News Flash

ज्ञानोपासना

‘अभ्यासयोग’ अशी शब्दसंहती ज्ञानदेव योजतात ती बहुधा त्याच दृष्टीने

– अभय टिळक agtilak@gmail.com

केवळ ‘अभ्यास’ असे न म्हणता ज्ञानदेव ‘अभ्यासयोग’ असा शब्दप्रयोग करतात, ही बाब विलक्षण अन्वर्थक होय. ‘अभ्यास’ हे तर ज्ञानाचे साधन. अभ्यास म्हणजे ज्ञान नव्हे. ‘‘अभ्यासाहूनि गहन। पार्था मग ज्ञान। ज्ञानापासोनि ध्यान। विशेषिजे।।’’ असे ज्ञानदेव यासंदर्भात जे म्हणतात, त्यात फार अर्थ भरलेला दिसतो. अभ्यासाची परिणती ज्या ज्ञानसंपादनात अपेक्षित आहे, ते अभ्यासाहून अधिक गहन असल्यामुळेच त्याच्या प्राप्तीसाठी पुस्तकी अभ्यासाला अन्य साधनसामग्रीची जोड पुरविणे अगत्याचे बनते. ज्ञान- मग ते लौकिक विषयांचे असो वा पारलौकिकाचे- पदरात पाडून घ्यावयाचे, तर अभ्यासाशी अन्य काही गुणांचा संयोग विद्यार्थ्यांला घडवून आणावा लागतो. ‘अभ्यासयोग’ अशी शब्दसंहती ज्ञानदेव योजतात ती बहुधा त्याच दृष्टीने. सतत प्रयत्न हा अभ्यासाचा गाभा होय. साहजिकच, अभ्यासाचा प्रारंभ ते ज्ञानप्राप्तीचा भोज्या- यांच्यादरम्यानचा प्रवास असतो प्रयत्नांचा आणि श्रमसायासांचा. हा प्रवास पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या ठायी गरज असते तितिक्षेची. त्यासाठी चित्त असावे लागते साहसी आणि बुद्धी असावी लागते कणखर. ‘‘येणेंचि अभ्यासेंसी योगु। चित्तांसी करी पां चांगु। अगा उपायबळें पंगु। पहाड ठाकी।।’’ अशा शब्दांत ज्ञानदेव अधोरेखित करतात ते नेमके हेच सूत्र. ‘कणखर’, ‘धीट’, ‘धैर्यवान’ या आहेत ‘चांग’ या शब्दाच्या विविध अर्थच्छटा. चित्तामध्ये धीर एकवटून प्रयत्नांची कास घट्ट धरल्यास दैववशात अपंग असलेली व्यक्तीही पहाड सर करू शकते, हा आहे ज्ञानदेवांचा सांगावा. तुकोबांची साधकावस्था म्हणजे याच अभ्यासयोगाचे मूर्तिमंत दर्शनच जणू! अभ्यासास प्रारंभ करण्यासाठी आवश्यक चित्ताची स्थिरतादेखील माझ्याजवळ नव्हती, अशी प्रांजळ कबुली तुकोबा- ‘‘नव्हतें अभ्यासीं चित्त आधीं’’ इतक्या नितळ शब्दांत देतात. मात्र, त्या बिंदूपासून पुढे तुकोबांनी ज्या विलक्षण ऊर्मीने अभ्यासाला वाहून घेतले त्याला तोडच नाही. अशा स्वयंपूर्ण, एकाकी साधनेची फलश्रुती कथन करताना तुकोबा दृष्टान्त देतात, तो काळ्याकभिन्न पत्थरांच्या भेगेत चिवटपणे रुजणाऱ्या कोवळ्या मुळांचा. ‘‘ओलें मूळ भेदी खडकाचें अंग। अभ्यासासी सांग कार्यसिद्धी।’’ अशा रसरशीत शब्दकळेद्वारे तुकोबा त्यांच्या खडतर ज्ञानोपासनेची यशस्वी इतिश्री अभिव्यक्त करतात. ज्ञानाच्या उपासनेदरम्यान विद्यार्थ्यांला ध्यानयोगाची निकड का भासते, याचे उत्तर इथे दडलेले आहे. मनाची एकाग्रता हा झाला ‘ध्यान’ या शब्दाचा अगदी उघड आणि सर्वपरिचित अर्थ. कोणत्याही विषयांचे आकलन करून घेण्याची शक्ती, हा ‘ध्यान’ या संकल्पनेचा सारभूत गाभा होय. अभ्यासगत विषयाचे आकलन होण्यासाठीही प्रथम चित्त आणि बुद्धी शांत असावी लागते. यासाठी पुन्हा निकड असते ती अभ्यासाचीच! ‘‘म्हणोनि यावया शांति। हाचि अनुक्रमु सुभद्रापती। अभ्यासुचि प्रस्तुतीं। करणें एथ।’’ अशा शब्दांत अभ्यास, ध्यान, शांती यांचा आंतरसंबंध ज्ञानदेव उलगडून स्पष्ट करतात. चित्त शांत असेल तरच अभ्यासलेल्या शब्दब्रह्माचे मनन शक्य बनते. मनन परिपूर्ण झाले, की त्याच्या पुढची पायरी गणले जाणारे निदिध्यासन विद्यार्थ्यांच्या ठायी आपसूकच फलद्रूप होते. निदिध्यासाद्वारे मग उजळतात ज्ञानप्राप्तीच्या वाटा! अभ्यास केला की आपोआप ज्ञान होत नसते, हाच संतांचा रोकडा जीवनानुभव सांगतो आहे. ‘पदवी आहे, पण ज्ञान नाही’ ही आजची दुरवस्था त्या सांगण्याकडे दुर्लक्ष केल्यानेच अवतरली असेल का?

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2021 1:04 am

Web Title: knowledge power loksatta advayabodh article zws 70
Next Stories
1 अभ्यास
2 स्वयंपूर्ण
3 जयां ऐहिक धड नाहीं…
Just Now!
X