अभय टिळक

‘नाट’ हा एक अभंग प्रकार होय. गंमत अशी आहे की, निवृत्तिनाथांपासून निळोबारायांपर्यंतच्या वारकरी संतमालिकेत केवळ दोनच संतांनी हा अभंग प्रकार हाताळलेला दिसतो. तुकोबा आणि त्यांचे धाकटे बंधू कान्होबा हे ते दोन संत. बाकी कोणाच्याच गाथेमध्ये ‘नाट’ हा अभंग प्रकार आढळून येत नाही. विभिन्न छटा लाभलेले जवळपास आठ ते नऊ अर्थ ‘नाट’ या संज्ञेसाठी शब्दकोशात सापडतात. ‘नाट लागला’ या शब्दसंहतीद्वारे ध्वनित होणारा नकारात्मक सूरच त्या साऱ्या अर्थच्छटांमधून उमटतो. अडथळा, त्रास, अडचण, कोंडी, प्रतिकूलता, अभाग्य, नुकसानकारक.. अशा सगळ्या त्या अर्थच्छटा. परंतु तुकोबारचित नाटांचे एक मोठे विलोभनीय वैशिष्टय़ असे की, तुकोबांच्या पारमार्थिक प्रवासातील टप्प्यांचे अनेकानेक सूक्ष्मातिसूक्ष्म पदर-उपपदर तिथे उलगडलेले दिसून येतात. साधकावस्थेपासून ते पांडुरंगाशी पूर्णपणे एकरूप होण्यापर्यंत तुकोबांची झालेली वाटचाल बारीकसारीक तपशिलांसह या अभंगांद्वारे आपल्या पुढय़ात मांडली जाते. एकंदर ५६ अभंगांच्या या गुच्छामध्ये एक अभंग विलक्षणच आहे. परमतत्त्वाच्या विश्वात्मकतेची अनुभूती आल्यामुळे- ‘‘काय डोळे झांकुनियां पाहूं। मंत्रजप काय ध्याऊं। कवणें ठायीं धरूनि भाव। काय तें वाव तुजविण।’’ अशा संभ्रमानंदामध्ये बुडालेले तुकोबा या अभंगाद्वारे आपल्या पुढय़ात अवतरतात. ही अवस्था असाधारण अशीच म्हणायची. भक्तीचे सुख उपभोगण्यासाठी ‘भक्त’ आणि ‘भगवंत’ या दोन अवस्थांद्वारे एकल चैतन्यच प्रगटलेले आहे, ही स्वत:ला पटलेली ओळख- ‘‘अद्वय चि द्वय जालें चि कारण। धरिलें नारायणें भक्तिसुख।’’ अशा शब्दांत मांडत, साक्षात्काराचा तो टप्पा पार करून तुकोबा आता पुढे आलेले आहेत. या बिंदूवर तुकोबांच्या समोर असलेली समस्या म्हणा वा उत्कंठा, निराळीच आहे. सोन्याचे निरनिराळे अलंकार बनवून गोट, पाटल्या, तोडे अशी वेगवेगळी नावे त्यांना दिली तरी मुळात ते सोनेच असते, या न्यायाने, परमात्मा आणि मी आता पूर्ण सामरस्याची स्थिती भोगत असल्याने भजन कोणी व कसे करावयाचे, हा तुकोबांना पडलेला प्रश्न होय. ‘‘काय आह्मी भक्ति करणें कैसी। काय एक वाहावें तुह्मांसी। अवघा भरोनि उरलासी। वाणीं खाणीं रसीं रूपीं गंधीं।’’ अशा कमालीच्या प्रांजळ शब्दांत तुकोबा आपली मनोवस्था नितळपणे प्रगट करतात. अद्वयदर्शनाचा प्रवाह भागवत धर्ममंदिराच्या पायापासून ते थेट कळसापर्यंत अविरत, अक्षुण्ण वाहता असल्याचा हा निरपवाद दाखलाच म्हणायचा! नदी, विहीर, आड, ओहोळ हे शब्द निरनिराळ्या अस्तित्वांचे सूचन करतात, ही बाब खरीच. परंतु अद्वयाच्या भूमिकेवरून निरखले तर त्या प्रत्येक ठिकाणी एका जलतत्त्वाचेच बोधन होते, हे वास्तव कोणी नाकारू शकेल काय? दही, लोणी, तूप ही पदार्थाची नावे निरनिराळी असली तरी दूध हेच त्यांचे आदितत्त्व होय, हे कोण अमान्य करील? याच चिरंतन, अम्लान वास्तवाची साक्ष- ‘‘तुका ह्मणे एक एक ते अनेक। अनेकत्वीं एक एकपणा।’’ अशा उत्कट शब्दांत मांडतात तुकोबा. अनेकत्वात एकत्व हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्टय़ होय, असे आपण जे अभिमानाने म्हणतो त्याचे मूळ नेमके कोठे आहे याचा उलगडा आता तरी व्हावा.

agtilak@gmail.com