‘हायपोकॉड्रियासिस’चा अर्थ होतो, स्वत:ला एखादा गंभीर आजार असल्याची अकारण व अवास्तव भीती वाटणे. आपल्याच आजाराचा भूलभुलैया तयार करून त्या भीतीतच ही माणसे जगतात. वेळीच उपचार केले तर मात्र ते यातून बाहेर पडणे शक्य आहे.
सोमटायजेशन किंवा मानसिक वेदनेच्या शारीरिक आजारात सर्वसाधारणपणे अमुक एका आजाराकडे बोट दाखविता येत नाही. शरीरातील एकाच वेळी अनेक अवयव जणू आजारी आहेत की काय असे वाटते. शरीराच्या अनेक तपासण्या केल्यावर काहीच निष्पन्न होत नाही. रुग्ण वैफल्यग्रस्त होतो. घाबरून जातो. डॉक्टरसुद्धा थकून जातो. अशा वेळी तत्कालीन अज्ञानाच्या अंधारात चाचपडत राहण्यापेक्षा रुग्णांनी मनोविकारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा हे योग्य आहे.
या शारीरिक विकारांच्या मागे एक वेगळी व सुप्त अशी मानसिक पाश्र्वभूमी असते. या मानसिक वेदनेची रुग्णांना जागृतपणे जाणीव नसते. सुमित्राबाईंसारखे रुग्ण याबाबत तसे अज्ञानात असतात. खरे तर अशी दु:खदायक छळणारी मानसिक वेदना आपल्या मनात जागत राहिली तर व्यक्तीला जगणे प्रचंड कठीण होते. ‘कळा ज्या लागल्या जीवा मला की ईश्वरा ठाव्या, कुणाला काय हो त्याचे कुणाला काय सांगाव्या’ अशी स्थिती या हेलावून सोडणाऱ्या वेदनांनी झालेली असते. स्त्रीसाठी तर ही शंभर टक्के खरी स्थिती आहे. तिच्या अनेक वेदना ‘आपलेच दात, आपलेच ओठ’सारख्या असतात. सांगायचे म्हटले तरी तिची दमछाक होते. दुसऱ्या कुणाचा त्यावर विश्वास बसेलच असे नाही.
भावुक स्त्रीची वेदना बऱ्याचदा नातेवाईकांना कटकटीपेक्षा अधिक काही नाही असेच वाटते. हा जो मनाचा जाच असतो तो स्वत:ला रुचत ना दुसऱ्याला पटत. रोजचे मरणे टाळायचे म्हणून मग तो मनातल्या सुप्त कबरीत दाबून टाकायचा. खरे तर मनाची ही संरक्षक भूमिका आहे. काही गोष्टी आपल्या मनाविरुद्ध घडतात आणि त्या पचविता येत नाहीत तेव्हा मनाच्या एका कोपऱ्यात त्या वेदना कुलूपबंद करून ठेवायच्या. पण त्या खवळलेल्या समुद्राच्या लाटांसारख्या मनाच्या किनाऱ्यावर आदळत राहतात. त्या वेळी या भावनिक लाटा आपले खरे रूप बदलून शरीराला मात्र छळत राहतात. या मनाला जाळणाऱ्या मानसिक यातना चेटकिणीसारख्याच शारीरिक आजारांच्या विविध रूपात येऊन आपले अस्तित्व दाखवून देतात. खरे तर ही तशी आपणच आपली केलेली अक्षम्य फसवणूक आहे. मूळ मानसिक क्लेश तसे काही नष्ट झालेले नसतात. शारीरिक विकारांच्या रूपाने ते जीव सतत हैराण करतच राहतात. म्हणजे ज्या मानसिक क्लेशापासून खरे तर आपल्याला सुटका मिळवायला हवी ते ‘जैसे थे’ राहतात आणि शारीरिक आजाराच्या आवरणात मात्र रुग्ण फसतात. या आवरणाचा उपचार मात्र करता येत नाही. कारण हा आजाराचा भूलभुलया असतो. या शारीरिक आजारातून सुमित्राबाईंसारख्या भगिनीला बाहेर काढायचे म्हटल्यास या आजाराचा मूळ स्रोत म्हणजेच त्यांची एवढय़ा वर्षांची मानसिक तडफड शांत करायला लागते. ही मानसिक तडफड मनातील अतीव दु:खामुळे, क्रोधामुळे, त्वेषामुळे, संतापामुळे सुप्त मनालाही जाळत असते. ही अवघडलेली वेदना जेव्हा आपण त्यांना ओळखायला शिकवितो, तिच्यावर मात करायला शिकवितो, वेदनांची ही पसरलेली वाळवी प्रगल्भ दृष्टिकोनातून दूर करायला शिकवितो तेव्हा त्यांच्या मनात एक स्थर्य येते. वेदना ही खरेच भूतकाळातली भुते होती. त्यांचा मानसिक थयथयाट थांबवून आजच्या निरामय जीवनाचा आनंद त्यांना घ्यायला शिकविला तरच सुमित्राबाईंसारख्या रुग्ण खऱ्या अर्थाने बऱ्या होतील.
सोमॅटोफॉर्म डीसऑर्डरच्या किंवा शारीरिक आजारपणाच्या दुसऱ्या स्वरूपातील आणखी एक आजार म्हणजे हायपोकॉड्रियासिस. कामिनीदेवी काही वर्षांपूर्वी मेंदूचा टय़ूमर झाल्याने मृत्यू पावल्या होत्या. त्या वेळी त्यांचे पूर्ण कुटुंब हवालदिल झाले होते. सहाएक महिन्यांत आजाराचा आवाका व स्वरूप नातलगांच्या लक्षात येण्यापूर्वीच तळमळत, कण्हत एक सुकन्या या जगातून निघून गेली होती. तिच्या त्या तशा अनपेक्षित विकल मृत्यूचा पगडा पूर्ण घरादारावर पडला होता. कित्येक दिवस त्या घराने खऱ्या अर्थाने निवांत श्वास घेतला नव्हता. माणसंच काय, िभतींवर व एकंदरीत साऱ्या घरावर मृत्यूची छाया जणू पसरली होती. प्रत्येकाच्या मनावर भीतीचे दडपण होते. कामिनीदेवीची धाकटी बहीण मिता या मृत्यूच्या दडपणातच वावरत होती. तिला रात्र रात्र झोप येत नव्हती. ती तिच्या अंथरुणात तडफडत रहायची. तिच्या मनाच्या कप्प्यात एक अनामिक भीती घर करू पाहात होती. तिला सुरुवातीला सारखे वाटत होते की आपल्यालाही असा ब्रेन टय़ूमर होईल का? ती कोणास काही सांगत नव्हती. पण तिचे खरेच खूप बिनसले होते. ती पेशाने सीए होती. अत्यंत हुशार व चतुर म्हणून मिता लोकप्रिय होती. पण हळूहळू तिची चतुराई अशी कशी तिला सोडून गेली हे कोणाला कळेना. आजकाल तिचे डोके उठल्या उठल्या ठणकायचे. तिला ती वेदना सहन व्हायची नाही. तिच्या डॉक्टरांनी तिला सांगून पाहिले की काही घाबरायची गरज नाही. तिला कधी अचानक भोवळ आल्यासारखी वाटे, तर कधी अचानक डोक्याच्या ठरावीक भागातून कळ येई व ती सर्व डोक्यात पसरत असे. तिला हळूहळू डॉक्टरांचे समजावणे बिनबुडाचे वाटायला लागले. तिच्या मनाने घेतले की आपले काही खरे नाही. कामिनीदेवी गेल्या तेव्हा तिचे नुकतेच लग्न झाले होते. त्या नवनवीन लग्नाची रोमँटिक अनुभूती घ्यायचे दूरच राहिले. ती एका भयानक आजाराच्या भोवऱ्यात स्वत:च हरवून गेली. तिच्या समाधानासाठी डॉक्टरांच्या दवाखान्याचे किती उंबरठे तिने झिजविले असतील याला सीमाच नव्हती. मेघाने डॉक्टरांवरच दबाव आणायला सुरुवात केली. तिला खात्रीच होती की आपल्या मेंदूत एक टय़ूमर निर्माण झाला आहे आणि तो दिसामाशी वाढतो आहे. सीटी स्कॅन झाला. एमआरआय झाला. मेंदूच्या पूर्ण तपासाबद्दल डॉक्टरांनी तिला नीट समजावून सांगितले. पण मिताचे मन मानत नव्हते. नवऱ्याला पटवून तिने मोठमोठय़ा डॉक्टरांची भेट घेतली. तपासांचे रेकॉर्ड दाखविले. प्रत्येकाने तिला शास्त्रीयदृष्टय़ा काहीही आजार दिसत नाही असे पटवून द्यायचा प्रयत्न केला, पण व्यर्थ. तिला तिच्या डोक्यातले टय़ूमरचे भूत काही केल्या तिला सोडत नव्हते. आपल्याला काही तरी भयंकर झाले आहे यावर तिचा पूर्ण विश्वास बसला होता. ती अस्वस्थ झाली होती. ती नेटवर जाऊन मेंदूच्या कर्करोगाविषयी खूप माहिती गोळा करू लागली. या माहितीतून मिळालेली काही लक्षणे तिला आपल्या लक्षणांशी जुळताहेत असे वाटत होते. डोके ठणकून दुखते. भोवळ येते. कधी डोके आवळल्यासारखे वाटते. पण इतर लक्षणांशी तसे काही साधम्र्य नव्हतेच. घरच्यांनी, मत्रिणींनी, डॉक्टरांनी किती सांगितले तरी तिच्या डोक्यातून आपल्याला ब्रेन टय़ूमर आहे ही कल्पना अविचलपणे ठासून बसली होती.
मिताला हायपोकॉड्रियासिसचा आजार झाला होता. या रुग्णांच्या मनाने जणू ठरवलेलेच असते की आपल्याला एक प्रचंड मोठा रोग झालेला आहे. असाच प्रकार प्रियाबाबत घडला होता. तिला सतत वाटायचे की तिला एचआयव्ही झालेला आहे. त्यामुळे एडस् होऊन ती लवकरच मरणार आहे. पुन्हा पुन्हा ती सतत रक्त तपासून घ्यायची. तिनेही पुस्तके वाचून, समुपदेशकाकडे जाऊन व गुगलवरून खूप माहिती गोळा केली होती. रक्ताचा रिपोर्ट प्रत्येक वेळी व्यवस्थित असायचा; पण गेली तीन-चार वष्रे पुन्हा पुन्हा रक्त तपासून घ्यायचे तिला वेडच लागले होते. आपल्याला एका मोठय़ा गंभीर आजाराने त्रस्त केले आहे या भावनेतून ही मंडळी कुणाचेच ऐकत नाहीत. त्यांना डॉक्टरांकडून अक्षरश: वदवून घ्यायचे असते की त्यांना वाटतो तसा भयानक आजार झाला आहे. जे जे डॉक्टर त्यांना तुम्हाला हा आजार झाला नाही असे सांगतात ते कुठे तरी चुकत असतील असे त्यांना वाटते. त्यामुळे ते दुसऱ्या दुसऱ्या नव्या डॉक्टरकडे जातात. पुन्हा पुन्हा सगळ्या तपासण्या करीत राहतात. ही मंडळी न कंटाळता, न थकता मिळेल त्या डॉक्टरना जणू विकत घ्यायचा प्रयत्न करतात. याला
‘डॉक्टर शॉिपग’ म्हणतात. जसजसे आणखी दिवस जातात तसतसे यांना डॉक्टरांना भेटण्याची इच्छाही तीव्र होत राहते.
या आजारामुळे अनेक रुग्ण खऱ्या अर्थाने त्यांच्या दैनंदिन व्यवहारात किंवा नोकरीच्या ठिकाणी मानसिकदृष्टय़ा पंगू व्हायला लागतात. त्यांची कार्यक्षमता कमी व्हायला लागते. त्यांचे सगळे लक्ष फक्त विविध तपासण्या करण्यामध्ये व या आजारामुळे आपण कसे संकटात पडलो आहे हे सिद्ध करण्याकडे असते.
हायपोकॉड्रियासिस हा ग्रीक शब्द आहे. याचा अर्थ स्वत:च्या प्रकृतीबद्दल एखादा गंभीर आजार असल्याची अकारण व अवास्तव भीती वाटणे. अशा रोगाची भीती बाळगणाऱ्या व्यक्ती शरीरातील सर्वसाधारण सामान्य संवेदना, दैनंदिन शारीरिक कार्य व काही सौम्य लक्षणांना गंभीर स्वरूप देतात. या सगळ्या सामान्य संवेदनांतून भयानक आजार उद्भवणार आहे अशी भीती मनात बाळगतात. जसे की ढेकर येत असतील व कधी खूप घाम फुटत असेल किंवा शरीरावर एखादा छोटासा डाग दिसला तरी आता काय भयंकर आजार होईल या भीतीने गर्भगळीत होतात.
बऱ्याच वेळा त्यांच्यात एखाद्या अवयवाबद्दल जसे की हृदयाचा आजार, पोटाचा विकार अशा विकारांची भीती असते. निष्णात डॉक्टरांचे अवलोकन व अनेक तपासण्या नॉर्मल असल्या तरी ही मंडळी शांत होत नाहीत. थोडीफार शांत वाटली तर ती काही काळापुरतीच. पण प्रकृती स्वस्थचित्त आहे व शरीरात कसलाच रोग नाही हे स्वीकारायला ही मंडळी मात्र कधीच तयार होत नाहीत. यामुळे मितासारखे रुग्ण खूप चिडायला लागतात. हायपोकॉड्रियासिससारख्या आजाराचे निदान करणे व रुग्णाला त्या आजारातून बाहेर काढणे हे डॉक्टरसाठी एक आव्हानच आहे. (क्रमश:)
डॉ. शुभांगी पारकर- pshubhangi@gmail.com.

Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!
family members
मनातलं कागदावर: साधू या सूरतालाशी लय!
Counselling how to break up without revenge
समुपदेशन : नातं तोडायचंय? पण सूडाशिवाय…
What happens to your body if you only eat foods cooked in olive oil
तुम्ही फक्त ऑलिव्ह ऑइलमध्ये शिजविलेले अन्न खाता का? त्याचा शरीरावर काय परिणाम होतो माहित्येय का?