जाहिरात क्षेत्रात आता नवनवीन प्रयोग होताहेत. त्यापैकीच एक म्हणजे लाँग अ‍ॅडव्हर्टाइजमेण्ट. साधारण ३ ते ५ मिनिटांत आशयपूर्ण कथा सांगून उत्पादनाची जाहिरात करण्यात काही ब्रॅण्ड्स यशस्वी झाले आहेत.

एका परदेशी विमान कंपनीत रुजू झालेल्या एका हवाईसुंदरीची भारतात जाणाऱ्या विमानावर पहिल्यांदाच नियुक्ती झाली आहे. या प्रवासाबद्दल, त्यात भेटणाऱ्या माणसांबद्दल ती साशंक आहे. आपला हा प्रवास कसा होईल, याची तिला काळजी वाटत असते, मात्र तो ताण चेहऱ्यावर न दाखवता ती आपलं काम चोख करायला सुरुवात करते. दरम्यान, ती एका वयस्क स्त्रीप्रवाशाला पाहते. त्या आजी हा प्रवास एकटीनेच करत असल्याचे तिला कळते. ती हवाईसुंदरी आजींकडे जाऊन त्यांना काय हवं-नको ते पाहत असताना तिच्या केसांच्या पिनेकडे आजींचं लक्ष जातं. हवाईसुंदरीच्या नकळत आजी तिची पिन व्यवस्थित लावून देते. त्यांच्याशी बोलताना तिला समजतं की त्या आपल्या मुलाला भेटून भारतात परतत आहेत. मात्र आपल्या मुलापासून दूर राहावे लागत असल्याने त्याच्या आठवणींनी आजींना भरून येत असतं. हे पाहून ती हवाईसुंदरी आजींची समजूत काढते. त्यांना बरं वाटावं म्हणून त्यांच्या आवडीचा एक कार्यक्रम ती विमानातील एंटरटेनमेंट सिस्टमवर सुरू  करून देते. थोडय़ा वेळाने आजींचा डोळा लागतो तेव्हा हवाईसुंदरी त्यांच्याजवळ जाऊन पांघरूण घालते.

काही तासांनी प्रवास संपतो, विमान लँड होते. हवाईसुंदरी प्रवाशांना निरोप देण्यासाठी हसऱ्या चेहऱ्याने उभी राहिलेली असते. विमानातून बाहेर पडताना आजी तिचे मन:पूर्वक आभार मानते आणि तिच्या परतीच्या विमानाविषयी चौकशी करतात. तिला दोन दिवसांनी परतायचे आहे, हे कळल्यावर आजी तिला आग्रहाने आपल्या घरी यायचे आमंत्रण देते. सुरुवातीला ती आढेवेढे घेते. मात्र आजींचा आग्रह तिला मोडवत नाही. ती दुसऱ्या दिवशी आजींकडे जाते तेव्हा तो दिवस सणाचा असल्याने घरात उत्साही वातावरण असते. तिचेही आपुलकीने स्वागत होते. स्वत: आजी विशेष बेत तयार करण्यात मग्न असते. तिच्या येण्याने आजींना फारच आनंद होतो. ती दिवसभर त्या घरी थांबते, त्यांच्या पाहुणचाराचा आनंद लुटते. निरोप घेताना तिलाही भरून येतं. निघतेवेळी त्यांच्या भेटीची आठवण म्हणून आजी तिला एक सुंदर रुमाल देते ज्यावर एका हवाईसुंदरीच्या प्रतिमेचे विणकाम केलेले असते. ते पाहून ती हवाईसुंदरी हरखून जाते. सुरुवातीला भारतातील प्रवासाविषयी साशंक असणाऱ्या तिला आजींच्या भेटीने एक अविस्मरणीय आणि खूप काही शिकवून जाणारा अनुभव मिळतो ज्यामुळे तिचे भारताविषयी, इथल्या माणसांविषयी चांगले मत तयार होते. ‘ब्रिटिश एअरवेज’ने  जानेवारी महिन्यात प्रसृत केलेल्या जाहिरातीची गोष्ट. भारतातील आपल्या विमानसेवेची व्याप्ती वाढावी, या हेतूने काही दिवसांपूर्वी ही जाहिरात प्रसृत केली होती. आता एवढी मोठी गोष्ट फक्त ३० सेकंदांमध्ये कशी दाखवली असेल असा प्रश्न पडणे साहजिक आहे; मात्र ही जाहिरात होती तब्बल सहा मिनिट्स, ३० सेकंद इतक्या कालावधीची. आजवर यूटय़ूबवर काही लाख लोकांनी ही जाहिरात पाहिली आहे.

डिजिटल माध्यमांमुळे ज्या नवीन संकल्पना आपल्यासमोर आल्या, त्यापकी एक संकल्पना म्हणजे ‘लाँग फॉरमॅट अ‍ॅडव्हर्टाइजमेण्ट्स (जास्त कालावधी असणाऱ्या जाहिराती). एअरटाइम कॉस्ट म्हणजे जाहिरात दाखवण्याचे मूल्य जास्त असल्यामुळे जाहिरातकारांसाठी डिजिटल माध्यम आवडीचा पर्याय झाला आहे. ‘लाँग फॉरमॅट अ‍ॅडव्हर्टाइजमेण्ट्स’ म्हणजे खरे तर जाहिरातपटच असतात. त्यातून ज्या उत्पादनाची वा सेवेची जाहिरात केली आहे त्यापेक्षाही जाहिरातीची कथा, तिचे सादरीकरण यावर भर दिला जातो.

दोन वर्षांपूर्वी ‘गुगल’ने केलेली जास्त कालावधीची जाहिरातसुद्धा खूप लोकप्रिय झाली होती. त्यात दोन वृद्ध मित्रांची गोष्ट सांगितली होती. आपल्या दुकानात बसून एक आजोबा त्यांच्या नातीला त्यांच्या बालपणीचे किस्से, जीवलग मित्रासोबत केलेल्या खोडय़ा असा सगळा आठवणींचा पटच उलगडत असतात. मात्र आपल्या बालमित्राला अनेक र्वष भेटता न आल्याचं दुख त्यांना सलत असतं. या दुराव्याचं कारण म्हणजे फाळणी. तो बालमित्र फाळणीनंतर लाहोरला स्थायिक होतो, तर हे आजोबा दिल्लीत. त्यांना आपल्या मित्राला भेटण्याची तीव्र इच्छा होत असते. हे पाहून आजोबांची नात त्यांना वाढदिवसांचं ‘सरप्राइज’ द्यायचं ठरवते. आजोबांनी वर्णन केल्याप्रमाणे ती इंटरनेटवरून लाहोरमधील त्या मित्राचा ठावठिकाणा, त्यांचा संपर्क शोधते. लाहोरमधील ‘त्या’ आजोबांच्या नातवाच्या मदतीने त्यांच्या दिल्लीवारीची योजना आखते. ते येण्याच्या दिवशी त्यांचं विमान किती वाजता लँड होणार याची वेळ आपल्या स्मार्टफोनवरून पाहते. ठरलेल्या वेळी लाहोरवरून तो मित्र येतो आणि ही अविस्मरणीय पुनभ्रेट त्या दोघांनाही बालपणात घेऊन जाते. ही कथाही तिच्या दमदार आशयामुळे लक्षात राहते. या जाहिरातीद्वारे ‘गुगल’ने आपलं सर्च इंजिन, अन्य सेवा किती वेगवान, सोयीस्कर आणि उपयुक्त आहे, हे अतिशय सहजपणे, सूचक पद्धतीने दाखवले होते. ही जाहिरात कालावधी तीन मिनिट्स, ३० सेकंदांची होती.

या जाहिरातींचा कालावधी जास्त असतो त्याची काही कारणे आहेत. प्रत्येक जाहिरातीचा एक ठरावीक प्रक्षेपणकाळ (स्लॉट) असतो. उदाहरणार्थ, टीव्हीवर अमुक एका वेळेत १० सेकंदांच्या कालावधीसाठी एक जाहिरात दाखवायची असेल तर त्या ‘एअरटाइम’ची किंमतच काही लाखांत असते. त्यामुळे टीव्हीवर लाँग फॉरमॅट अ‍ॅडव्हर्टाइजमेण्ट्स दाखवणे हे खर्चीक असते. म्हणूनच डिजिटल माध्यमांना प्राधान्य दिले जाते. भारतात इंटरनेट घराघरात पोहोचल्यामुळे या जाहिराती पाहणारा प्रेक्षकवर्ग वाढत आहे. डिजिटल माध्यमांचा आणखी एक फायदा असा की आपली जाहिरात किती लोकांपर्यंत पोहोचली आहे, याचे मोजमाप करता येते. उदाहरणार्थ, यूटय़ूबवर किती लोकांनी जाहिरात पाहिली आहे, हे सांगणारा एक आकडा दिसतो. सशक्त कथा आणि उत्तम सादरीकरणामुळे आपल्या ग्राहकांच्या मनात स्थान पक्के करण्यासाठी ब्रँड्सना लाँग फॉरमॅट अ‍ॅडव्हर्टाइजमेण्ट्समुळे मदत होते. या जाहिरातींचे  चित्रीकरण करण्यासाठी लागणारा वेळ अर्थातच जास्त असतो. आशय, सादरीकरणाच्या उच्च दर्जामुळे त्यांचे निर्मितीमूल्य जास्त असते. त्या तुलनेत इंटरनेट हा स्वस्त पर्याय आहे.

वेगवेगळ्या माध्यमांच्या वाढत्या संख्येमुळे जाहिरातींचा महापूर आलेला आहे, पण आपली जाहिरात लोकांना आठवत राहावी (रिकॉल), हा त्यांचा मूळ उद्देश असल्याने अनेक जाहिरातदार आपली जाहिरात वैशिष्टय़पूर्ण करायचा प्रयत्न करत असतात. लाँग फॉरमॅट अ‍ॅडव्हर्टाइजमेण्ट्समध्ये प्रयोगशीलतेला वाव मिळतो. काही दिवसांपूर्वी आलेल्या ‘फॉच्र्युन ऑइल’च्या जाहिरातीत एकवृद्धा आपल्या आजारी मुलाला जेवण घेऊन हॉस्पिटलमध्ये जाते आणि तिथल्या नर्सला आपल्या मुलाला घरचं जेवण भरवण्याची परवानगी मागते. सुमारे चार मिनिट्स कालावधी असलेल्या या जाहिरातीच्या शेवटपर्यंत आपल्या उत्पादनाचं नाव कळू न देताही योग्य तो परिणाम साधण्याची खबरदारी त्या ब्रँडने घेतली होती. आयसीआयसीआय बँकेची ‘बंदे अच्छे है’ ही टॅगलाइन घेऊन केलेली जाहिरातही तिच्या सादरीकरणामुळे लक्षात राहिली. दैनंदिन आयुष्यात अगदी लहानसहान कृतीतून आपल्या बायकोची, प्रेयसीची काळजी घेणाऱ्या पुरुषांचं चित्रण त्यात होतं. ‘अनूक’ या कपडय़ाच्या ब्रँडनेही ‘इंडिपेंडंट वुमन’ ही संकल्पना घेत लाँग फॉरमॅट अ‍ॅडव्हर्टाइजमेण्ट्सची मालिका तयार केली होती.

लाँग फॉरमॅट अ‍ॅडव्हर्टाइजमेण्ट्सविषयी बोलताना ‘गुलबदन टॉकीज’ या निर्मिती संस्थेचे सारंग साठय़े सांगतात की, आपण भारतात टीव्ही चॅनेल्स पाहण्यासाठी फार कमी पसे देतो. त्या तुलनेत परदेशातील दर जास्त आहेत. प्रेक्षकांकडून कमी शुल्क आकारल्याने वाहिन्यांना प्रामुख्याने जाहिरातींमधूनच पसा उभारावा लागतो आणि म्हणूनच टीव्हीवर जाहिराती दाखविणे खर्चीक बाब असते. डिजिटल माध्यमांमुळे आपल्याकडे लाँग फॉरमॅट अ‍ॅडव्हर्टाइजमेण्ट्सचा उदय झाला. या फॉरमॅटमुळे ब्रँडला आपल्या ग्राहकांमध्ये गुडविल तयार करायला मदत होते. इतर जाहिरातींच्या सततच्या माऱ्यामुळे प्रयोगशील जाहिरातकारांना आशयसमृद्धी, सादरीकरण आणि त्या जोडीने अर्थकारण यांचाही मेळ राखावा लागतो. यांसारख्या अनेक कारणांमुळे येत्या काही वर्षांत लाँग फॉरमॅट अ‍ॅडव्हर्टाइजमेण्ट्सचा ट्रेंड सुरू राहणार आहे व आपल्याला उत्तम कथा असलेल्या दर्जेदार जाहिराती पाहायला मिळतील.

  • साधारणत: २०१३ पासून भारतात लाँग फॉरमॅट अ‍ॅडव्हर्टाइजमेण्ट्स उदयास आल्या.
  • भारतामध्ये ई-कॉमर्स आणि फास्ट मूिव्हग कन्झ्युमर गुड्स कंपन्यांनी (शीतपेये , प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ) लाँग फॉरमॅट अ‍ॅडव्हर्टाइजमेण्ट्सचा ट्रेंड सुरू केला.
  • जाहिरातीच्या सेकंदभराच्या शॉटसाठी साधारण १५ मिनिटांचं फुटेज लागते. तसेच ३० सेकंदांच्या जाहिरातीसाठी सरासरी ४५० मिनिटांचं फुटेज आवश्यक असते. मूळच्या विस्तृत जाहिराती टीव्हीवर दाखवताना त्यांची वेळ कमी करून त्या अनेकदा थोडक्यात दाखवल्या जातात.
  • यूटय़ूब, फेसबुक, ट्विटर यांसारख्या समाजमाध्यमांमुळे या जाहिराती सहज ‘व्हायरल’ होतात. त्यांची लोकप्रियता वाढवण्यात समाजमाध्यमांचा मोठा वाटा असतो.

    वरद लघाटे – response.lokprabha@expressindia.com