personal information
खणखणीत फटकेबाजी आणि मध्यमगती गोलंदाज, दुर्मीळ कौशल्य गटाचा प्रतिनिधी. मुंबईतल्या टी२० लीग स्पर्धेत अनुभवी प्रवीण तांबेच्या गोलंदाजीवर सलग पाच षटकार चोपले. मुंबईसाठी खेळताना शिवमची फटकेबाजी चर्चेचा विषय होती मात्र याला आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सकडून खेळू लागल्यानंतर त्याला नवीन आयाम मिळाला. मधल्या षटकांमध्ये फिरकीपटूंच्या आक्रमणावर प्रहार करण्यासाठी चेन्नईने शिवमला धाडलं. हा प्रयोग यशस्वी ठरला. उसळत्या चेंडूंविरुद्ध होणारी गडबड शिवमने सुधारली. दांडपट्टा स्टाईल फटकेबाजी भारतीय संघाला अधिक ताकदवान करते. गेल्या काही वर्षात शिवमने स्वत: गोलंदाज म्हणूनही सिद्ध केलं आहे. फसवे स्लोअर वन, शरीराचा वेध घेणारे उसळते चेंडू टाकून विकेट पटकावण्यात आणि खासकरुन भागीदारी तोडण्यात शिवमचं प्राविण्य आहे. याबरोबरीने चपळ क्षेत्ररक्षकही आहे. हार्दिक पंड्या दुखापतग्रस्त असताना तसंच विजय शंकर अपेक्षित कामगिरी करू न शकल्याने शिवमच्या रुपात भारतीय संघाला अष्टपैलू म्हणून सक्षम पर्याय मिळाला. दुखापतींवर मात करत शिवमने प्रत्येक आघाडीवर तय्यार असल्याचं दाखवून दिलं आहे.

