सर्वसामान्य संसारी माणूस हा भागवत धर्माने प्रवर्तित केलेल्या भक्तिविचाराचा केंद्रबिंदू होय. या संप्रदायाने शिरोधार्य मानलेली आणि पुरस्कारलेली उपासनापद्धती संन्यासी, कडकडीत वैराग्यधारक तापस, गृहदारादिकांचा त्याग करणारे व्रतस्थ परिव्राजक यांच्यासाठी नाहीच मुळात. उपासनेचा हा मार्ग अंगीकारणाऱ्यांसंदर्भात भागवत धर्म दुजाभाव करतो, असा मात्र या विवेचनाचा अर्थ कोणीही काढू नये. प्रपंचात राहून परमार्थसाधन करण्याची मनीषा जपणाऱ्यांसाठी भागवत संप्रदायाने पुरस्कारलेली नामचिंतनभक्ती आदर्श साधन ठरते, हाच यांतील मुख्य गाभा. ‘‘प्रपंची असूनि परमार्थ साधावा। वाचें आठवावा पांडुरंग।’’ हे सांवतामहाराजांचे वचन म्हणजे भागवत धर्मप्रणीत भक्तितत्त्वाचे आद्य वर्मच जणू. कर्माशी अविरोध हे नामचिंतनरूपी साधनाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य आणि आगळेपणही. परंतु मनोमन इच्छा असूनही, ध्यान-धारणा-समाधी यांसाठी दिवसाकाठी काहीएक निश्चित वेळ राखून ठेवणेही जमत नाही कित्येकांना. जनसंमर्द टाळणे, एकांतवास स्वीकारणे, मौनव्रत धारण करणे अशांसारख्या, संन्यस्त तापसांना सहजसाध्य बाबीही कुटुंबवत्सल माणसाला जवळपास अशक्यच. मनाची एकाग्रता, एकतानता, स्थैर्य भंग पावावे असे प्रसंग तर रोजच्या व्यवहारात पदोपदी पुढ्यात उभे ठाकणारच. क्षणोक्षणी तोंड वाजवण्याखेरीज पर्यायच नसतो सर्वसामान्य प्रापंचिकाला. चारचौघांसारखे जीवन जगणाऱ्यांची ही अडचण ओळखूनच, ‘‘ज्ञानदेव म्हणे सगुण हें ध्यान। नामपाठ मौन प्रपंचाचे।’’ अशी नितळ सोडवणूक करून टाकतात ज्ञानदेव ‘हरिपाठा’मध्ये. नामस्मरणाइतकाच भागवत धर्मविचाराचा रोख आहे तो नामचिंतनाच्या मनबुद्धीवर अपेक्षित असलेल्या परिणामावर. मन आणि बुद्धी उत्तरोत्तर शुद्ध होत जाणे, हा आहे तो अपेक्षित परिणाम. ‘‘महामळें मन होतें जें गांदलें। शुद्ध चोखाळलें स्पटिक जैसें।’’ अशा नि:संदिग्ध शब्दांत, अखंड नामोच्चारणाचा चित्तावर घडून येणारा संस्कार तुकोबा विदित करतात स्वानुभवाच्या आधारे. अंत:करण विशुद्ध बनले की बुद्धीला जी अवस्था प्राप्त होते तिलाच समाधी म्हणतात, अशी मोठी विलक्षण व्याख्या सिद्ध करतात आमचे चोखोबाराय. ‘‘चालतां बोलतां न मोडे समाधी। मूळ अंतरशुद्धी कारण हें।’’ अशा शब्दांत चोखोबाराय वर्णन करतात समग्र ऐश्वर्य त्या आगळ्या समाधीचे. नामस्मरणरूपी साधनाच्या प्रांतातील आपली वाटचाल त्या समाधिवस्थेच्या दिशेनेच चालू आहे, याची खात्री नामधारकाला कशी पटावी, असा एक मार्मिक मुद्दा उपस्थित होतो इथे. ‘‘नाम घेतां मन निवे। जिव्हे अमृत चि स्रावे। होताती बरवे। ऐसे शकुन लाभाचे।’’ हा तुकोबारायांचा दाखला धावून येतो मदतीला आपल्या, या बिंदूवर. मनाचे मनपण हळूहळू निवायला लागणे, ही नामचिंतनाचा अपेक्षित संस्कार अंत:करणावर मुरायला सुरुवात झाल्याची निश्चित नांदी होय, अशी अंतर्खूण प्रगट करतात तुकोबा आपल्यासाठी. आवड-निवड, स्वीकार-नकार अशा द्वंद्वातच मनाचे व्यापार जाणिवेच्या प्रत्येक क्षणी साकारत असतात. ती द्वंद्वात्मकता प्रगटत राहते आपल्या बोलण्या-चालण्याद्वारे. पावलापावलावर सामोऱ्या येणाऱ्या द्वंद्वांची खुमखुमी निवायला लागली, की आपसूकच आपल्या वाणीचा पोत व चाल पालटते. वाचा मौनावणे हेच नव्हे का लक्षण मन निवल्याचे! – अभय टिळक

agtilak@gmail.com