जन्मसालाबद्दल निरपवाद तपशील हाती येत नसला तरी चोखोबाराय आमच्या नामदेवरायांचे समकालीन होते हे निर्विवाद. १३३८ साली चोखोबाराय पंचत्वात विलीन झाले तेव्हा नामदेवराय होते सत्तरीच्या घरात. ज्ञानदेवांशीही त्यांचा प्रत्यक्ष संबंध येणे अगदीच अशक्यप्राय वाटत नाही. परंतु, चोखोबारायांसह त्यांच्या उभ्या परिवाराचेही नामदेवरायांशी प्रगाढ सौहार्द होते याचे अभंगगत पुरावे गवसतात आपल्याला. ते साहजिकही आहे. कारण, नामदेवरायांचा नित्य वास पंढरीत तर चोखोबांचा सहकुटुंब रहिवास पंढरपुरापासून नजीकच, मंगळवेढ्यात. चोखोबांचा जन्म मंगळवेढ्याचा की आजच्या बुलढाणा जिल्ह्यातील मेहुणपुरी हे चोखोबारायांचे जन्मगाव, याबाबत अभ्यासकांत मतवैचित्र्य आहे. मंगळवेढा ही चोखोबारायांची कर्मभूमी, याबाबत मात्र मतभेद नाहीत. चोखोबारायांनी मनोमन शिष्यत्व स्वीकारले तेही नामदेवरायांचेच. चोखोबाराय व त्यांचे कुटुंब हा भागवतधर्मी संतमंडळातील एक मोठा विलोभनीय, विलक्षण विभूतीमेळ म्हणावयास हवा. स्वत: चोखोबा, त्यांच्या धर्मपत्नी सोयराबाई, या दांपत्याचा मुलगा कर्ममेळा, चोखोबांची बहीण निर्मळा आणि त्यांचे घरधनी बंका हे सगळेच भगवद्भक्त. निर्मळ भावभक्तीने भिजलेली अभंगरचना सगळ्यांच्याच नावावर. संपूर्ण कुटुंबच भक्तिमय, अभंगनिर्माते असणे हा तसा दुर्मीळ योगच. नामदेवराय हे चोखोबांच्या कुटुंबीयांचे परमगुरू. ज्ञानदेवांची आणि चोखोबांची थेट सलगी किती होती अथवा कितपत असावी, याबाबत काहीच नाही येत सांगता. मात्र, ज्ञानदेवप्रणीत शैवागमाचे अतिशय चोख असे अनुभूतीजन्य आकलन चोखोबांच्या ठायी पुरेपूर होते याचा पुरावा म्हणजे चोखोबांची अभंगवाणी. गणेशरूपाचे विश्लेषण शैवागमाच्या परिभाषेत गुंफतात ज्ञानदेव; तर, विठ्ठलरूपाचे दर्शन चोखोबाराय घेतात अद्वयाच्या अधिष्ठानावरून. अनाम जयासी तेंच रूपा आलें । उभें तें राहिलें विटेवरी।। हे चोखोबारायांचे उद्गार अद्वयबोधाची त्यांच्या ठायी दृढावलेली बैठकच जणू अधोरेखित करतात. मूळ विश्वोत्तीर्ण अवस्थेमध्ये केवळ स्फुरणरूपाने नांदणारे केवलतत्त्व त्याच्या इच्छेने भीमातीरी प्रगट होऊन विटेवर समचरण उभे ठाकलेले आहे, ही चोखोबांची साक्ष, ज्ञानदेव आणि ते समानधर्मी असल्याचे वास्तवच नि:संदिग्धपणे सूचित करतात. त्या अनाम- अरूप अशा विश्वोत्तीर्ण परमतत्त्वाला त्याच्या एकाकीपणाचा कंटाळा आल्यामुळे अनंत रूपांनी नटून, विविध नात्यांच्या माध्यमातून ‘स्व’ची अनुभूती नाना परींनी उपभोगण्यासाठी विश्वात्मक होऊन तेच तत्त्व विलसत असल्याचे शैवागमाचे गाभासूत्रच विठ्ठलरूपाचे गुणवर्णन करण्यासाठी शब्दबद्ध केलेले आहे चोखोबांनी, ही बाब मोठी लक्षणीय ठरते. आपुलियां सुखें आपण नटलें। आहे तें संचलें जैसें तैसें हे चोखोबारायांचे उद्गार म्हणजे, परमशिवाच्या विश्वोत्तीर्ण व विश्वात्मक या दोन्ही अवस्थारूपांच्या एकमयतेचा निखळ दाखलाच. अविकारी असणारे परतत्त्वच या जगातील यच्चयावत पदार्थांमध्ये अंतर्बाह्य व्यापून विनटलेले आहे, ही चोखोबांची अनुभूती म्हणजे शैवागमाच्या आद्यबोधाचे दर्शनच. भक्त व भगवंत यांच्यादरम्यान नांदणाऱ्या मधुर अशा भक्तिसुखाची लज्जत चाखण्यासाठी ते परतत्त्व भक्तराज पुंडलीकरायापाशी तिष्ठत राहिलेले आहे, हे विठ्ठलरूपाचे गमक आपणची नटलें रूप। भक्तासमीप राहिले अशा शब्दांत प्रगट करतात चोखोबाराय. अद्वयबोधमंडित दृष्टीने जगाकडे बघणाऱ्या चोखोबांना, त्यांमुळेच, सृष्टिव्यवहारात सर्वत्र चोख परतत्त्वाचेच दर्शन घडत राहते. ओवळेपणाचा आणि पर्यायाने विटाळाचा मागमूसही चोखोबांना कोठे अणुमात्रही अनुभवास येऊ नये, हे मग स्वाभाविकच! – अभय टिळक

agtilak@gmail.com