News Flash

जन्म गेला उष्टे खातां। लाज न ये तुमचे चित्ता…

दंभढोंगाची सारी निपज त्या तफावतीच्या कुशीतूनच निपजत असते या वास्तवाचे भानही आपल्याला राहत नाही.

जन्म गेला उष्टे खातां। लाज न ये तुमचे चित्ता…

नम्रपणा आणि बुळेपणा यांत अतिशय मूलभूत असा गुणात्मक फरक आहे. भक्ती माणसाला नम्र बनविते, बुळबुळीत नव्हे. भागवतधर्माने रुजवलेल्या भक्तितत्त्वाचा हा पहिला विशेष. तर, भवतालातील दंभाचाराबाबत रोखठोक प्रश्न उभे करत पाखंडी धर्मकल्पनांची तळी उचलून धरणाऱ्यांना कडक भाषेत जाब विचारण्याचे धैर्य भक्तभागवतांना प्रदान करणे, हे भागवतधर्मप्रणीत भक्तिविचाराचे दुसरे वैशिष्ट्य. भक्तिसाधनेचे हे दोन्ही आयाम आपल्याला आढळून येतात चोखोबांच्या कुटुंबात. भक्तीतील नम्रतेचे दर्शन घडते चोखोबांच्या उक्तीकृतींमध्ये. तर, धार्मिक दंभाचाराविरोधातील उग्र बंडाचे तेज अनुभवास येते चोखोबांच्या मुलाच्या धगधगत्या वाणीमध्ये. ‘कर्ममेळा’ हे त्या अंगाराचे नाव. भ्रामक रूढीकल्पनांबाबत प्रश्न उपस्थित करणे, हा समान गुण पुरेपूर वसलेला दिसतो चोखोबांमध्ये आणि त्यांच्या मुलातही. फरक असेल या पितापुत्रांत काही तर तो केवळ शाब्दिक अभिव्यक्तीचा. सिद्धान्त आणि व्यवहार यांत सदासर्वकाळ नांदणाऱ्या दरीला आपण इतके सरावलेलो असतो की, दंभढोंगाची सारी निपज त्या तफावतीच्या कुशीतूनच निपजत असते या वास्तवाचे भानही आपल्याला राहत नाही. मग ते अद्वैत वेदान्ताचे सिद्धान्तन असो वा अद्वय शैवागमाचे. ‘सर्वं खल्विदं ब्रह्मं’ हे महावाक्य मुखाने उच्चारायचे आणि सारा व्यवहार मात्र विटाळाच्या जाणिवेतून उपजणाऱ्या विषमतेने नटलेला आचरायचा, यात आपले काही चुकते आहे हे जाणवण्याइतपत संवेदनाही मग उरत नाही. समकालीन समाजव्यवहारातील तो उदंड विरोधाभास अनुभवून अचंबित झालेले चोखोबा आपल्याला भेटतात त्यांच्या गाथेमध्ये अनेक ठिकाणी. द्वंद्वातीत अशा परमशुद्ध परतत्त्वामधूनच निपजलेल्या पंचमहाभूतांच्या एकत्र येण्यातून उत्पन्न झालेल्या शरीरांचा मेळच सगळ्या पृथ्वीवर संचारत असल्याने, आता इथे विटाळ कोणाचा आणि कसा व कशासाठी मानायचा असा प्रश्न चोखा म्हणे मज नवल वाटतें। विटाळा परतें आहे कोण अशा कमालीच्या नम्र, मृदुमुलायम शैलीत उपस्थित करतात चोखोबाराय. तर, बोलभांड अध्यात्माचे देव्हारे एकीकडे उभारत प्रत्यक्ष व्यवहारात मात्र बाटविटाळ मानणाऱ्या धर्ममार्तंडांच्या दंभाचाराचे चटके सोसण्याने उबगलेले कर्ममेळा हीनपण लादलेल्या तशा जिण्याबद्दल तुमच्या संगतीचें काय सुख आम्हां। तुम्हां मेघश्यामा न कळें कांहीं। हीनत्व आम्हांसी हीनत्व आम्हांसी । हीनत्व आम्हांसी देवराया अशा खडखडीत भाषेत थेट जाब विचारतात जगन्नियंत्या पांडुरंगालाच! भागवतधर्माने प्रवर्तित केलेल्या भक्तितत्वातील आक्रमक लढाऊपणाचा हा रोकडा वस्तुपाठच जणू. समतेचा ओतीव पुतळा असे तुझे केले जाणारे वर्णन खरे असेल तर मग तूच निर्माण केलेल्या या विश्वात तूच तथाकथित श्रेष्ठ-कनिष्ठ जातवर्णांची उतरंड का निर्माण केलीस, असा दुसरा निर्मम हल्ला चढवतात कर्ममेळा देवावर. आमुची केली हीन याती। तुज कां न कळे श्रीपती। जन्म गेला उष्टे खातां। लाज न ये तुमचे चित्ता या पराकोटीच्या उद्वेगपूर्ण शब्दांद्वारे प्रगटते कर्ममेळा यांनी विषमतेच्या चटक्यांपायी आजन्म सोसलेले जीवघेणे क्लेश. परमशिवाच्या विश्वात्मक रूपाचे अंतरंग मर्म खरोखरच अचूक आकळले असेल तर आपल्या चटकन ध्यानात यावे की, वास्तवात कर्ममेळा जाब विचारत आहेत विश्वात्मक देवाला – म्हणजेच – तत्कालीन समाजपुरुषाला. कर्ममेळा यांनी १४व्या शतकात तत्कालीन समाजमनाला विचारलेला प्रश्न व त्याच्या मुळाशी असणारी त्यांची वेदना आजही तितकीच ज्वलंत व प्रस्तुत नाही का? – अभय टिळक

agtilak@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2021 12:02 am

Web Title: humility very basic qualitative differences akp 94
Next Stories
1 देहींचा विटाळ देहींच जन्मला । सोंवळा तो जाहला कवणधर्म…
2 कोणासी विटाळ कशाचा जाहला। मुळींचा संचला सोंवळाची
3 आपणची नटलें रूप। भक्तासमीप राहिले…
Just Now!
X