25 February 2021

News Flash

स्वतंत्र

गीताटीकेच्या या उपसंहारामध्ये खुद्द ज्ञानदेवांनीच मार्मिकपणे या वस्तुस्थितीचा निर्देश केलेला दिसतो.

(संग्रहित छायाचित्र)

 

अभय टिळक

अंमळ सूक्ष्मपणे बघितले तर, देशी भाषांमधील पहिलेवहिले टीकाभाष्य म्हणून परिचित ‘ज्ञानेश्वरी’ हा एक विचारव्यूह असल्याचे जाणवते. भगवान शंकरांपासून गुरू क्रमाने चालत आलेला शांभवाद्वयाचा तत्त्वविचार समाजमनापुढे  प्रगट करण्यासाठी ज्ञानदेवांनी रचलेल्या व्यूहरचनेची फलश्रुती म्हणजे ‘ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ.  गीताटीकेच्या या उपसंहारामध्ये खुद्द ज्ञानदेवांनीच मार्मिकपणे या वस्तुस्थितीचा निर्देश केलेला दिसतो. ‘मग आर्ताचेनि वोरसे । गीतार्थग्रंथनमिसें । वर्षला शांतरसें । तो हा ग्रंथु’ हे ज्ञानदेवांचे उद्गार या संदर्भात  मननीय ठरतात. माझे सद्गुरू  श्रीनिवृत्तिनाथ यांनी सिद्ध करून दिलेले अद्वयानंदाचे तत्त्वदर्शन श्रीमद्भगवद्गीतेवर भाष्य करण्याच्या मिषाने मी जगापुढे मांडतो आहे, असे ज्ञानदेव ‘ज्ञानेश्वरी’च्या उपसंहारादरम्यान कथन करतात. काश्मीर शैवमत या नावाने विख्यात या तत्वपरंपरेचा आद्य परिचय ज्ञानदेव घडवितात तो गीताभाष्याच्या माध्यमातून. अर्जुनाला कर्तव्यसन्मुख बनविण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने श्रीमद्भगवद्गीतेमध्ये विवरण केलेला भागवत धर्मविचार आणि शांभवाद्वयाचा तत्त्वविचार या दोहोंच्या दरम्यान घनिष्ठ असा जैविक अनुबंध असल्यामुळे एक अलौकिक तत्त्वसंगम ‘ज्ञानेश्वरी’च्या माध्यमातून साकारला. जग आणि जगदीश्वर, जन आणि जनार्दन यांच्या परस्परनात्याचे स्वरूप वर्णन करण्यासाठी पाणी आणि पाण्याची लाट यांच्या आंतरसंबंधाचे रूपक ज्ञानदेवांनी या गीताभाष्यामध्ये मुक्तपणे योजिलेले दिसते, त्याचे गमक हेच. रज्जूसर्पन्यायाची परिभाषा वापरण्याऐवजी आपल्या विचारविश्वात ज्ञानदेवांनी  समुद्र आणि लाटा यांच्या उदाहरणांची लयलूट का केली असावी, याचा उलगडा यावरूनच  होतो अथवा व्हावा. ‘नाना कल्लोळपरंपरा । संतती जैसी सागरा । आहृां आणि चराचरा । संबंधु तैसा’ ही श्रीकृष्णांच्या मुखात ज्ञानदेवांनी घातलेली ओवी शक्तियुक्त शिवाच्या विश्वोत्तीर्ण आणि विश्वात्मक या उभय रूपांच्या नातेसंबंधांचे सूचन करते. लाटांच्या प्रगटीकरणासाठी सागराला अन्य बाहेरच्या गोष्टींची मदत घेण्याची गरजच नसते. परमशिवाचेदेखील तेच वैशिष्टय़ होय. विश्वात्मक बनून प्रगटण्यासाठी त्याला अन्य भिन्न उपाधीचा टेकू घेण्याची निकड  भासत नाही. पाण्याच्या पृष्ठभागावर थुईथुई नाचणाऱ्या लाटेची निर्मिती, स्थिती आणि लय ज्याप्रमाणे पाण्यातच घडून येते त्याच न्यायाने विश्वरूपाने प्रगटीकरण, विश्वात्मक अस्तित्व आणि विश्वोत्तीर्ण रूपामध्ये पुनश्च अवस्थांतर ही परमशिवाची क्रीडा चित्शक्तीनुसार अखंड चालूच असते. हेच रहस्य, ‘कल्लोळमाळा अनेगा । जन्म जळींचि पैं गा । आणि तयां जळचि आश्रयो तरंगा । जीवनही जळ’ अशा पद्धतीने ज्ञानदेव उलगडून मांडतात. कोणावरही अवलंबून नसणारी आणि शिवाचे आत्मप्रगटीकरण घडवणारी अशी ही चित्-शक्ती, म्हणूनच, ‘स्वतंत्रा’ याअभिधानाने विख्यात आहे. या चित्शक्तीप्रमाणे अभिन्नत्वाने नांदणारी सहचरी लाभलेली असल्यामुळेच परमशिव स्वतंत्र आहे. दृश्यमान होणारे जग हे त्या स्वतंत्र शिवाचे प्रगटीकरण असल्यामुळेच जगातील य:कश्चित वस्तुजातदेखील स्वतंत्र असते. त्याचे हे स्वातंत्र पूर्णपणे स्वायत्त आणि स्वयंसिद्ध असते.‘तुका म्हणे आहृी विधीचे जनिते । स्वयंभू आइते केले नव्हों’ या तुकोबांच्या शब्दकळेतील दुर्दम्य पीळ याच वास्तवाचे सूचन घडवतो. शिकारीतून सशाचे स्वातंत्र्य हिरावले जाणे चक्रधरस्वामींना अमान्य आहे ते याच न्यायाने.

agtilak@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2021 12:01 am

Web Title: independent loksatta advayabodh article abn 97
Next Stories
1 महात्मा
2 आपे आप शुद्धी गोविंदी रया..
3 जागृती
Just Now!
X