25 February 2021

News Flash

पतिव्रता

आदिनाथ शिव व त्याची अर्धागिनी असलेल्या शक्तीतत्त्वाचे अलौकिकत्व गाताना ज्ञानदेवांच्या वाणीला खरोखरच बहर येतो

(संग्रहित छायाचित्र)

अभय टिळक

आदिनाथ शिव व त्याची अर्धागिनी असलेल्या शक्तीतत्त्वाचे अलौकिकत्व गाताना ज्ञानदेवांच्या वाणीला खरोखरच बहर येतो. शिवासारख्या अतुलनीय सत्ता असलेल्या सहचराचा आधार असल्यामुळेच शक्तीच्या ठायी वसणाऱ्या निर्मितीक्षमतेचे अंकुरण संभवते. अशी सृजनशील शक्ती अखंड समवेत नांदत असल्यामुळेच शिव सत्ताधीश बनू शकतो, हे शांभवाद्वयाचे गाभासूत्र ज्ञानदेवांनी ‘जे स्वामिचिया सत्ता। वीण असो नेणे पतिव्रता। जियेवीण सर्व कर्ता। काही ना जो’ या काव्यमय शब्दांनी मंडित केले आहे. शक्तीच्या अलौकिक पातिव्रत्याचे आगळेपण वर्णन करताना ज्ञानदेवांची प्रतिभा उत्तुंग भराऱ्या घेते. ज्ञानदेवांचा खरोखरच कूट भासावा असा एक अभंग यासंदर्भात कमालीचा आशयगर्भ ठरतो. हा अभंग म्हणजे वस्तुत: शक्तीचे जणू एकवचनी कथनच होय. ज्या शिवासह मी अनादी काळापासून अभिन्नत्वाने नांदते आहे, त्या माझ्या पतीशी माझा विवाह कसा झाला याची रोचक गोष्ट आता तुम्हाला सांगते, असा त्या साऱ्या कथनाचा बाज आहे. मुळातच एकल असलेल्या शक्तीतत्त्वाला विवाहाची इच्छा म्हणा वा प्रेरणा म्हणा- होणे, हीच एक मोठी मौज ठरते. सारी काव्यमयता ठासून भरलेली आहे ती याच आरंभबिंदूवर. आता लग्न करून संसार मांडण्यासाठी नवरा हवा. शैवदर्शनाच्या बोधानुसार, या विश्वात शिवमय शक्तीखेरीज अन्य पदार्थच अस्तित्वात नाही. अशा स्थितीत आंतरपाटापलीकडे उभे राहण्यासाठी ‘नवरा’ नावाचे वेगळे अस्तित्व आणायचे कोठून, हाच मूलभूत प्रश्न. हळुवार, काव्यमय अशा या प्रस्तावनेनंतर ज्ञानदेव शांभवाद्वयाच्या गाभ्याचा पट उलगडतात. आता नवरा कोठून पैदा करायचा, असा प्रश्न पडलेल्या शक्तीने झटकन निर्णय घेतला आणि ती स्वत:च ‘नवरा’ हे एक वेगळे अस्तित्वरूप घेऊन दृश्यमान झाली! करणार काय? अखेर सर्वत्र एक आणि केवळ एकच तत्त्व भरलेले आहे ना! आपलेच प्रगटीकरण असलेल्या नवऱ्याच्या गळ्यात माळ घालून शक्तीने त्याला वरला आणि त्याच्याबरोबर संसार मांडून दाम्पत्यभावाने ती सुखात नांदू लागली. नवरा आणि नवरी हे दोघेही एकाच तत्त्वाचे प्रगटीकरण. ‘पति जन्मला माझे उदरी। मी जालें तयाची नोवरी’ अशा शब्दांत हा अ-साधारण अनुभव ती शक्ती मग जगाला सांगते. नानाविध आकाररूपांनी प्रगट होऊन प्राणिमात्रांदरम्यान नांदणाऱ्या अनंत नातेसंबंधांमधील गोडी आपल्याच ठायी अनुभवण्यासाठी एकच तत्त्व कसे नटते, प्रगटते याचे उद्बोधन करणारा ज्ञानदेवांचा हा अभंग म्हणजे शांभवाद्वयाच्या तत्त्वबोधाचे विलक्षण रम्य, मधुर असे अनन्यसाधारण शब्दरूपच. आपणच साकारलेल्या पतीवर आपले किती अपरंपार प्रेम आहे, हे ती शक्ती मग ‘निर्गुण पति आवडे मज। आधीं माय पाठीं झालिये भाज’ अशा शब्दांत वर्णन करून सांगते. ‘भाज’ म्हणजे ‘बायको’! माझ्या नवऱ्यावर माझे असाधारण प्रेम असल्यामुळे प्रथम त्याची आई बनून मी त्याला जन्म दिला आणि मग त्याची बायको बनून मी आता त्याच्याबरोबर आनंदाने नांदते आहे, असे सांगत शक्ती तिच्या पातिव्रत्याचे आगळेपण मिरवते. कोणत्याही प्रकारे नवऱ्याचा वियोग घडू देत नसल्यामुळे, ‘मी मायराणी पतिव्रता शिरोमणी आहे,’ हेही शक्ती गर्जून सांगते. पुरुषाच्या संदर्भात स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळची माता असते, या सर्वज्ञात उक्तीचे बीज शक्तीच्या याच कथनामध्ये रुजलेले असेल का?

agtilak@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2021 12:06 am

Web Title: loksatta advayabodh article abn 97 7
Next Stories
1 स्वतंत्र
2 महात्मा
3 आपे आप शुद्धी गोविंदी रया..
Just Now!
X