– अभय टिळक

‘गोसावी’पदाचे लेणे धारण करणाऱ्या तुकोबारायांनी त्यासाठी साधनेचे किती पहाड फोडले, याची केवळ एक झलक निळोबारायकृत आरतीमध्ये बघावयास मिळते. तुकोबांच्या अंतरंग व्यक्तिमत्त्वाची महत्ता वर्णन करताना- ‘‘वैराग्याची निष्ठा प्रगटूनि दाखविली’’ अशी शब्दकळा निळोबांनी आरतीच्या एका चरणामध्ये योजलेली आहे. तुकोबांचे उभे जीवन म्हणजे वैराग्यनिष्ठेचे मूर्तिमंत दर्शनच जणू, हेच निळोबा सुचवितात. ‘अवस्था’, ‘वर्तनमार्ग’, ‘कार्यसिद्धी’… अशा अर्थांतराच्या छटा ‘निष्ठा’ या संज्ञेला लाभलेल्या आहेत. साधनापथावर गतिमान असलेल्या साधकाच्या जीवनात वैराग्य नेमकी कोणती भूमिका बजावते, याचे सूचन अर्थांतराचे हे पदर घडवितात. आध्यात्मिक वाटचालीचे गोमटे फळ मला केव्हा व कसे हस्तगत होईल, अशी तीव्र जिज्ञासा व्यक्त करणारे तुकोबारायांचे अनेक अभंग गाथेमध्ये आहेत. अध्यात्माचे शिखर गाठण्यासाठी अनिवार्य असणारी साधनसामग्री उपासकापाशी सिद्ध असणे ही त्या संदर्भातील पूर्वअट ठाऊक असणारे तुकोबाराय, म्हणूनच- ‘‘विवेकासहित वैराग्याचें बळ। धग्धगितोज्ज्वाळ अग्नि जैसा।’’ अशा उत्कट शब्दांत त्या साधनसंपदेबाबतची त्यांच्या मनीमानसी वसणारी असोशी एका अभंगामध्ये व्यक्त करतात. विवेकाची जोड लाभलेले वैराग्य साधनापर्वादरम्यान साधकाच्या उपासनेमध्ये नेमकी कोणती भूमिका बजावत असते, याचा उलगडा ‘ज्ञानदेवी’च्या १२ व्या अध्यायात, ज्ञानदेव- ‘‘पैं वैराग्य महापावकें। जाळूनि विषयांची कटकें।’’ अशा अर्थगर्भ शब्दांद्वारे करतात. वैराग्याला अग्नीची उपमा देण्याबाबत ज्ञानदेव व तुकोबाराय या उभयतांमधील ही एकवाक्यता अनुभूतीच्या प्रांतामध्ये या दोन विभूतींदरम्यान नांदणाऱ्या एकत्वाचे अधोरेखन करते. इंद्रियांचा सांगात धरून चौफेर उधळणाऱ्या मनाला बळाने अंतर्मुख बनवल्याखेरीज बुद्धीच्या शुद्धतेची शक्यता नजरेच्या टप्प्यात येत नसल्यामुळे वैराग्य आणि प्रत्याहार यांची सांगड प्रगल्भ साधक घालत असतो, असे ज्ञानदेव सूचित करतात. दिवसभर रानामध्ये चरणारी गुरे मावळतीला गुराखी ज्याप्रमाणे वळून गोठ्याकडे आणतो त्याच धर्तीवर, बहिर्मुख बनून विषयोपभोगांचा खुराक झोडत हुंदडणारी इंद्रिये साधकाला प्रथम अंतर्मुख बनवावी लागतात. ‘प्रत्याहार’ या अष्टांगयोगामधील योगाच्या पाचव्या अंगाचा शब्दश: अर्थ वस्तुत: तसाच आहे. पोटभर चरणे झालेले असूनही कुरणात दिसणाऱ्या लुसलुशीत हिरव्या चाऱ्याकडे धाव घेण्याचा प्रयत्न घराकडे बळाने वळवलेली ओढाळ जनावरे जशी वारंवार करतच राहतात, तसाच स्वभाव मनादी इंद्रियांचाही असतो. परंतु जनावरांना मोहवश करणारी ती कुरणे वणव्यात भस्मसात झाली तर प्रश्न मुळापासून निकालात निघतो. चरण्यासारखे परिसरात काहीच उरलेले नसल्यामुळे जनावरे, नाइलाजाने का होईना, पण जशी मुकाट गोठ्याकडे पावले वळवतात, तशीच काहीशी अवस्था होते मनासकट सगळ्या इंद्रियांची. साधकाच्या साधनापर्वादरम्यान वैराग्यरूपी अग्नी भूमिका बजावतो ती नेमकी हीच. प्रत्याहाराचा अवलंब करून अंतर्मुख बनवलेली इंद्रिये पुन्हा बहिर्मुख होऊन विषयोपभोगांचा चारा ओरपू नयेत म्हणून वैराग्यरूपी अग्नीने ती कुरणेच जाळून पुरती भस्मसात केली की मोहीमच फत्ते! ‘‘हें असो विषयजातीं। बुद्धी पोळली ऐसी माघौती। पाउलें घेऊ नि एकांतीं। हृदयाचां रिगे।’’ अशा शब्दांत नेमकी हीच प्रक्रिया ज्ञानदेव विशद करतात.

agtilak@gmail.com