अधिकारसंपन्न व्यक्ती निश्चिंत आणि निवांतही असते. सहजसिद्ध असणारा अधिकार व्यवहारात राबवायचा वा नाही, हा असतो प्रश्न त्याच्या मर्जीचा. मोक्षाचे नाही वाटत अप्रूप वारकऱ्याना ते यामुळेच. मोक्ष त्यांच्यासाठी ठेवलेलाच असतो. किंबहुना भागवत धर्माच्या व्याख्येतच ते अनुस्यूत आहे. व्यासांची साक्षच आहे तशी. भागवत धर्म मोक्षदायक होय, याबद्दल शंकाच मुदलात नाही कोणाला. जया भक्तिची येतुलीं प्रीति। तें कैवल्यातें परौते सर म्हणती ही ज्ञानदेवांची ओवी उच्चारण करते त्यापलीकडील एका आगळ्या वैशिष्ट्याचे. भागवत धर्माने प्रतिपादन केलेले भक्तीचे शास्त्र हस्तगत झालेल्या साधकाच्या पुढ्यात हात जोडून मूर्तिमंत मोक्ष उभा ठाकला तर ‘‘अरे तू जरा अंमळ पलीकडे उभा राहा बाबा, तुझ्याकडे येतो मी नंतर. सध्या तरी तुझी गरज नाही मला.’’ असे भागवत धर्मोपासक मोक्षाला सुनावतो, हेच ध्वनित करत आहेत ज्ञानदेव. मोक्ष हा केवळ जन्मजात अधिकार नसून ती निसर्गसिद्ध सहजावस्था होय, हे वारकरी संप्रदायाचे गाभातत्त्व आकळलेल्यांना पुरते ठाऊक असल्यामुळेच, पंढरीचे वारकरी। ते अधिकारी मोक्षाचे असा निखळ हवाला देतात तुकोबाराय. आषाढी एकादशीस पंढरीक्षेत्रात दाखल झालेल्या वारकऱ्याला मोक्षाची तर सोडाच विठ्ठलाच्या दर्शनाचीदेखील आस नसते अणुमात्र. त्याला असते असोशी पंढरीक्षेत्रातील प्रेमकल्लोळाची. त्यासाठी राऊळातच जायला हवे, असे अजिबातच मानत नसतो वारकरी. विटेवर उभ्या असणाऱ्या पांडुरंगाचे दर्शन, समजा, दुष्कर असेल एखाद्या कारणाने तरी त्याचे नाही वाटत दु:ख भागवतांना. नामाच्या माध्यमातून होणारे प्रेमदर्शनच त्यांना असते सर्वाधिक प्रिय. साधकाने नाम घेतलं की, पांडुरंगाने त्याला प्रेमाचा कवळ भरवलाच पाहिजे. असा  निवाडाच करून ठेवलेला आहे संतांनी! आम्हीं घ्यावें तुझें नाम। तुम्हीं आम्हां द्यावें प्रेम। ऐसें निवडिलें मुळीं। संतीं बैसोनि सकळीं।। अशा शब्दांत प्रकट करतात तुकोबाराय अंतरंग संबंधित कराराचे. अलोट गर्दीपायी नाही होत विठ्ठलाचे सगुणदर्शन बहुसंख्यांना. मात्र, नामचिंतनाद्वारे अंतर्मनात झिरपणाऱ्या प्रेमापासून भक्तांना वंचित ठेवणे खुद्द भगवंताच्यादेखील ताकदीबाहेरचे असते. उपासकाला दर्शन देणे अथवा न देणे हे असेल एक वेळ अवलंबून भगवंताच्या मर्जीवर. परंतु त्याच्या नामाचा आठव करण्याचे भक्ताचे स्वातंत्र्य तरी स्वायत्त, अबाधित आहे ना! नाही मिळाला प्रवेश पंढरीनाथाच्या मंदिरात तरी त्याच्या नामचिंतनाद्वारे भक्ताच्या मनमंदिरात झिरपणाऱ्या त्यांच्या प्रेमबिंदूंची लज्जत  चाखण्यापासून भक्ताला कोणी तरी रोखू शकते  काय? लपलासीं तरी नाम कोठे नेसी। आम्हीं अहर्निशी नाम गाऊं, अशा रोखठोक शब्दांत नामदेवराय खुद्द  पंढरीशाला सुनावतात. ते नामप्रेमांच्या असीम सामथ्र्याच्या आधारावरच. मोक्षापेक्षाही वारकऱ्याला प्रिय असते विठ्ठलदेवाचे हेच प्रेमसुख आणि त्याची प्राप्ती करून देणारे नामधन. त्या प्रेमाच्या आड येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा वाटतो तिटकारा हरिदासांना. भगवंताच्या प्रेमाला पारखी बनविणारी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ‘स्व’ची जाणीव! ‘अहं’चे उच्चाटन समूळ घडविणारे साधन  म्हणजे पांडुरंगाच्या मंदिराचा कळस. तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस। तात्काळ या नास अहंकाराचा, अशी रोकडी साक्ष तुकोबाराय देतात त्यासाठीच. अहंकाराचा नाश हाच लौकिकातील मोक्ष! आणि साधनेचा कळसही तोच! पांडुरंगाच्या मंदिराचा कळस दिसला तरी वारकरी भरून पावण्यामागील रहस्यही हेच!! – अभय टिळक

agtilak@gmail.com