News Flash

विचार

विचारक्षमतेमध्ये परिणत न होणाऱ्या ज्ञानाचा- ‘‘विचार नाहीं नर खर तो तैसा। वाहे ज्ञान पाठी भार लगड तैसा।’

अध्यात्म, परमार्थ यांसारख्या प्रांतांमध्ये तर्काला, प्रश्न उपस्थित करण्याला जणू काही मनाई आहे अथवा असते, अशी एक विलक्षण धारणा लोकमानसामध्ये दृढमूल होऊन बसलेली दिसते. अध्यात्म हेही एक शास्त्रच होय, असा नि:संदिग्ध निर्वाळा- ‘‘अध्यात्मशास्त्रीं इयें। अंतरंगचि अधिकारियें।’’ अशा निरपवाद शब्दांत ज्ञानदेवांनी १३ व्या शतकात देऊनही असे का व्हावे, हेही एक कोडेच म्हणायचे! तर्कशुद्ध विचार हा कोणत्याही शास्त्राचा प्राणच जणू. किंबहुना ज्ञानसंपादनाची अवघी प्रक्रियाच प्रगल्भ शिष्याने जिज्ञासापूर्वक उपस्थित केलेल्या प्रश्नांना ज्ञानानुभवसंपन्न शिक्षकाने दिलेल्या समर्पक उत्तरांच्या माध्यमातून फुलत-उमलत राहते, हे वास्तव तर भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णच स्पष्ट करतात. आचार्यांना विनम्र भावाने प्रथम वंदन करून मग प्रश्नोपप्रश्नांद्वारे सत्शिष्याने ज्ञानग्रहण करावे, असा विधीही खुद्द भगवंतच विदित करतात. कष्टपूर्वक व डोळसपणे अर्जित ज्ञानाची परिणती व्यक्तीच्या ठायी विचारक्षमता वृद्धिंगत होण्यात घडून यावी, ही तर सहज-स्वाभाविक अपेक्षा. तसे घडत नसेल तर अध्ययन-अध्यापन व्यवहारात काही तरी जबर त्रुटी अथवा गफलत आहे, असे मानण्यावाचून गत्यंतरच उरत नाही. विचारक्षमतेमध्ये परिणत न होणाऱ्या ज्ञानाचा- ‘‘विचार नाहीं नर खर तो तैसा। वाहे ज्ञान पाठी भार लगड तैसा।’’ अशा तीव्र शब्दांत तुकोबा उपहास करतात तो उगीच नाही. ज्ञानाचे साधन असणाऱ्या ग्रंथांचा भार पाठीवर वाहणाऱ्या बिचाऱ्या गाढवाच्या ठायी विचारक्षमता परिपुष्ट होत नाही, तशी अपेक्षाही नसते. मात्र, पुस्तकी ज्ञानाची अपरंपार घोकंपट्टी करूनही तर्कनिष्ठ विचारशक्ती हस्तगत न झालेल्या पढीक मनुष्यास काय म्हणावे, असा प्रश्न तुकोबांना पडतो. भागवत धर्माने प्रवर्तित केलेल्या भक्तितत्त्वाचे गाभाभूत सार असणारे नामस्मरणरूपी साधनही साधकाने सारासार विचार करूनच मन:पूर्वक अंगीकारावे, असे तुकोबा- ‘‘सारासारविचार करा उठाउठी। नाम धरा कंठीं विठोबाचें।’’ इतक्या थेट शैलीत जे सांगतात, त्यांतील गहनगंभीर आवाहन आपण संवेदनशीलतेने जाणून घेणार की नाही! ‘तर्कनिष्ठ असणे’ आणि ‘तार्किक असणे’ या दोहोंत मूलभूत असा गुणात्मक फरक आहे. तो नीट समजावून न घेताच- ‘‘तार्किकांचा टाका संग। पांडुरंग स्मरा हो।’’ हे तुकोबांचे वचन उद्धृत करण्यात दिशाभूल होत राहते ती आपलीच. तर्कनिष्ठतेची नाळ विचारशक्तीच्या पोताशी जुळलेली असते, तर तार्किकपणाचा संबंध असतो संशयी वृत्तीशी. भागवत धर्माला अभिप्रेत आहे अभ्यासाद्वारे ज्ञानसंग्रह आणि संग्रहित ज्ञानाच्या मंथनाद्वारे विचारक्षमतेचे पोषण. विचारशक्ती सक्षम होण्यातून विवेक जागृत बनावा, ही झाली या परंपरेची आपल्याकडून असणारी त्यापुढील अपेक्षा. ‘‘विचारावें विवेक दृष्टीं। संतचरणीं द्यावी मिठी।’’ असे एकनाथबाबा जे सांगतात त्याचे गमक हेच. भागवत धर्माने संतत्वाची आद्य सांगड घातलेली आहे ती विवेकाशी. विचारांती प्रगटलेल्या विवेकरूपी काजळाने दृष्टी निर्मळ बनवून विवेकाचे मूर्तिमंत दर्शन असणाऱ्या संतविभूतींशी सलगी साधावी, हेच आहे नाथांचे सांगणे. सारासारविवेक ही जीवनाच्या केवळ पारमार्थिक अंगाचीच काय ती गरज असते, असा भ्रम जोपासणे हीच मुळात घोडचूक. जीवनरीत लौकिक असो वा पारलौकिक, ‘‘विचारा वांचून। न पवीजे समाधान।’’ हे तुकोबांचे मार्मिक सूचन जगण्याच्या दोन्ही प्रांतांत एकसारखेच उपयुक्त व उपकारक शाबीत होते. – अभय टिळक

agtilak@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2021 12:01 am

Web Title: article thoughts akp 94
Next Stories
1 शिष्यत्व
2 गुरुत्व
3 शोधपर्व
Just Now!
X