News Flash

पसाय

तुकोबांचे उभे जीवन म्हणजे भगवंताला अभिप्रेत असलेल्या उत्तम पुरुषाचे मूर्तिमंत दर्शनच जणू!

तुकोबा म्हणजे खरोखर अथांग व्यक्तिमत्त्व. जितके व्यापक तितकेच सखोल, सघन. गीतेच्या १५व्या अध्यायात अर्जुनाच्या निमित्ताने भगवान श्रीकृष्णांनी उत्तम पुरुषाची गुणलक्षणे सांगितलेली आहेत. तुकोबांचे उभे जीवन म्हणजे भगवंताला अभिप्रेत असलेल्या उत्तम पुरुषाचे मूर्तिमंत दर्शनच जणू! लौकिक व पारलौकिक संपदेचा समधात समन्वय जगण्यामध्ये साध्य केलेल्या प्रापंचिकाची गती- ‘‘उत्तम चि गती तो एक पावेल। उत्तम भोगील जीव खाणी।’’ अशी विशद करताना तुकोबाही ‘उत्तम’ हेच पद वापरतात, ही बाब या संदर्भात लक्षणीय ठरते. जगण्याची ती संपन्न पद्धती हस्तगत करून घेतलेल्या समृद्ध संसारी मनुष्याची लौकिकातील व्यवहारदृष्टी कशी राहते, हेही तुकोबाच- ‘‘जोडोनियां धन उत्तम वेव्हारें। उदास विचारें वेच करी।’’ अशा विलक्षण सूचक शैलीत उलगडून सांगतात. प्रवृत्ती व निवृत्ती या दोन अंगांचा जीवनरहाटीत समसमा संगम पुरस्कारणाऱ्या भागवत धर्मविचाराला अपेक्षित, अभिप्रेत असलेल्या संतुलित गृहस्थाश्रमाचे सम्यक दर्शन तुकोबा या अभंगात घडवितात. ही जीवनशैली जपणाऱ्या प्रापंचिकाला मग जे फळ मिळते, त्याचा निर्देश याच अभंगाच्या अखेरच्या चरणात- ‘‘तुका म्हणे हें चि आश्रमाचें फळ। परमपद बळ वैराग्याचें।’’ अशा शब्दांत तुकोबाराय करतात. भागवत धर्मप्रणीत वारकरी तत्त्वदृष्टीचे अवघे सारसर्वस्व तुकोबांच्या या उक्तीमध्ये एकवटलेले आहे. बहिर्मुख बनून विषयोपभोगांच्या कुरणात मनसोक्त चरणारी मनादी इंद्रिये प्रत्याहाराद्वारे अंतर्मुख बनविल्यानंतर त्यांना विषयोन्मुख होण्याचा मोह पुन्हा पडू नये म्हणून दक्ष साधक ज्या वैराग्यरूपी महाअग्नीने ती कुरणेच जाळून भस्मसात करतो, ते वैराग्य साधकाला हस्तगत कसे व कोठून व्हावे याचा उलगडा तुकोबा या ठिकाणी स्वानुभवाधारे करतात. सर्वसामान्य, परंतु मुमुक्षू प्रापंचिकांवर तुकोबांचे हे अक्षय आणि उदंड उपकार होत. प्रपंच आणि घरदार सोडल्याखेरीज वैराग्याची प्राप्ती होत नाही, ही आपली पूर्वापारची धारणा. किंबहुना, संसारसंपत्तीवर तुळशीपत्र ठेवणे हीच अंत:करणात वैराग्याची ज्योत प्रज्वलित झाल्याची खूण समजावी, हाच ठसा आपल्यावर बिंबलेला असतो. त्या सगळ्या चौकटबद्ध धारणांना थेट छेद देतात तुकोबा. उभा जीवनव्यवहार नेमस्तपणे, नीतीला धरून सात्त्विक वृत्तीने आमरण आचरणाऱ्या संसारी मनुष्याला त्याच्या त्या जीवनसाधनेचे मिळणारे फळ म्हणजेच वैराग्य, हा तुकोबांचा निरपवाद आणि तितकाच आगळा सांगावा. ज्या परमपदाची प्राप्ती करून घेण्यासाठी मुमुक्षू साधक सायासपूर्वक साधना करत राहतो, ते कष्ट उपसण्यासाठी आवश्यक असणारे बळ हेच वैराग्य त्याला अखंड पुरवत असते, असा तुकोबांचा रोकडा दाखला होय. प्रपंचाचा त्याग केल्याने नव्हे, तर नीतीयुक्त निरलस कर्मोपासनेचा आश्रय केल्यानेच वैराग्याची प्राप्ती होते, हे तुकोबांचे विश्लेषण म्हणजे भागवत धर्मविचाराचा सारभूत गाभाच जणू. ‘क्रमयोगा’चे विवरण १८व्या अध्यायात मांडत असताना ज्ञानदेव सांगत आहेत ते नेमके हेच. कर्मरूपी फुलांची ओंजळ अर्पून संपन्न केलेल्या पूजेमुळे संतोष पावलेल्या सर्वात्मकाने त्या पूजेचे क्रमयोग्याला प्रदान केलेले फळ म्हणजेच वैराग्यसिद्धी, हेच ज्ञानदेव तिथे- ‘‘म्हणौनि तिये पुजे। रिझलेनि आत्मराजे। वैराग्यसिद्धि देईजे। पसाय तया।’’ अशा शब्दांत सांगतात. तुकोबांचे चरित्र म्हणजे क्रमयोग्याचे समग्र दर्शनच होय, ते असे!

– अभय टिळक

agtilak@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 29, 2021 12:09 am

Web Title: article advayabodh akp 94
Next Stories
1 बुद्धी पोळली ऐसी माघौती…
2 गोसावी
3 बुद्धिवैभव
Just Now!
X