ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर (ओ.सी.डी.) वा मंत्रचळ हा एक मानसिक आजारच आहे. प्रौढांमध्ये ४० पकी एकाला हा आजार होतो. एखादे काल्पनिक चित्र किंवा तीव्र इच्छा-ऊर्मी मनामध्ये अचानक, सातत्याने यायला लागते. आणि कितीही प्रयत्न केले तरी जात नाही, त्यातून सतत कपडे, भांडी धूत बसणं, हात धूत राहणं त्यामुळे स्वत:ला अपराधी ठरवत राहणं अशा कृती होत राहतात. त्यावर वेळीच उपाय व्हायला हवा.

स्वच्छता ठेवणारी माणसे आपल्याला केव्हाही आवडतात. स्वच्छतेमुळे मन कसे प्रसन्न राहते. वातावरण सुखद वाटते. पण स्वच्छतेची कृती जेव्हा मर्यादेपलीकडे जाते तेव्हा मात्र इतरांचा कपाळशूल उठतो. पण प्रश्न असतो तो त्या व्यक्तीचा.
अंगुरीदेवीला तिचा नवरा आमच्याकडे घेऊन आला होता. तो खूप त्रासलेला व चिडलेला होता. तिच्या स्वच्छतेचा कळस झाला होता. तिच्या तीन मुलांचे व नवऱ्याचे कपडे, चादरी, तिच्या साडय़ा ती सतत धुण्याच्या पावडरने धूत असे. महिन्याला जवळजवळ १२ ते १४ किलो साबणाची पावडर तिला लागत होती. अनेकदा मुलांना व नवऱ्याला बाहेर जायला कपडेच मिळत नसत. नवऱ्याची त्यामुळे चिडचिड होत असे. कधी कधी त्याचा तिच्यावर हातही उठत असे. केवळ अतिसाफसफाई हा घटक महत्त्वाचा नव्हता. पण सतत पाण्यामध्ये राहणे धोकादायक होते. केवळ कपडेच नाही तर भांडीसुद्धा ती चार-पाच वेळा घासत बसायची. या सगळ्या स्वच्छतेच्या महाअभियानात पोरांना उपाशी राहवे लागायचे. नवऱ्याला डबा मिळत नव्हता. तो बिचारा कुठे वडापाव किंवा भजीपाव खायचा. पण मुलांनी काय करायचे? त्यांची तर उपासमार होऊ लागली. त्याने तिला मदत करायचे ठरवले पण त्याच्या स्वच्छतेविषयी हिच्या मनात अविश्वास. मग फरशी पूस, परत आंघोळ कर, मुलांना आल्या आल्या खायला-प्यायला न देता आंघोळीला पाठव. असं होऊ लागलं. तिच्या हाताची सालपटे निघाली होती. दिवसरात्र काम करून ती थकून गेली होती. अशक्त भासत होती. तिला एवढे कळत होते की हे जे काही ती करते ते बरोबर नाही. भांडी स्वच्छ असतात, कपडे स्वच्छ झालेले असतात, लादी साफ असते पण मन मानत नाही. मग हे सारे मनाला समाधान मिळेपर्यंत साफसूफ करणे भागच पडते. नाही केले तर जीव गुदमरतो. ती स्वत:सुद्धा या साऱ्याला कंटाळली आहे. पण हे विचार मनात येतच राहतात. याला ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर (ओ.सी.डी.) किंवा मंत्रचळ म्हणतात.
ओ.सी.डी. हासुद्धा मेंदूतील रसायनांच्या बदलामुळे होतो. असे म्हणतात की, प्रौढामध्ये ४० पकी एकाला तर मुलांमध्ये १०० पकी एकाला हा आजार होतो. यात ऑबसेगान म्हणजे एखादा तीव्र विचार किंवा काल्पनिक चित्र किंवा तीव्र इच्छा-ऊर्मी मनामध्ये अचानक यायला लागते. सातत्याने यायला लागते. कितीही प्रयत्न करा, कष्ट करा पण हे विचार काही मनातून जात नाही. हे विचार मनातून खोडून काढता येत नाही. त्यांना टाळताही येत नाही. इतरत्र कुठे लक्ष द्यायचा प्रयत्न केला, कामात गुंतायचा प्रयत्न केला तरी हे विचार थांबतच नाहीत. रुग्णाला काहीच करता येत नाही.
माझ्याकडे कृपा नावाची एक मुलगी येत असते. बारावीत असताना पेपर लिहिताना तिच्या डोक्यात सहज विचार आला की, मी उत्तरे पूर्णपणे लिहिली नाही. मग ती लिहिलेली उत्तरे पुन्हा पुन्हा तपासू लागली. ती जरी पूर्ण लिहिलेली होती तरी तिचे काही समाधान होत नव्हते. हळूहळू तिला ती कोणाशी बोलत असताना आपल्याला जे सांगायचे होते ते पूर्णपणे व्यवस्थित सांगितले जात नाही असे वाटत असे. मग ती खूप अस्वस्थ व्हायची. तिला पूर्णपणे सगळे परत सांगायचे असे. आता लोक तरी का पुन्हा पुन्हा तेच तेच ऐकतील. घरातली मंडळी म्हणायची, ‘अगं, कळले आम्हाला दोनदा ऐकले आम्ही. सगळे व्यवस्थित सांगितलेस.’ मग मात्र ती घरच्यांवर चिडू लागली, संतापू लागली. अतिशय हुशार मुलगी, पण तिने अभ्यासही सोडून दिला. कारण काही राहून गेले का, काही अपूर्ण राहिले का, काही चुकले का या विचारांनी तिचे डोके भणाणून जायचे. मग ती प्रत्येक गोष्ट डायरीत लिहून ठेवू लागली. त्याचाही तिला व्यापच झाला. त्या डायरीतसुद्धा आपण व्यवस्थित लिहिले की नाही या शंकेने ती डायरीही पुन्हा पुन्हा तपासू लागली.
ओसीडी कशी ओळखायची? तर यामध्ये सतत येणारे विचार, कल्पना चित्रे, अचानक येणारी ऊर्मी, ज्यामुळे बेचनी वाढते, हे विचार चुकीचे आहेत, त्यात तथ्य नाही हे रुग्णाला कळते, पण ते विचार त्यांना थांबवता येत नाहीत. ते त्यांच्या मनात घुमत राहतात. या विचारांच्या अनुषंगाने बऱ्याचशा कृती किंवा कम्पलशन्स वा सक्तीच्या कृती या व्यक्तींमध्ये दिसतात. सतत हात धुणे, पुन्हा पुन्हा एखादी गोष्ट तपासून पाहणे, ठरावीक पद्धतीची कृती किंवा अमुक पद्धतीने चालणे, देवाचे नाव घेणे, अंक मोजणे अशा प्रकारची मानसिक कृती या रुग्णांमध्ये मंत्रचळातून शांत वाटावे म्हणून केली जाते. या कृती केल्यामुळे व्यक्तीची बेचनी त्या वेळेपुरती कमी होते. पण सगळा वेळ त्यांचा या कम्पलशन्समध्येच जातो.
कधी कधी ओसीडीमध्ये काही वेळा किळस आणणारे किंवा अश्लील, लंगिक विचार येतात. माझी एक रुग्ण घाबरीघुबरी होऊन माझ्याकडे आली होती. तिला आपल्या १४ वर्षांच्या मुलाबद्दल मनात लैंगिक विचार येऊ लागले. ती त्याला स्पर्शही करेना. त्याचे जेवण ठेवून निघून जाई, शाळेचे कपडे काढून निघून जाई. त्याचे अंथरुण घालून निघून जाई. अचानक त्याचा हात लागला तर प्रभूचे नाव घेत बसायची. आपण आई आहोत आणि आपल्याकडून किळसवाणा महाअपराध घडत आहे या विचाराने ती मनात जळत राहिली. तिला वाटले, कसली पापी माता आहे मी? यापेक्षा जीव दिलेला बरा. हा प्रकार तिला कोणाला सांगताही येईना. तिला वाटे, तिला समजून घ्यायचे दूरच, घरच्यांनी तिची निर्भर्त्सनाच केली असती. मनाने अगदीच खचली होती ती.
निर्मलाचेही तसेच काहीसे झाले होते. तिची नजर नकळत पुरुषांच्या लैंगिक अवयवाच्या ठिकाणी जाई. ती ओशाळी व्हायची. पुरुषांना कदाचित तिची ही नजर कधी जाणवलीही नसेल. पण निर्मलाच्या मनात मात्र यायचे, काय म्हणतील हे सगळे पुरुष? कसली घाणेरडी बाई आहे. मग ती कानावर जोरजोरात हात मारायची व स्वत:चेच कान खेचून माफी मागत बसायची. तिच्या नवऱ्याला व मुलीला ती असे विचित्र का वागते, हे कळायचेच नाही. सुरुवातीला त्यांनी चालवून घेतले, पण नंतर नंतर ते तिला आपल्याबरोबर कुठे घेऊन जायचेच टाळायचे. यामुळे ती खूप एकाकी पडली व तिच्या विचित्र वागणुकीत वाढ झाली. अशा पद्धतीने ओसीडी हा बायकांमध्ये दिसणारा आजार आहे. असंबंध विचारांमुळे त्या ज्या काही कृती करतात, त्या मुळात या विचारांमुळे येणारा अस्वस्थपणा किंवा चिंता कमी करण्यासाठी. या कृती बऱ्याच वेळेला हास्यास्पद असतात आणि कुटुंबाला खूपच चिडचिडल्यासारखे वाटते.
कधी कधी एखाद्या प्रकारची कृती आपण उलटय़ा दिशेने फिरवली तर मनात आलेले भीतीदायक काल्पनिक चित्र नष्ट होईल असे रुग्णांना वाटते. आपल्या मुलाला अपघात झाला असे काल्पनिक चित्र सुहासिनीच्या मनात पुन्हा पुन्हा यायचे. या विचारांनी त्यांचा जीव घाबराघुबरा व्हायचा. मग त्या जिथे असतील तिथून सात पावले उलटय़ा चालत जात. हे खूप विचित्रच दिसायचे. नवऱ्याने व्यवस्थित समजून सांगितले की तू उलटी चालल्याने वाईट विचारांचा काहीच परिणाम होणार नाही, असे समजणे अवास्तव आहे. याशिवाय तुझ्या मनात आलेल्या या विचारांनी मुलाला खरंच अपघात घडेल यात तथ्य नाही. घरात समारंभ असो, लग्नप्रसंगी वा पार्टीला गेलेली असो, सुहासिनीच्या मनात आपल्या मुलाला भीषण अपघात होईल हे काल्पनिक चित्र डोळ्यासमोर आले की सात पावले उलटय़ा चालायच्या. अवतीभवतीच्या लोकांना ते विचित्रच वाटायचे. नंतर नंतर सगळे त्यांची थट्टाही करत.
मंत्रचळात मुळात हे विचार का येतात, कसे येतात, रुग्ण अशा विचित्र कृती का करतात हे कळण्यासाठी कोणतेही लॉजिक वा तर्कशास्त्र नाही. विचारांचे आणि कृतीचे हे चक्र
मनात अचानक सुरू होते व सुरूच राहते. रुग्णही हैराण होतात.
काही गर्भवती स्त्रियांमध्ये वा प्रसूतीनंतर मंत्रचळाचा आजार होऊ शकतो. या काळात काही बायकांना पहिल्यांदाच हा आजार होतो. याच्यामध्ये खूप हादरविणारे भयावह विचार स्त्रीच्या मनात येतात. जसे की, आपण आपल्या बाळाला चाकूने भोसकू या, गळा दाबून मारून टाकू या, िभतीवर आपटून मारून टाकू या. कधी कधी आपल्या बाळाला आपण भयानक आणि दुर्धर आजार दिला आहे, असा विचारही स्त्रीच्या मनात येतो. कधी कधी बाळाचे कपडे घाणीने खराब झालेले असतील म्हणून ते धूत राहणे किंवा बाळाला सारखे पुसून काढणे यांसारख्या कृतीही स्त्रिया करतात. एक बाई तर छोटय़ा बालकाचा लंगोटच बदलायला तयार नसायच्या. कारण त्यांना वाटायचे की लंगोट बदलताना आपण बाळाच्या लंगिक जागेवर दुखापत करू. शेवटी बाळाच्या मावशीला घरी येऊन राहावे लागले. कधी कधी काही माता आपल्या बाळाला दुसऱ्या कुणालाही हात लावू देत नाही. कारण त्यांच्या मनात आपल्या बाळाला लोकं घाणेरडे हात लावतील व तो सतत आजारी पडेल, असा मंत्रचळ यायचा.
या मंत्रचळांनी नातेवाईकांना काही समजेनासे होते, तर ती स्त्री मात्र वेडीपिशीच होते. मात्र हा आजार मेंदूतील रसायनाशी संबंधित आहे. यासाठी विचारांवरचा ताबा सुटला, मनावर काबूच नाही उरला, मन प्रगल्भ झालेले नाही असे समजण्याचे कारण नाही. आपल्याला लहानपणी स्वच्छता शिकवलीच नाही, घरात सगळीकडे नुसती घाणच होती किंवा आई जरा जास्त स्वच्छता करायला लावायची म्हणून हा आजार मला झाला, असेही समजण्याचे कारण नाही. यात आनुवंशिकतेचा भाग असतो. पुढे उपचारांमध्ये मुळात या रुग्णांना व त्यांच्या या आजाराला समजून घ्यायला हवे. त्याचे जैविक कारणसुद्धा समजून घ्यायला हवे. हा आजार विचित्र भासतो. फक्त रुग्णांसाठी तो खूप त्रासदायक आजार आहे.
या आजारात आज अनेक प्रकारची औषधे आलेली आहेत. औषधे देऊन मेंदूतील रसायनांना समतोल केल्यावर आजारात फरक दिसतो. यामुळे त्यांच्या असंबंध विचारांची तीव्रता कमी होते. ओसीडीचे उपचार तसे दीर्घकाळ चालू राहतात. औषध व वर्तणूक उपचार पद्धती दिल्यास रुग्णात जास्त चांगला परिणाम दिसून येतो.
या असंबद्ध विचारांनी किंवा मंत्रचळाने येणारा मनावरचा ताण कसा कमी करायचा, हे महत्त्वाचे आहे. विचारांमधली अवास्तविकता व विसंगती रुग्णास आणि त्यांच्या नातेवाईकांना समजावून सांगणे गरजेचे आहे. विचारांमुळे येणाऱ्या बेचनीला कमी करण्यासाठी ज्या विचित्र कृती व्यक्ती करते, त्यांना आळा घालून बेचनीस सामोरे जायला शिकवावे लागते. बेचनीस सामोरे जायला एकदा का रुग्ण शिकले की आजाराच्या चक्रव्यूहातून रुग्ण बाहेर पडायला नक्कीच शिकतो.
डॉ. शुभांगी पारकर -pshubhangi@gmail.com

Looking for a job Elon Musk is hiring engineers designers and more at artificial intelligence AI company xAI
एलॉन मस्कच्या कंपनीत काम करायचयं? ‘या’ पदांसाठी होणार भरती; कंपनीची ‘ही’ पोस्ट वाचलात का?
fact check around 12 years old video of nitin gadkari criticizing former pm manmohan singh govt falsely linked to lok sabha election 2024
“पंतप्रधानांचे वक्तव्य लोकशाहीविरोधी…”; नितीन गडकरींची पंतप्रधान मोदींवर टीका? व्हायरल VIDEO मागील सत्य काय? वाचा
Amit Kalyani Reappointed as Vice Chairman and MD of Bharat Forge
भारत फोर्जच्या उपाध्यक्षपदी अमित कल्याणींची पुनर्नियुक्ती
vvpat counting supreme court
ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या मतमोजणीबाबत सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस