News Flash

आहिक्य-परत्र

काही गैरसमज आपल्या जगण्याला घट्ट वेटाळून बसलेले असतात.

(संग्रहित छायाचित्र)

– अभय टिळक

काही गैरसमज आपल्या जगण्याला घट्ट वेटाळून बसलेले असतात. आपणही असे बहाद्दर, की या समजांची युक्तायुक्तता तपासून बघण्याच्या फंदात पडण्याचे टाळतोच. ऋजू मन, शुद्ध बुद्धी, विमल चित्त यांसारख्या बाबींची महत्ता केवळ परमार्थाच्या प्रांतापुरतीच सीमित अथवा मर्यादित असते, हा असाच एक परंपरेने चांगला परिपुष्ट झालेला अथवा बनविलेला (गोड) गैरसमज! या धारणेच्या मुळाशी एक अत्यंत कृत्रिम आणि तितकीच घातक अशी दुखंड जीवनदृष्टी असते, हेही आपल्या ध्यानातच येत नाही. आमचे ‘प्रापंचिक जीवन’ आणि आमचे ‘पारमार्थिक जीवन’ हे जणू दोन हवाबंद कप्पे असून त्यांचा एकमेकांशी सुतरामही संबंध नाही, अशी विलक्षण सोयीची धारणा आपण जोपासत असतो. या विभागणीला तर्काचे अस्तर अणुमात्रही नसते. तिथे असते एक चतुर सोय! प्रेम, सौहार्द, परोपकार, प्रामाणिकपणा ही सारी गुणसंपदा जोपासायची ती जगण्याच्या पारमार्थिक प्रांतात. अनीती, लबाडी, दांभिकपणा, मतलब या साऱ्यांचा अवलंब केल्याखेरीज व्यवहारात निभावच लागणार नाही, अशी बेमालूम बतावणी आपण सतत करत राहतो. ही असते आपली निखळ बदमाशी. मुळात जगण्याची अशी कृत्रिम विभागणीच सपशेल अमान्य आहे तुकोबांना. जीवनाचा प्रवाह अखंड एकसलग वाहत असतो आणि तो तसाच जगायचा असतो. असा रोखठोक पवित्रा- ‘‘अखंड खंडेना जीवन। राम कृष्ण नारायण।’’ अशा थेट शैलीत तुकोबा स्पष्ट मांडतात. नामस्मरण हे महाराजांच्या लेखी निव्वळ कर्मकांड नव्हे, तर जीवनाच्या एकसलगतेचे भान मनीमानसी बिंबवणारे ते हुकमी साधन होय. या जाणिवेचा धागा क्षणभरही विरळ होऊ न देता वाट्याला आलेल्या जबाबदाऱ्या निरलसपणे आमरण पार पाडणाऱ्या प्रापंचिकाची बुद्धी त्याच्या त्या साधनेखातर प्राप्त झालेल्या वैराग्यरूपी प्रसादाद्वारे निर्मळ बनते. त्याच्या आचरणाला विवेकाचा अंकुर फुटतो. गुरुबोधाच्या आरशात स्वत:ला सतत न्याहाळत सुधारत राहण्याने त्याच्या मनबुद्धीचा पोत पालटतो. अंतर्मुख बनलेली त्याची स्थिर बुद्धी मग परमशांतीमध्ये विसावते. ही अवघी प्रक्रिया तुमच्या-माझ्या लौकिक जगण्याची गुणवत्ता उंचावणारीच नव्हे का? या भूमिकेशी एकरूप झालेली व्यक्ती जगाकडे कोणत्या नजरेतून बघते हेच- ‘‘प्रकाश तो प्रकाश कीं। यासि न वचे घेई चुकी। म्हणौनी जग असकी। वस्तुप्रभा।’’ अशा मार्मिक शब्दांत ज्ञानदेव ‘अमृतानुभव’च्या सातव्या प्रकरणात विशद करतात. परमशिव नावाची सत्य, ज्ञानवान व स्वतंत्र अशी सद्वस्तूच विश्वरूपाने प्रगटलेली असल्याने ज्या जगात आपण व्यवहारतो ते जगही त्या शिववस्तूइतकेच सत्य, ज्ञानवान आणि अंतिम होय, हे ज्ञानदेव सुचवितात. या जगापेक्षा सुंदर, अधिक श्रेष्ठ असे गाठण्यासारखे दुसरे काही अस्तित्वातच नाही, हाच तर अद्वय-दर्शनाचा गाभा सिद्धान्त! त्यामुळे या जगण्याच्या चक्रातून सुटणे अथवा मुक्त होणे ही विचारधारा आणि परिभाषा इथे अप्रस्तुतच ठरते. या विश्वातील आपले जगणे जबाबदार आणि अर्थपूर्ण बनवणे हेच मग आद्य कर्तव्य ठरते. समता, करुणा, प्रेम ही सारी तशा त्या जबाबदार जगण्यासाठी अनिवार्य ठरणारी अशीच गुणसंपदा. लौकिक आणि पारलौकिकाच्या काठांना समस्पर्श करत जीवनप्रवाह वाहता राखावा हेच तर- ‘‘थडी आहिक्य परत्र। तुका ह्मणे समतीर।’’ अशा शब्दांत तुकोबा सांगत आहेत!

agtilak@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2021 12:01 am

Web Title: loksatta advayabodh article abn 97 11
Next Stories
1 शांती
2 दादरा
3 अंकुर
Just Now!
X