लहानसहान उद्योगधंदे आपल्याकडे यापूर्वीही सुरू झाले, चालवले गेले. पण आज तरुणाईला भुरळ पडली आहे ती स्टार्टअप संकल्पनेची. खरं तर स्टार्टअपची क्रेझच झाली आहे. पण म्हणून स्टार्टअप म्हणजे काय ते नेमकं माहीत झालं आहे असं नाही.

घरच्या फरशीची स्वच्छता करण्याचं काम गृहिणीसाठी फार वेळखाऊ आणि जिकिरीचं ठरतं. मग ती गृहिणी अमेरिकन का असेना! घरच्या फरशीची स्वच्छता करण्याचं काम सोपं व्हावं यासाठी १९९० मध्ये एका हरहुन्नरी, कल्पक गृहिणीने एका साध्या यंत्राचा शोध लावला. ‘मिरॅकल मॉप’ या नावाने ते यंत्र ओळखलं जाऊ  लागलं. ते वजनाला हलकं व्हावं यासाठी तिने प्लॅस्टिकचा दांडा वापरला आणि त्याच्या तळाशी लांबच लांब गुंडाळी होणारा कापसाचा बोळा बसवला. फरशीची सफाई झाल्यावर गृहिणीचे हात ओले न होता तो तळाचा कापूस बदलण्याची स्वयंचलित सोय त्यात केली होती. इतकी झकास कल्पना आणि ते यंत्र लोकांपर्यंत पोहोचवायचं कसं, हा विचार करत तिने अमेरिकेतील होम शॉपिंग नेटवर्कच्या वाहिनीचा आधार घेत आपल्या यंत्राची प्रात्यक्षिकं द्यायला सुरुवात केली. अल्पावधीत तो मॉप लोकप्रिय झाला आणि त्याची तडाखेबंद विक्री होऊ  लागली. लहानशा पण कल्पक मॉपच्या जोरावर ती गृहिणी गृहोपयोगी वस्तूंच्या क्षेत्रातील अमेरिकेतील आघाडीची उद्योजिका झाली. जॉय मँगॅनो हे तिचं नाव. ‘इंजिनीअर्स डिझाइन्स’च्या मालकीण असलेल्या या जॉयबाईंच्या जीवनावर ‘जॉय’ नावाचा चित्रपट गेल्या महिन्यात नाताळला प्रदर्शित झाला. सर्जक उद्योजिका असलेल्या जॉयबाईंचा जीवनप्रवास तितकाच प्रेरणादायी आहे. फक्त मॉपच नाही तर प्राण्यांसाठी असलेल्या ‘फ्लोरेसंट फ्ली कॉलर’च्या निर्मितीसाठीही त्या ओळखल्या जातात. ही कल्पना त्यांनी त्यांच्या वयाच्या सोळाव्या वर्षीच प्रत्यक्षात आणली. आता फ्लोरेसंट फ्ली कॉलर ही काय नवी भानगड! अशी शंका जर मनात आली असेल तर तिचं निरसनसुद्धा व्हायला पाहिजे. रात्रीच्या वेळी वाहनांचे धक्के लागून जखमी किंवा मृत होणाऱ्या प्राण्यांना वाचवण्यासाठी त्यांनी फ्लोरेसंट फ्ली कॉलरची शक्कल लढवली. जॉयबाईंच्या या उदाहरणावरून आपल्याला काय कळतं, तर एका लहानशा गरजेतून, युक्तीतून त्यांनी उद्योगाची सुरुवात झाली. तो उद्योग सुरुवातीला खूप लहान होता पण त्यात नावीन्य होते, व्यवसायवाढीला वाव होता. आजच्या भाषेत सांगायचं झालं तर त्यांनी स्टार्टअप उद्योग सुरू केला होता.

Elders Recreate Butterfly Song Dance cute video goes Viral
आयुष्य हे मनसोक्त जगावं! ‘बटरफ्लाय’ गाण्यावर वृद्ध लोकांचा भन्नाट डान्स, डान्स स्टेप्स एकदा पाहाच, VIDEO व्हायरल
Mom Finds Three Month Old Baby Rarest Cancer In Eyes By Mobile Flash Light What Are Signs Of Cancer Seen In Eyes Be Alert
मोबाईलचा फ्लॅश वापरून आईने बाळाला झालेला कॅन्सर ओळखला, काय होती लक्षणं, तुम्हीही काय काळजी घ्यावी?
Bitcoin Halving
बिटकॉइन हॉल्व्हिंग म्हणजे काय आणि क्रिप्टोसाठी त्याचा अर्थ काय?
What is tax harvesting and what to be careful about
Money Mantra: टॅक्स हार्वेस्टिंग काय असतं? ते करताना काय काळजी घ्यावी?

स्टार्टअप (उद्यमारंभ) या शब्दाने गेल्या दशकभरात विशेषत: तरुणाईला भुरळ घातली. आजघडीला ‘मला स्टार्टअप सुरू करायचंय’, असं म्हणणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. तेव्हा स्टार्टअप म्हणजे नेमकं काय, त्याचं वाढतं आकर्षण का आहे, त्याला आज इतकं महत्त्व का दिलं जात आहे, याचा विचार करणं गरजेचं आहे.

आज ‘स्टार्टअप’ या संकल्पनेची नेमकी आणि सर्वमान्य व्याख्या देता येणार नाही. वेबस्टर कोशाप्रमाणे स्टार्टअप म्हणजे ‘द अ‍ॅक्शन ऑर प्रोसेस टू गेट समथिंग इन मोशन’ अर्थात् एक ठरावीक गती येण्यासाठी केलेली कृती वा प्रक्रिया. दुसरी एक व्याख्या केली जाते ती म्हणजे उद्योगाच्या किंवा उद्योजकाच्या आयुष्यातील प्रारंभिक अवस्था जिचा प्रवास कल्पनेकडून उद्योगसंरचना, संलग्न अर्थव्यवहारांपर्यंत होतो. प्रसिद्ध उद्यमगुरू स्टीव्ह ब्लँक यांच्या मते स्टार्टअप म्हणजे (भविष्यकालीन) नफ्याचा विचार करून सुरू केलेली अंशकालीन (हंगामी / अस्थायी) उद्योगसंरचना.

स्टार्टअप आणि लघुउद्योग यांतील फरक

बऱ्याचदा स्टार्टअप म्हणजे फक्त एखादा लहान उद्योग अशी गैरसमजूत होते. मात्र त्यातील फरक समजून घेणे आवश्यक आहे. कुठल्याही स्टार्टअपमध्ये भविष्यात मोठा उद्योग होण्याची क्षमता असते. ब्लँक यांच्या मते स्टार्टअप उद्योगाच्या मालकाला फक्त स्वत:च स्वत:चा बॉस व्हायची इच्छा नसते तर जग जिंकायची महत्त्वाकांक्षा असते. पहिल्यापासूनच आपली ‘आयडिया’ कशी सर्वोत्तम आहे आणि तिच्या जोरावर बाजारपेठ कशी काबीज करता येईल आणि आपली कंपनी कशी मोठी होईल, उपलब्ध पर्याय सोडून ग्राहक आपल्याकडे नव्याने कसे वळतील किंवा आपणच नवी बाजारपेठ कशी तयार करू शकतो, याचा विचार असतो. आपल्या उत्पादनाची वैशिष्टय़े सांगत त्याला एक ठरावीक दृष्टी देणे, ग्राहक, वितरणव्यवस्था, अर्थकारण इ. ठळक घटकांचा अभ्यास स्टार्टअप उद्योजकाला करावा लागतो.

मग लघुउद्योग कशाला म्हणायचं? अमेरिकन लघुउद्योग संघटनेनुसार लघुउद्योग म्हणजे स्वतंत्र मालकीचा संचालित आणि नफ्याचे उद्दिष्ट ठेवून केलेला उद्योग. त्याचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे असा उद्योग बाजारपेठेत फार प्रबळ, वर्चस्ववादी नसतो, कारण त्याचा मुख्य उद्देश हा स्थानिक बाजारपेठ काबीज करणे नसून तिच्यात स्थिर होणे हा असतो.

स्टार्टअप या शब्दाला गेल्या काही वर्षांत ग्लॅमर मिळालं. नेमक्या कुठल्या उद्योगाला स्टार्टअप म्हणायचं हेसुद्घा समजणं आवश्यक आहे. एखाद्या गृहिणीने नव्याने सुरू केलेले पोळी-भाजी केंद्र हे तिच्यासाठी स्टार्टअपच असते. फरक इतकाच की त्या केंद्राला कोणी स्टार्टअप म्हणत नाही किंवा प्रायव्हेट इक्विटी, व्हेंचर कॅपिटलिस्टकडून त्या केंद्राला काही आर्थिक साहाय्य दिले जात नाही. मात्र सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे त्या पोळी-भाजी केंद्राचे उद्या एक रेस्तराँ होऊ  शकते.

व्यवहाराच्या सोयीसाठी ‘नॅसकॉम’ संघटनेने एक व्याख्या प्रस्तावित केली जिचा ‘स्टार्टअप इंडिया’च्या कृतिआराखडय़ात समावेश केला. त्यानुसार गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत भारतात नोंदणी झालेल्या आणि प्रारंभिक वर्षांत २५ कोटींपेक्षा जास्त कारभार नसलेल्या उद्योगाला स्टार्टअप म्हटलं जावं.

स्टार्टअपविषयी एक गैरसमज प्रचलित आहे, तो म्हणजे फक्त तरुणांनी सुरू केलेल्या उद्योगांनाच स्टार्टअप म्हणायचं का? याचं उत्तर अर्थात ‘नाही’ असंच आहे. कारण उद्योग सुरू करण्यासाठी ठरावीक वयोमर्यादेची आवश्यकता अजिबात नसते. शिवाय उद्योगाची संकल्पना वयाच्या कुठल्याही टप्प्यावर सुचू शकते. मात्र हेही खरं की आज भारतातील एकूण स्टार्टअप उद्योजकांपैकी ७२ टक्के उद्योजक हे पस्तीशीच्या आतील आहेत. तर मग तरुणाईमध्ये स्टार्टअपची इतकी क्रेझ का आहे, याचं उत्तर म्हणजे यशस्वी उद्योगांतून मिळणारी प्रेरणा, दूरसंचार क्रांती आणि मोबाइलच्या सर्वदूर वापरामुळे तंत्रज्ञानविषयक स्टार्टअपना मिळणारा मोठा ग्राहकवर्ग, सोप्या रीतीने होणारा पतपुरवठा, उद्योगपूरक वातावरणनिर्मिती इत्यादी.

याचा एक फायदा असा झालाय की तंत्रज्ञानविषयक स्टार्टअपची संख्या आणि लोकप्रियता वेगाने वाढत आहे. मोबाइल ‘स्मार्ट’ झाल्यापासून बरेचसे आर्थिक व्यवहार त्याद्वारे होऊ  लागले. मग ती खरेदी-विक्री असो वा बँकिंग. वाढत्या युवावर्गाचा आणि प्रौढ ग्राहकांचा कल ओळखत मोबाइलद्वारे सेवा पुरवणाऱ्या अ‍ॅप्लिकेशन्सची संख्या वाढली. शिवाय अशी अ‍ॅप्लिकेशन्स तयार करण्यासाठी येणारा भांडवली खर्च कमी असतो. त्यात नावीन्यपूर्णतेला वाव जास्त असतो आणि ग्राहकांचाही प्रतिसाद त्वरित मिळतो. मात्र याचा अर्थ असा नाही की स्टार्टअप फक्त तंत्रज्ञानाशीच निगडित असतात. उदाहरणार्थ अशी कल्पना करूया की आपल्या देशात फिरायला आलेल्या एका सायकलवेडय़ा पर्यटकाला एका शहरातून हजारो किलोमीटर्स दूर असलेल्या दुसऱ्या प्रेक्षणीय स्थळी सायकलनेच जायचं आहे. मात्र त्याच्याजवळ त्याक्षणी स्वत:ची अत्याधुनिक सायकल नाही, पण तो भाडय़ाने घेऊ  शकतो. अशा वेळी जर त्याला कोणी सायकल पुरवली किंवा त्यासाठी एक मोबाइल अ‍ॅप्लिकेशन तयार करून त्याद्वारे मागणी नोंदवण्याची सोय करून दिली तर तोही एक स्टार्टअपच होईल. तात्पर्य काय, तर काहीतरी हटके किंवा स्वत:च्या मालकीचं सुरू करण्याच्या महत्त्वाकांक्षेतून सुचलेल्या नावीन्यपूर्ण संकल्पनेत उद्योग होण्याची क्षमता आहे का आणि ती असेल तर त्या दृष्टीने भविष्यकालीन वृद्धीचा विचार करत जो उद्योग उभारला जाईल, त्याला स्टार्टअप म्हणता येईल.
ओंकार पिंपळे