22 July 2018

News Flash

समाज ऋणाईतलं सहजीवन

आई, अगं, हे लोक वर्षांचे बाराही महिने फक्त हेच खातात

नवरा-बायकोचं नातं त्यांचं सहजीवन कसं आहे त्यावर ठरत असतं. ‘दोन ध्रुवावर दोघे आपण’ असं म्हणत जगणारी जोडपीही असतात; परंतु काही जोडपी मात्र एकमेकांच्या साथीनेच पुढे जातात. मिळून स्वप्नं पहातात आणि ती पूर्ण करण्यासाठी आयुष्य वेचतात. मग ते स्वप्न समाजसेवेचं असो, एकत्रित व्यवसाय करण्याचं असो वा एखादा प्रकल्प पूर्ण करण्याचं. अशाच काही जोडप्यांच्या सहजीवनाची आणि त्यातून निर्माण झालेल्या नवनिर्माणाची कहाणी सांगणारं हे सदर, दर पंधरा दिवसांनी.

 

15

सहजीवन असतं परस्परांना फुलवणं
एकच गाणं दोन्ही गळ्यांत उमलणं
विशाल जामकर व वर्णिका अरोरा या तरुण उच्चशिक्षित दांपत्याच्या सहजीवनाकडे पाहताना सुनीती सु. र. यांच्या या काव्यपंक्ती तर आठवतात. ‘प्रदान’ या आदिवासींच्या मूलभूत विकासासाठी प्रयत्नशील असलेल्या स्वयंसेवी संस्थेच्या (एन.जी.ओ.) माध्यमातून या दोघांनी गेली काही र्वष समाजकार्यासाठी स्वत:ला झोकून दिलंय. देशासाठी, देशातील गरीब जनतेसाठी काहीतरी ठोस काम करू इच्छिणाऱ्या तरुण-तरुणींसाठी मार्गदर्शक ठरावी, अशी ही या जोडप्याच्या आजवरच्या प्रवासाची कहाणी.
विशाल हा रायगड जिल्ह्य़ातील उरणमधील एका मराठी मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेला एक बुद्धिमान मुलगा. यू.डी.सी.टी.तून केमिकल इंजिनीयरिंगची पदवी घेतल्यावर भक्कम पगाराची नोकरीही मिळाली, पण याची स्वप्नं वेगळीच होती.. प्राथमिक गरजांचीही पूर्तता करू न शकणाऱ्या वंचितांचं खडतर आयुष्य सुकर बनवण्याचं स्वप्नं. दरम्यान, ‘प्रदान’ (प्रोफेशनल असिस्टन्स फॉर डेव्हलपमेंट अ‍ॅक्शन) विषयी समजलं. इथे काम करण्यासाठी सोशल वर्कच्या पदवीची अट नव्हती. १६ मे २००५ या दिवशी विशाल मध्य प्रदेशातील हौशंगाबाद जिल्ह्य़ातील केसला तालुक्यात रुजू झाला.
विशालच्या प्रगतीची आणि त्यातून येणाऱ्या आर्थिक स्थैर्याची स्वप्नं पाहणाऱ्या आईवडिलांना त्याचा हा निर्णय पचवणं खूप जड गेलं. हा संघर्ष पाच र्वष चालला. या काळात त्याच्या समर्थनार्थ लहान बहीण, अभिनेत्री वीणा जामकर निर्धाराने उभी राहिली. ती त्याच्यासोबत त्या गावात येऊन राहायची. त्याचं कौतुक करायची. छान छान पुस्तकं, सिनेमे पाठवायची. त्या अवघड दिवसात तिच्या पाठिंब्यामुळेच विशाल या क्षेत्रात इतक्या ठामपणे उभा राहू शकला. उरणच्या महानगरपालिकेच्या कन्याशाळेत मुख्याध्यापिका असलेल्या विशालच्या आई (अलका जामकर) म्हणाल्या, ‘‘आपलं पोर राहातंय तरी कुठे, हे बघायला जेव्हा मी तिथे प्रथम गेले तेव्हा तव्यावरच्या गरमगरम तूप लावलेल्या पोळीशिवाय पोळी न खाणारा माझा मुलगा वरीसारख्या धान्याचा भात आणि पाणीदार डाळ यावर जगतोय हे पाहून मी रडले.’’ यावर विशालचं उत्तर होतं, ‘‘आई, अगं, हे लोक वर्षांचे बाराही महिने फक्त हेच खातात. तरीही स्वत:च्या अत्यल्प उत्पन्नात ते आमच्यासारख्यांना महिना महिना सामावून घेतात हे किती महत्त्वाचं!’’
वर्णिकाला, सधन घरातील या पंजाबी मुलीला घरच्यांचा कायम पाठिंबा होता. मानसशास्त्रात द्विपदवीधर (मास्टर्स) झाल्यावर एक वर्षभर वेगवेगळ्या प्रोजेक्टवर काम केल्यावर २०१० मध्ये ती ‘प्रदान’मध्ये कार्यरत झाली. बंगालमधील पुरुलिया जिल्ह्य़ातील बलरामपूर या हजार-दीडहजार वस्तीच्या गावातून तिच्या नव्या जीवनाला प्रारंभ झाला.
तळागाळातल्या लोकांच्या विकासासाठी उच्चशिक्षित तरुणांनी एकत्र येऊन अशा विविध लोकसमूहांसोबत राहून काम करायला हवं या विचारातून दीप जोशी व सहकाऱ्यांनी १९८३ मध्ये दिल्लीत ‘प्रदान’ची स्थापना केली. या कामासाठी त्यांना रॅमन मॅगसेसे व भारत सरकारचा ‘पद्मश्री’ पुरस्कार मिळालाय. ‘प्रदान’मध्ये रुजू झाल्यावर पहिल्या वर्षांच्या प्रशिक्षणाच्या काळात आदिवासी पाडय़ातील एका घरी एक महिना मुक्काम (व्हिलेज स्टे) हा पहिला टप्पा. वास्तवाचं भान येण्यासाठी हा टप्पा महत्त्वाचा. इथे प्रत्येक उमेदवारासाठी एक अनुभवी मार्गदर्शक (फिल्ड गाइड) असतो. तसंच या प्रथम वर्षांत भारतातील उत्कृष्ट मानसशास्त्रज्ञांबरोबर एक-एक आठवडा अशी तीन सत्रं आयोजली जातात. या सुरुवातीच्या काळातील दोघांचेही अनुभव विलक्षण होते. विशालला तर प्रथम दिवसभर काय करायचं तेच समजत नव्हतं. आत्तापर्यंत काही असाइनमेंट असेल तरच अभ्यास अशी सवय लागलेली. पण चारच दिवसांनी गावातल्या एका लग्नात तिथल्या लोकांनी त्याला ओढून नेलं. तिथे त्याने सगळ्यांबरोबर जेवण बनवलं, नाचला आणि मग त्यांच्यातला होऊन गेला.
वर्णिका तर वातानुकूलित घरामधील स्वतंत्र खोलीत राहणारी (वर्णिकाचा अर्थच चंद्राची कोर) मुलगी. तिचे प्रश्न वेगळे. आंघोळ उघडय़ावर करायची. त्यासाठी एका मोठय़ा हौदाच्या एका बाजूला पुरुष, समोर स्त्रिया आणि पलीकडे गुरं अशी व्यवस्था. उठा-बसायची-झोपायची म्हणून जी एकच खोली होती, त्यातच कोपऱ्यात बकऱ्या बांधलेल्या. शिवाय ती तिथे गेली तेव्हा उन्हाळा होता. तापमान ५० अंश सेल्सियस. विजेचा ठावठिकाणाही नाही. हे सगळं तिनं निभावलं. मात्र ‘झिरो प्रायव्हसी’ या गोष्टीशी जुळवून घेणं तिला काहीसं जड गेलं.
एक महिन्याच्या खेडय़ातील वास्तव्यानंतर आपल्याला हेच काम करायला आवडतंय हा त्या दोघांचा विश्वास आपापल्या जागी पक्का झाला. नंतर कामाची पहिली पायरी म्हणजे गावातल्या बायकांचे बचत गट बांधणं. हे बचत गट बँकेशी जोडून कमी व्याजात कर्ज घेऊ शकतात. त्यामुळे सावकारी पाशातून त्यांची सुटका होते. विशाल म्हणाला, ‘‘शेतीचं उत्पन्न वाढवण्यासाठी आम्ही इथल्या आदिवासींना ‘श्री’ पद्धतीने (सिस्टीम ऑफ रूट इटेन्सीफिकेशन) लागवड करायला शिकवतो. ज्यामुळे केवळ दोन किलो बियाणातून कमीत कमी १५०० किलो तांदूळ मिळतो. तूरडाळीसाठीही हीच पद्धत वापरली जाते. तसंच टोमॅटो, दुधी आदी भाज्यांचं उत्पन्न वाढावं यासाठीही मार्गदर्शन दिलं जातं. आमचे आदिवासी आता घरोघरी जैविक खत, शेणखतंही बनवतात. त्यांचं कष्टमय जीवन सुकर होण्यासाठी जे शक्य आहे ते ते आम्ही करतो.’’
वेगवेगळ्या राज्यात काम करणाऱ्या या दोन जीवांची, विशाल आणि वर्णिकाची ओळख झाली ती एकत्रित विविध बैठका आणि प्रशिक्षण कार्यक्रमाच्या निमित्तानं. समान विचारधारेबरोबर इतर आवडीही जुळल्या आणि २०१३च्या मेमध्ये रजिस्टर पद्धतीने शुभमंगल झालं. तोपर्यंत विशालकडे ७ वर्षांचा अनुभव जमा झाला होता. तरीही ग्रुपलीडर या पुढच्या पदासाठी त्याने जम बसलेला हौशंगाबाद जिल्हा न निवडता, ज्या ठिकाणी ‘प्रदान’चा शिरकावही झाला नव्हता अशा जागी म्हणजे छत्तीसगडमध्ये काम सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यानुसार विशाल जामकर व वर्णिका अरोरा हे नवपरिणीत जोडपं छत्तीसगडमधील उत्तर बस्तर कांकेर जिल्ह्य़ातील भानुप्रतापपूर या ३००० लोकसंख्येच्या कसब्यात भाडय़ाच्या जागेत राहायला आलं.
या भागात विशालची आठ जणांची टीम काम करते. इथले आदिवासी गोंड जमातीचे. सुरुवातीला त्यांचा विश्वास संपादन करण्यातच बराच वेळ गेला. मात्र गेल्या ३ वर्षांत इथल्या अडीच हजार आदिवासी महिला बचत गटांद्वारे संघटित झाल्यात. वर्णिका घरचं सगळं आटपून सकाळी ११ वाजता मोटारसायकलवरून बाहेर पडते आणि वेगवेगळ्या पाडय़ांवर जाऊन तिथल्या स्त्रियांशी चर्चा करत त्यांना आहार, स्वच्छता यासंबंधी मार्गदर्शन करत, शेतीच्या हंगामात त्यांच्यासोबत शेतात काम करत संध्याकाळी सहापर्यंत घरी परतते. तिच्याकडे सहा पंचायतीतील हजारभर परिवारांची जबाबदारी आहे. आता इथल्या बऱ्याच जणी शेतीची सर्वच कामं एकटीच्या हिमतीवर करू लागल्यात.
‘तुमच्या दोघांच्या बोलण्यात सतत कामाचेच विषय असतात की..’ माझं बोलणं संपायच्या आतच विशाल म्हणाला, ‘‘क्षेत्र एकच असल्यानं कामाचे विषय अपरिहार्य. पण त्याबरोबर एकमेकांना पुरेशी स्पेस देणं हे आम्ही महत्त्वाचं समजतो. आम्हा दोघांना गाण्यांची प्रचंड आवड आहे. शिवाय मला चित्रपटांचं वेड आहे. इथे थिएटर नसल्यानं आम्ही लॅपटॉपवर डाऊनलोड करून सिनेमे बघतो. लहर आली तर त्यासाठी २०० कि.मी. दूर असणाऱ्या रायपूरलाही जातो. वर्णिका दिवसभर उन्हातान्हात भटकते म्हणून रात्रीच्या स्वयंपाकाची जबाबदारी विशालनं घेतलीय. अशा सहकार्यामुळे घर आणि काम यातलं अंतर पार मिटून गेलंय.
आज विशालला खंत वाटते ती ‘प्रदान’च्या ४०० जणांच्या कुटुंबात फक्त चार मराठी माणसं आहेत याची. दोघांचंही कळकळीचं सांगणं असं, ‘‘इथलं काम म्हणजे घरावर तुळशीपत्र ठेवून करायचं काम नव्हे. आम्हालाही चांगला पगार, रजा, विमा अशा सर्व सुविधा आहेत. तुमच्या आमच्या आयुष्यात फरक इतकाच की आम्ही आमच्या हुशारीचा उपयोग कुणा श्रीमंत उद्योजकासाठी न करता, त्याची ज्यांना खरी गरज व किंमत आहे अशांसाठी करतो. त्यामुळे मिळणाऱ्या मानसिक समाधानाला तोड नाही. आमची ही वाट समजून घेतल्यावर कुणाला आपल्या शिक्षणाचा सदुपयोग तळागाळातल्या देशबांधवांच्या विकासासाठी करावासा वाटला तर फक्त साद घाला. आम्ही वाट पाहतोय.’’
संपर्क : विशाल – ०९४२५६१०१२७
vishal.jamkar@gmail.com
varnicaarora@gmail.com
waglesampada@gmail.com

First Published on January 2, 2016 1:20 am

Web Title: inspirational stories of couples who achieving something great