– अभय टिळक

‘समाजमनाला मार्गदर्शन करणाऱ्या लोकाग्रणीने समाजाच्या फार तर चारदोन पावलेच पुढे चालावे…’ ‘प्रबोधनपुरुष’ असे बिरुद सर्वार्थाने ज्यांना शोभून दिसते अशा न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे हे आवडते प्रमेय. या धोरणदृष्टीमागे न्यायमूर्ती रानडे यांची निश्चित अशी एक भूमिका होती. समाजाचा मार्गदर्शक, समजा, समाजाबरोबरच चालत राहिला तर कोणाचीच प्रगती संभवणार नाही. त्याच वेळी, समाजाला पार मागे टाकून समाजधुरीण उन्नतीच्या मार्गावर आगेकूच करीत राहिला तर समाज पाठीमागेच रेंगाळेल. पुढे गेलेल्या लोकनेत्याला गाठणे आपल्या आवाक्याबाहेरचे आहे, अशी धारणा बनून समाजमन फार तर त्या लोकोत्तर व्यक्तिमत्त्वाची पूजा करेल, मात्र त्याने दाखविलेल्या मार्गाने ते वाटचाल करत राहीलच याची हमी देता येत नाही, न्यायमूर्ती रानडे आपल्या भूमिकेचे  विश्लेषण असे करत असत. मार्गदर्शक चारदोन पावलेच पुढे असेल तर त्याला गाठण्याच्या ऊर्मीने समाजमन वेगाने पावले उचलण्याचा प्रयत्न करत राहते, असे रानडे यांचे त्या संदर्भातील बिनतोड तर्कशास्त्र. भागवत धर्मविचाराचा आणि त्यांतही तुकोबांचा न्यायमूर्तींवर असलेला प्रगाढ प्रभाव ध्यानात घेतला तर त्यांच्या या भूमिकेची गंगोत्री नेमकी कोठे आहे, हे लक्षात येते. ‘मार्गाधारें वर्तावें । विश्व हें मोहरें लावावें । अलौकिक नोहावें । लोकांप्रति’ या ‘ज्ञानेश्वरी’च्या तिसऱ्या अध्यायातील ज्ञानदेवांच्या ओवीची छाया न्यायमूर्तींच्या भूमिकेवर स्पष्ट जाणवते. ‘मोहोर’ अथवा ‘मोहर’ हा शब्द मार्मिक आहे. ‘पुढारणे’ अथवा ‘परिपक्व दशेस येणे’ आणि ‘प्रगती क रून घेणे’ अथवा ‘समूहाच्या पुढे राहणे’ हे दोन्हीही अर्थ याच शब्दाचे. समाज परिपक्व बनावा यासाठी त्याचे वैचारिक भरणपोषण करणाऱ्या म्होरक्याने, समाज ज्या मार्गाने वाटचाल करत असतो तोच मार्ग धरून, ‘आपण कोणी तरी अलौकिक आहोत,’ असा आविर्भाव न जोपासता समाजाला मार्गदर्शन करत राहायचे असते, हा ज्ञानदेवांच्या कथनाचा इत्यर्थ. पैठणातील धर्मपीठाकडून शुद्धिपत्र आणावयाचे किंवा नाही, या संदर्भात ज्ञानदेवांनी त्या वेळी धारण केलेली भूमिका नेमकी हीच होती. परतत्त्वाशी समरस होऊन लौकिकावेगळ्या अवस्थेत स्थित असलेल्या आपल्यासारख्यांना समाजपुरुषाच्या लौकिक प्रशस्तिपत्रकाची गरजच नाही, या निवृत्तिनाथांच्या तसेच सोपानदेवांच्या भूमिकेचा नम्र परंतु ठाम प्रतिवाद ज्ञानदेव करतात तो बांधिलकीच्या त्याच भावनेच्या त्यांनी केलेल्या डोळस अंगीकारापायी. समाजव्यवहारातील न्यून दूर करण्यासाठी झटणाऱ्या लोकमनस्काने समाजहिताच्या दृष्टीने रास्त आणि योग्य व्यवहार कसा असतो हे स्वत:च्या आचरणाद्वारे समाजमनाला शिकवायचे असते, ही ज्ञानदेवांची जीवननिष्ठा ‘म्हणोनियां संतीं अवश्य आचरावें । जना दाखवावें वर्तोनियां’ अशा शब्दांत नामदेवराय सांगतात. लोकहिताच्या दृष्टीने घातक असलेली रूढी एकाएकी आमूलाग्र बदलणे समाजमनाला पचणारे नसते. त्यासाठी लोकमानस प्रयत्नपूर्वक तयार करावे लागते. ‘बालकाचे चाली। माता जाणुनि पाऊल घाली ’अशा शब्दांत तुकोबा तेच सांगतात. समाजाच्या पुढे चार पावले चालत असतानाच आधाराचा हातही पुढे करायचा असतो संवेदनशील समाजशिक्षकाने. ‘तुका म्हणे नाव । जनासाटीं उदकीं ठाव’ या तुकोक्तीचा विसर म्हणूनच पडू द्यायचा नसतो कधी समाजमानसाने.

agtilak@gmail.com