अभय टिळक

ज्ञानदेवांचे परमगुरू गहिनीनाथ हे त्यामानाने अलक्षित परंतु प्रचंड क्रांतिकारी असे विभूतिमत्व होय. नाथसंप्रदायाच्या तत्कालीन महाराष्ट्राच्या भावविश्वात नाथसंप्रदायाच्या मूल्यसंचिताचे जागरण सघनपणे घडवून आणण्याचे श्रेय जाते गहिनीनाथांकडे. आदिगुरू भगवान शंकरांपासून प्रवाहित बनलेल्या शांभवाद्वयाच्या बोधगंगेशी भागवतधर्मातील कृष्णभक्तीचा प्रवाह कमालीच्या सहजपणे एकजीव बनविण्याचे अपूर्व कार्यकर्तृत्व हा गहिनीनाथांच्या योगदानाचा परमोत्कर्षच जणू. भागवत धर्मविचाराचे मंडण करण्याचे महत्कार्य ज्या कवि, हरि, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, आविर्होत्र, द्रुमिल, चमस आणि करभाजन या नवनारायणांद्वारे घडून आल्याचे कथन श्रीमद्भागवतपुराणात नमूद आहे, त्यांतील करभाजन या नवव्या नारायणांचा उत्तरावतार म्हणजे गहिनीनाथ, अशी परंपरेची धारणा होय. नाथ व भागवत या दोन तत्त्वपरंपरांचा आणि पर्यायाने शिव व विष्णू या उभय दैवतांच्या उपासनांचा समन्वय गहिनीनाथांच्या माध्यमातून साकारला, हे वास्तवकथन ‘‘निवृत्ति गयनी कृपा केली पूर्ण। कुळ हे पावन कृष्णनामे।’’ अशा शब्दांत निवृत्तिनाथ नोंदवितात. शांभवाद्वयाचा तत्त्वबोध गोरक्षांकडून हस्तगत झालेल्या गहिनीनाथांची लोकव्यवहारातील जीवनरीत निवृत्तिनाथांनी एका अभंगात- ‘‘निर्द्वद्व नि:संग विचरतां मही। सुखानंद हृदयीं स्थिरावला।’’ अशा शब्दकळेने वर्णन केली आहे. अभंगाच्या या ओळीत काही ठिकाणी एक पाठभेद नोंदविलेला आढळतो. ‘नि:संग’ या शब्दाऐवजी काही ठिकाणी ‘नि:शंक’ अशी शब्दयोजना दिसते, एवढाच काय तो फरक. अद्वयबोधाची अनुभूती परिपूर्ण प्राप्त झालेले गहिनीनाथ नि:संग अथवा नि:शंक मनोवस्थेमध्ये लोकव्यवहारात सर्वत्र गतिमान आणि कृतिशील राहिले, असे निवृत्तिनाथ त्यांच्या गुरूंचे महिमान वर्णन करतात. आपल्या अनुभवाला येणारे जग म्हणजे वस्तुत: एकाच परमशिवाचे प्रगटन होय, ही प्रचिती गाठीशी असल्याने गहिनीनाथांच्या अंत:करणातील ‘आप-पर’ भावना समूळ निवारण झाली आणि द्वैताचे ठाण उठल्यामुळे द्वंद्व आपोआपच लयाला गेले, अशी संगती निवृत्तिनाथ उलगडून मांडतात. समतेचा पुरेपूर अंगीकार एकदा का जीवनामध्ये घडला, की हृदयातून द्वंद्वभावनेचे विसर्जन आपोआप घडून येते आणि जीवन शुद्ध बनते, हे अंतर्बाह्य़ शुद्धीचे रहस्य निवृत्तिनाथ त्यांच्या सद्गुरूंच्या जीवनरीतीद्वारे प्रगट करतात. त्या दृष्टीने, समतेचा अंगीकार ही द्वंद्वनिवृत्तीची अनिवार्य अशी पूर्वअट ठरते. भय वाटणे हे मलीन, अशुद्ध अंत:करणाचे द्योतक होय, हा निवृत्तिनाथांच्या सूचनाचा गाभा ठरतो. द्वंद्व निमाले की भयाची भावना आपसूकच विसर्जित होते. ‘‘चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती’’ हा तुकोबांचा अनुभव म्हणजे या कार्यकारणभावाचे अधोरेखन. भवतालचे जग हे जनार्दनाचे प्रगटनच होय, या वास्तवाची अनुभूती येण्यासाठीच भक्ती, ज्ञान, वैराग्य या साधनांची कास धरायची, हे मर्म- ‘‘भक्तिज्ञान वैराग्य तिहींचे शोधन। जनी जनार्दन हेंचि खरें।’’ अशा प्रकारे निवृत्तिनाथ प्रगट करतात, त्यांमागील हेतूही तोच. समत्वाचे बीजारोपण त्या प्रचीतीद्वारेच शक्य बनते. ‘‘समता धरा आधीं टाका द्वैतबुद्धी। आपे आप शुद्धी गोविंदी रया।’’ हे निवृत्तिनाथांचे उद्गार म्हणजे जीवनशुद्धीची जणू गुरुकिल्लीच. ‘स्व’ची बळकट जाणीव हीच मुदलात अशुद्ध बाब. ‘‘समता वर्तावी अहंता खंडावी’’ ही जीवनरीत म्हणजे शुद्धीचा राजमार्ग. तो आपण स्वीकारणार का?

agtilak@gmail.com