल २०२३ स्पर्धेत रिंकूने यश दयाळच्या गोलंदाजीवर सलग पाच षटकार खेचत अविश्वसनीय विजय मिळवून दिला होता. खेळपट्टीचा अंदाज येण्यासाठी थोडा वेळ लागतो. मात्र रिंकू याबाबतीत वेगळा ठरतो. पहिल्या चेंडूपासून जोरदार फटकेबाजी करू शकण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. धावांचा पाठलाग करताना फिनिशरची भूमिका कळीची ठरते. रिंकूने याबाबतीत स्वत:ला वारंवार सिद्ध केलं आहे. दडपणाच्या क्षणी टोलेजंग फटकेबाजी करून त्याने संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं आहे. फटकेबाजीच्या बरोबरीने अफलातून क्षेत्ररक्षण ही त्याची ताकद आहे. धावा रोखणं आणि झेल टिपणं दोन्ही आघाड्या तो समर्थपणे सांभाळतो.

