personal information
शिक्षणाने वास्तूरचनाकार असलेला वरुण टी२० वर्ल्डकपमध्ये भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरू शकतो. चित्रपटात काम, पटकथा लेखन, शिक्षण वास्तूरचना, कामही तेच असं सगळं असतानाच वरुणने पूर्ण वेळ क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला. तामिळनाडू प्रीमिअर लीग स्पर्धेत वरुणने आपल्या फिरकीने फलंदाजांना अडचणीत आणलं. आयपीएल स्पर्धेत पंजाब किंग्ज संघाने त्याला समाविष्ट केलं. तिथे पहिल्याच सामन्यात त्याच्या गोलंदाजीवर एका षटकात २५ धावा कुटल्या गेल्या. पंजाबने रिलीज केल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स संघाने त्याला ताफ्यात घेतलं. वरुणचं नशीब तिथे बदललं. महेंद्रसिंग धोनीला जखडून ठेवणारा फिरकीपटू अशी ओळख वरुणने तयार केली. त्याचा चेंडू फलंदाजांना वाचताच येत नाही आणि त्यांची भंबेरी उडते. आयपीएल स्पर्धेत १०० विकेट्स नावावर असणाऱ्या वरुणने भारतासाठी खेळतानाही विकेट्सची पन्नाशी पार केली आहे. खेळपट्टीवर स्थिरावलेली भागीदारी किंवा ऐन भरात फटकेबाजी करणाऱ्या फलंदाजांला रोखण्यासाठी वरुणला पाचारण केलं जातं. वरुण जादुई फिरकीने त्या फलंदाजांना माघारी धाडतो हे चित्र चाहत्यांना सवयीचं झालं आहे.

