जाहिरातींमध्ये एखादी सुंदर स्त्री दाखवली की झालं, जाहिरात हिट होणारच; हा पूर्वीपासून असलेला फंडा आजही आहे. पण, आता यात थोडा बदल होतोय. या ‘स्त्री’मध्ये आता आजी दिसू लागली आहे. आजी व्यक्तिरेखा असलेल्या जाहिराती लोकप्रिय होताहेत.

एका सुप्रसिद्ध दागिन्यांच्या ब्रॅण्डची जाहिरात. पंजाबी घरातील मुलीचं लग्न ठरलंय आणि सगळे कुटुंबीय दागिनेखरेदीच्या लगबगीत आहेत. ज्या दुकानात हे पंजाबी कुटुंब आहे, तिथे एक दक्षिण भारतीय कुटुंबसुद्धा त्यांच्या लग्न ठरलेल्या मुलीसाठी दागिने पाहत आहेत. दक्षिण भारतीय लग्नरीतीनुसार मुलीसाठी नखशिखान्त दागिने घेताना पाहून इकडे पंजाबी आजी काहीशी हिरमुसते. आपल्या नातीला म्हणते, ‘‘तूसुद्धा एका दक्षिण भारतीय मुलासोबत प्रेमविवाह करायला हवा होतास. म्हणजे बघ तुला पंजाबी आणि दाक्षिणात्य अशा दोन्ही घरांकडून किती तरी दागिने मिळाले असते.’’ सर्व वयोगटातील बायकांची दागिन्यांची हौस किती मोठी असते, हे या जाहिरातीतून आपल्याला दिसत असले तरी या जाहिरातीतील ‘ब्रॉड माइंडेड’ आजी आपल्याला खास लक्षात राहते. घरातील वयस्क माणसे शक्यतो ‘आपल्या समाजाबाहेर लग्न कर’, असा सल्ला कधी देत नाही. मात्र त्याच्या अगदी विरुद्ध जाऊन आपल्या नातीने दाक्षिणात्य मुलाशी प्रेमविवाह करायला हवा होता, हे ती खेळकरपणे सुचवते. आजच्या अनेक जाहिरातींमधून आपल्याला ‘कूल ग्रॅनीज्’ दिसून येतात ज्या प्रत्यक्षातील पारंपरिक आजीपेक्षा हटके, फनलिव्हग आणि सुपर एनर्जेटिक या विशेषणांना साजेशा असतात.

पूर्वी जाहिरातक्षेत्रात असे मत होते की जर एखाद्या जाहिरातीत सुंदर मुलगी असेल तर ती जाहिरात १०० टक्के यशस्वी होईल. अर्थात हे सर्वमान्य मत नाही. तरीही पुष्कळ वेळेस आपण जाहिरातींमध्ये मुख्य पात्र म्हणून स्त्रियाच पाहतो. आज मात्र फक्त तेवढेच दिसत नाही. सर्वसामान्य व्यक्तिरेखा डोळ्यांसमोर ठेवत त्यांच्या अविस्मरणीय प्रस्तुतीकरणावर भर दिला जात आहे. सध्या ज्या जाहिराती आपण पाहतो त्यात दैनंदिन आयुष्यातील घडामोडी दाखवण्यावर भर दिला जातो. ज्याचे सामान्य प्रेक्षकाच्या आयुष्याशी साधम्र्य असते किंवा साधारण व्यक्तिरेखा चाकोरीबाहेरच्या गोष्टी करताना दाखवून प्रेक्षकाला आश्चर्यचकित केले जाते. यामुळेच या हटके व्यक्तिरेखा आपल्याला लक्षात राहतात. चाकोरीबाहेरच्या व्यक्तिरेखा उभ्या करून आपला ब्रॅण्ड लोकप्रिय करण्याचा प्रयत्न अनेक जाहिरातदारांनी केल्याचे आपण पाहिलेले आहे. उदाहरणार्थ ‘फाइव्हस्टार चॉकलेट’च्या जाहिरातीतील ‘रमेश-सुरेश’ ही जोडगोळी लोकप्रिय ठरली होती. इतकेच नाही तर व्होडाफोनच्या जाहिरातीतील ‘पग’ लक्षवेधी ठरला होता.

या जाहिरातींमध्ये दाखवल्या गेलेल्या आजी पारंपरिक नाहीत, त्या तरुण पिढीशी सहज जुळवून घेणाऱ्या, त्यांच्याशी कनेक्ट होणाऱ्या दाखवल्या आहेत. या व्यक्तिरेखा सशक्त आणि अविस्मरणीय होण्यासाठी या व्यक्तिरेखा अनपेक्षित गोष्टी करताना दाखवल्या आहेत. उदाहरणार्थ म्हातारपणी आपल्या नातवाकडून सायकिलग शिकणारी आजी किंवा गाना.कॉमच्या जाहिरातीतील मनमुराद नाचणारी आजी.

आपल्या आजूबाजूला किमान एक तरी वयस्क व्यक्ती आपण बघतो जी मनाने तरुण, उत्साही, ब्रॉड माइंडेड आहे, अनेकांना प्रिय आहे तसेच ती तरुणांशी सहज कनेक्ट होते. सशक्त तसेच हटके व्यक्तिरेखा दीर्घकाळ टिकणारा संदेश देऊन जातात, असे एका सुप्रसिद्ध चॉकलेट कंपनीत ब्रॅण्ड मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या विनय राणे यांचे मत आहे.

कूल ग्रॅनीज्च्या यादीतील एक चेहरा म्हणजे मराठीतील चतुरस्र अभिनेत्री ज्योती सुभाष. टाटा स्काय, अ‍ॅमेझॉन, टाटा कॉफी यांसारख्या अनेक जाहिरातींतून त्या झळकल्या. जाहिरातींतील आपल्या अनुभवाविषयी बोलताना त्या म्हणाल्या, ‘‘गेल्या दोन-तीन वर्षांपासून मी जाहिरातींतून काम करायला लागले. ज्या वेळी जाहिरातींतून काम करण्याविषयी विचारणा झाली त्या वेळी एक नवा अनुभव घेऊन पाहू, असे म्हणत काम करायला सुरुवात केली. ‘टाटा कॉफी’ची जाहिरात तामिळ भाषेत करायची होती, हे सुरुवातीला ठाऊकच नव्हते. जेव्हा कळले तेव्हा थोडे टेन्शन आले होते. मात्र सरावाने तेही जमले. माझे काम अनेकांना आवडत आहे. माझ्या राष्ट्रीय नाटय़विद्यालयातील मित्रमत्रिणींनीही खूप कौतुक केले.’’ त्या पुढे म्हणाल्या, ‘‘जाहिरातींतून दाखवण्यात येणाऱ्या व्यक्तिरेखांची मते किंवा त्यांची वागणूक मला पटेलच असे नाही; परंतु त्या व्यक्तिरेखा मला मजेशीर वाटल्या. मी ज्या पद्घतीने अभिनय शिकले त्यात सरावाला जास्त महत्त्व आहे. मात्र हे क्षेत्र खूप आव्हानात्मक असून त्यात सरावाला, व्यक्तिरेखा समजून घेऊन काम करायला फारच कमी वेळ मिळतो. त्यामुळे कलाकारास अधिक प्रयत्न करून कमी वेळात उत्तम सादरीकरण करायचे असते.’’

कथेकडे लक्ष वेधून घेण्यासाठी सशक्त व्यक्तिरेखा उभ्या करणे जाहिरातींसाठी आवश्यक असते. गेल्या अनेक वर्षांच्या काळात जाहिरातींमध्ये वेगवेगळ्या व्यक्तिरेखांनी मध्यवर्ती भूमिका केल्याचे आपण पाहिले आहे. स्त्रिया आणि लहान मुलांच्या जाहिरातींनी दीर्घकाळ गाजवला होता. आता या ‘कूल ग्रॅनीज्’सुद्धा त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण कामामुळे आणि हटके संकल्पनेमुळे प्रभावी ठरल्या आहेत.
वरद लघाटे – response.lokprabha@expressindia.com