भागवतधर्मी संतपरंपरेने निवृत्तिनाथांना भगवान शंकरांचा अवतार मानलेले आहे. ‘‘सदाशिवाचा अवतार। स्वामी निवृत्ति दातार।’’ हा जनाबाईंचा दाखला या संदर्भात मननीय ठरतो. किंबहुना या मालिकेतील अन्य विभूतींची धारणादेखील तशीच दिसते. ‘‘शिव तो निवृत्ति विष्णू ज्ञानदेव पाहीं। सोपान तो ब्रह्मा मूळ माया मुक्ताई।’’ अशी साक्ष पुरवत कान्होपात्रा ती धारणा अधोरेखित करतात. या चारही भावंडांसंदर्भात नामदेवरायांच्या गाथ्यात एक विलक्षण अभंग आहे. मुंजीसाठी पूर्वअट म्हणून पैठणच्या धर्मपीठाकडून शुद्धिपत्रक घेऊन येण्याबाबत आळंदीनिवासी ब्रह्मसभेने आदेश दिल्यानंतर त्याबाबत या भावंडांत जो विचारविनिमय घडला त्याचे शब्दरूप म्हणजे नामदेवरायांचा तो अभंग. त्या विचारविमर्शादरम्यान पराकोटीचा मूलभूत असा मुद्दा उपस्थित करतात निवृत्तिनाथ. ‘संन्याशाची संतती’ असा ठपका ठेवला गेल्यामुळे लौकिक व्यवहारामध्ये आमचे स्थान कसेही व कोठेही असले तरी स्वरूपत: आम्ही निरुपाधिक, शुद्ध व गुणातीत असल्याने ‘शुद्धिपत्रक’ वगैरेसारख्या लौकिक जगातील नियम वा संकेत स्व-स्वरूपाच्या संदर्भात पूर्ण अप्रस्तुतच ठरतात, असा अलौकिक पवित्रा निवृत्तिनाथ व्यक्त करतात. ‘‘ते आह्मी अविनाश अव्यक्त जुनाट। निजबोधें इष्ट स्वरूप माझें।’’ हे निवृत्तिनाथांचे नि:संदिग्ध उद्गार त्यांच्या असाधारण व्यक्तिमत्त्वाचे निखळ सूचन घडवितात. तर, ‘‘भक्ति हे सरती जाती न सरती। ऐसी आत्मस्थिती स्वसंवेद्य।’’ अशी भूमिका धारण करत सोपानदेवही आपले मत निवृत्तिनाथांच्याच पारडय़ात टाकतात. इथे ज्ञानदेवांनी मांडलेला युक्तिवाद मात्र आगळा आणि बिनतोड आहे. आपण स्वत: जरी विशुद्ध आत्मनिष्ठ आणि स्वस्वरूपलीन असलो तरी ज्या भौतिक जगात आपण जगतो त्या जगाच्या लोकव्यवहारातील प्रथा-परंपरा आपण पाळल्याच पाहिजेत, असे विश्लेषण मांडत शुद्धिपत्रकासाठी पैठणच्या पीठाचा कौल घेण्याबाबत भावंडांचे मन ज्ञानदेव वळवतात. या प्रसंगाची चर्चा आपण या बिंदूवरच थांबवू. इथे कळीचा मुद्दा ठरतो तो निवृत्तिनाथांच्या कथनाद्वारे प्रगट होणाऱ्या अद्वयसिद्धान्ताचा. जगाचे आदिकारण असलेले अविनाशी, अविकारी, अक्षर असे शिव हे तत्त्व आणि स्वरूपत:च विकारी असणारे दृश्य जग यांचे नाते बिंब-प्रतिबिंबासारखे आहे, याची अनुभूती आल्यानंतर राग, द्वेष, तिरस्कार या भावनांना जागाच उरत नाही, हे निवृत्तिनाथ त्यांच्या एका अभंगात- ‘‘आपणचि विश्व आपणचि विश्वेश। जेथें द्वेषाद्वेष मावळले।’’ अशा शब्दांत विदित करतात. ‘अक्षर’ म्हणजेच अविनाशी, अव्यक्त. तर ‘क्षर’ म्हणजे व्यक्त झालेली सर्व भूतमात्रे. अक्षरातूनच क्षराची निर्मिती झालेली आहे अथवा अक्षर असणारे आदितत्त्वच क्षररूपाने विश्वाकार बनलेले आहे, हा अद्वयाचा पायाभूत सिद्धान्त, ‘‘विश्वामाजी अक्षर क्षरलें साचार’’ अशा नितळ शब्दांत निवृत्तिनाथ मांडतात. क्षर वा अक्षर अशा कोणत्याही अवस्थेत जे आदितत्त्व अविकार राहते ‘‘ते आह्मी अविनाश अव्यक्त जुनाट’’ आहोत, हेच निवृत्तिनाथ सांगत आहेत. हाच तत्त्वबोध ज्ञानदेव ‘चांगदेवपासष्टी’त- ‘‘प्रकटे तंव तंव न दिसे। लपे तंव तंव आभासे। प्रकट ना लपाला असे। न खोमतां जो।।’’ अशा नेमक्या शब्दकळेद्वारे चांगदेवांना विशद करून सांगतात. विश्वोत्तीर्ण किंवा विश्वात्मक अशा कोणत्याही अवस्थेत जो स्वत: निर्विकार नांदत असतो, ज्याच्या रूपामध्ये काहीच बदल होत नसतो अशा श्रीवटेश्वराचे आपण दोघेही उपासक आहोत, हा बोध चांगदेवांना तिथे ज्ञानदेव करतात.

agtilak@gmail.com