मागच्या लेखात आपण लाँग फॉरमॅट अ‍ॅडव्हर्टाइजमेण्ट्सची कशी चलती आहे, हे पाहिले होते. डिजिटल माध्यमांमुळे जसा लाँग फॉरमॅट अ‍ॅडव्हर्टाइजमेण्ट्सचा ट्रेंड आहे तसाच वेबिसोड्सचासुद्धा ट्रेंड सुरू आहे. वेबिसोड म्हणजे वेबवरील एपिसोड (संकेतस्थळावरील मनोरंजनात्मक मालिकेचा भाग). अनेक ब्रँड्स आपल्या उत्पादनाचा फार गाजावाजा न करता अगदी खुबीने त्याची जाहिरात करताना दिसून येतात.

गेल्या काही वर्षांपासून विशेषत: २०१० पासून टीव्हीएफ, एआईबी  यांसारख्या यू-टय़ुब वाहिन्या (चॅनेल्स) उदयास आल्या आणि त्यांची लोकप्रियताही झपाटय़ाने वाढू लागली. या वाहिन्यांवरचे व्हिडीओज् खूप मोठय़ा प्रमाणावर शेअर केले जातात. या वाहिन्यांवर सादर केल्या जाणाऱ्या विनोदी आणि युथफूल कार्यक्रमांची वाढती लोकप्रियता लक्षात घेऊन चित्रपटक्षेत्रातील काही सुपरस्टार्सही इकडे झळकू लागले. शाहरुख खानने त्याच्या ‘हॅप्पी न्यू इयर’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी टीव्हीएफ या वाहिनीची मदत घेतली होती. आज याच वाहिन्यांच्या मदतीने अनेक ब्रँड्स आपल्या उत्पादनांची जाहिरात या वाहिन्यांवरील वेबिसोडच्या मदतीने करत आहेत.

एखाद्या चित्रपटात कलाकाराच्या तोंडी एका विशिष्ट उत्पादनाची भलामण करणारी, त्याचे महत्त्व सांगणारी वाक्ये असतात. ते उत्पादन दाखवलेही जाते. याला इनफिल्म अ‍ॅडव्हर्टाइजमेण्ट म्हणतात. खूप वर्षांपूर्वी प्रदíशत झालेल्या ‘ताल’ या चित्रपटात कोकाकोला या शीतपेयाचे याच पद्धतीने जाहिरातीकरण केले होते. वेबिसोडच्या माध्यमातून जाहिरात करणे हा इनफिल्म अ‍ॅडव्हर्टाइजमेण्टपेक्षा पूर्णत: वेगळा प्रकार आहे. त्यात उत्पादन काय आहे, त्याची वैशिष्टय़े काय आहेत हे लक्षात घेऊन त्याची योग्यरीतीने प्रसिद्धी व्हावी यासाठी एक सुसंगत नवी कथा रचली जाते आणि त्या कथेत विशिष्ट उत्पादनाची असलेली उपयुक्तता पटवली जाते. आमचे उत्पादन वापरून पाहा किंवा सवलतीच्या दरात विकत घ्या, असे थेट आवाहन त्या वेबिसोडमध्ये अजिबात नसते.

उदारणार्थ ‘कॉमन फ्लोअर’ या रिअल इस्टेट क्षेत्रातील संकेतस्थळाने टीव्हीएफशी करार करून ‘पर्मनन्ट रुममेट्स’ ही लोकप्रिय वेबमालिका तयार केली होती. नऊ भागांच्या या मालिकेचा प्रत्येक भाग साधारणत: १५ मिनिटांचा असायचा. एका तरुण जोडप्याभोवती गुंफलेल्या कथेत फक्त दोन भागांत ‘कॉमन फ्लोअर’चा उल्लेख होता. एक तरुण जोडपे आपल्या आयुष्यात ‘कॉमन फ्लोअर’चा उपयोग कसा करून घेईल, हे त्यात अधोरेखित केले होते. सध्या या मालिकेचा दुसरा सिझन सुरू आहे आणि त्याला तुफान प्रतिसाद मिळत आहे. टीव्हीएफला तेरा लाखांहून अधिक प्रेक्षक असल्याने चित्रपटक्षेत्राचे लक्ष या वाहिनीकडे आहे.

‘बीइंग इंडियन’ या वाहिनीवर असूस या मोबाइल कंपनीने ‘एक अपहरण : द किडनॅप्ड’ हा वेबिसोड तयार केला होता. त्यात एका तरुणाचे अपहरण झालेले दाखवण्यात आले होते. मरण्याच्या अगोदर त्याची शेवटची इच्छा काय आहे, हे अपहरणकर्ता डॉन त्याला जेव्हा विचारतो, त्यावेळी नेमका त्या तरुणाच्या खिशातील फोन वाजतो. उत्सुकतेने डॉन जेव्हा तो फोन घेतो, तेव्हा मोबाइलवरील नावीन्यपूर्ण फिचर्स कशी वापरायची हे डॉनला सांगत त्याला शिताफीने गुंतवून ठेवतो. हे सगळे विनोदी पद्धतीने मांडण्यात आले आहे. ‘असूस’ची बॅटरी लाइफ किती जास्त आहे, हे सांगण्यासाठी त्या वेबिसोडची मनोरंजनात्मक निर्मिती केली होती.

फास्ट मूिव्हग कन्झ्युमर गुड्स (शीतपेये, प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ), बँकिंग अ‍ॅण्ड इन्शुरन्स, इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड्सना आपल्या लक्ष्य ग्राहकांपर्यंत (टाग्रेट ऑडिअन्स) पोहोचण्यासाठी वेबिसोड्सचा फायदा होत आहे. या ब्रँड्सना आपल्याकडे तरुणाईला मोठय़ा प्रमाणावर आकर्षति करायचे असल्याने असा डिजिटल कन्टेन्ट निर्माण करण्यात ब्रँड्स पुढाकार घेत आहेत. यासाठी ते डिजिटल कन्टेन्ट निर्माण करणाऱ्या वाहिन्यांची मदत घेत आहेत. यामुळे वाहिन्यांना आíथक लाभही होत आहे. शिवाय आजच्या तरुणाईला हे कमी कालावधीचे युथफूल व्हिडीओज् पाहणे आवडते. त्यामुळे डिजिटल कन्टेन्ट तयार करणाऱ्या वाहिन्यांसाठी आणि ब्रँड्ससाठी सुसंधी आहे.

तरुणांना १०-१५ मिनिटांचा हा विनोदी आणि मनोरंजनात्मक भाग आवडू लागल्याने या वाहिन्या सातत्याने नवनवे कार्यक्रम निर्माण करू लागल्या. मात्र ही सातत्यपूर्ण निर्मिती करताना वाहिन्यांना आíथक पाठबळाचीही गरज होती, त्यामुळे वेबिसोडच्या माध्यमातून ब्रॅण्डच्या जाहिरातीचा मार्ग त्यांनी स्वीकारला. गेल्या काही काळात इन-फिल्म प्रॉडक्ट प्लेसमेंट इतके वाढले की प्रेक्षकांना ती जाहिरातच आहे हे लक्षात आले. म्हणूनच वेबिसोड्स तयार करताना आपल्या कार्यक्रमातून एखाद्या उत्पादनाची थेट जाहिरात आहे, हे वाटू न देता मनोरंजन आणि जाहिरातीचा कलात्मक मेळ ब्रँड आणि वेबिसोड निर्मात्यांना साधावा लागणार आहे.
वरद लघाटे – response.lokprabha@expressindia.com