News Flash

सत्यज्ञानानंत

कवी, संत आणि तत्त्वज्ञ अशा तीनही रूपांमध्ये ज्ञानदेव त्यांच्या शब्दविश्वामध्ये आपल्याला ठायी ठायी भेटत राहतात

(संग्रहित छायाचित्र)

अभय टिळक

कवी, संत आणि तत्त्वज्ञ अशा तीनही रूपांमध्ये ज्ञानदेव त्यांच्या शब्दविश्वामध्ये आपल्याला ठायी ठायी भेटत राहतात. उत्तुंग आणि असीम प्रतिभा ही तर कवीची जणू आत्मखूणच.  एका अभंगात ‘ज्याला रूप नाही, वर्ण नाही, गुणाचा तर मागमूसही नाही अशा अमर्याद गगनाचे उपरणे अथवा पांघरूण ज्याने धारण केलेले आहे त्या श्रीहरीला मी डोळे भरून बघितला,’ हा आनंद शब्दांकित करतेवेळी ज्ञानदेव, त्या श्रीहरीला ‘सतज्ञानानंत’ असे तिपदरी विशेषण बहाल करतात. ज्या परमतत्त्वाच्या अनुभूतीचा सोहळा मी उपभोगला ते परमतत्त्व सत्य,  ज्ञानमय आणि अनंत आहे, हे ज्ञानदेव इथे सांगतात. ‘सत्य’ हे विशेषण त्या तत्त्वाचे त्रिकालबाधित्व स्पष्ट करते. त्याच्या ठिकाणी असणारे ज्ञातृत्व ‘ज्ञान’ या गुणविशेषाद्वारे विदित होते. तर, ‘अनंत’ हे पद परतत्त्वाची कालातीत व्यापकपण सूचित करते. अनुभूतीच्या त्याच कोटीमध्ये विराजमान असणाऱ्या तुकोबांची साक्षही हुबेहूब अशीच आहे. वर बघावे तर नजर जाईल तिथवर वा त्याच्याही पलीकडे डोईवर गगन विस्तारलेले असते; त्याच न्यायाने, ‘‘न वर्जिता दाहीं दिशा। जिकडे पाहे तिकडे सरिसा’’ असा तू आहेसच आहेस, असे तुकोबा विठ्ठलाला म्हणतात. ज्ञानदेवांच्या नाथपरंपरेचे आदितत्त्व असणारे भगवान शिव याच गुणसंपदेने संपन्न आहेत. या विश्वाचे अधिष्ठान असणारे ‘ब्रह्म’ हे तत्त्वही याच तीन गुणविशेषणांनी मंडित आहे. परंतु, शिव आणि ब्रह्म या दोहोंमध्ये एक अतिशय मूलभूत असा गुणात्मक फरक आहे. ज्ञातृत्व दोघांच्याही ठायी विराजमान आहे. मात्र ज्ञातृत्वाच्या जोडीने परमशिवाच्या ठिकाणी ‘विमर्श’ ही आणखी एक क्षमताही आहे. बह्माच्या ठायी मात्र ही क्षमता विद्यमान नाही. अन्य कोणावरही अवलंबून नसलेली अशी त्या परमशिवाची इच्छाशक्ती म्हणजे ‘विमर्श’. ते शिवतत्त्व विमर्शयुक्त असल्यामुळेच स्वायत्त आहे. अशा या स्वायत्त इच्छाशक्तीद्वारेच शिवाच्या ठिकाणी क्रियाशीलतेचा संचार घडून येतो. स्वत:त अवस्थांतर घडवून आणण्याची स्वायत्त इच्छाशक्ती असल्यामुळेच, स्फुरण येईल तेव्हा विश्वरूपाने विलसण्याचे स्वातंत्र्य परमशिवापाशी नित्य वसते. तेच तर त्याचे विश्वात्मक रूप.  नेमके हेच सारतत्त्व, ज्ञानदेव, स्वस्वरूप असलेल्या लाटांशी खेळण्या-बागडण्यात आत्ममग्न झालेल्या सागराचे रूपक योजून आपल्याला वारंवार सांगतात. लाटा निर्माण करण्यासाठी ज्याप्रमाणे समुद्राला अन्य कोणत्याही बाहेरच्या पदार्थाची अथवा घटकाची गरज भासत नाही तसेच या शिवाचेही आहे. विश्वात्मकतेने नटण्यासाठी त्याला त्याच्यापेक्षा भिन्न अशा कशाचीही निकड भासत नसते; याही अर्थाने शिव स्वायत्त. शांभवाद्वयाद्वारे आपल्या विचारविश्वाला मिळणारी कलाटणी दडलेली आहे ती नेमकी इथेच. त्रिकालाबाधित, ज्ञानमय असणारे विमर्शयुक्त शिवतत्त्व विश्वात्मक होऊन विलसते, तेव्हा जग प्रगटते. कार्यकारण-भावाच्या साध्या नियमानुसार, कारणाची सारी गुणवैशिष्टय़े कार्यामध्ये उतरतातच. विभात्मक होऊ न प्रगटलेले शिवतत्त्व स्वरूपत: सत्य व ज्ञानमय असल्यामुळे त्याच्यासारखेच व त्याच्याइतकेच ते विश्वही सत्यच असावे, हे ओघानेच येते. ज्या जगात आपण जगतो, वाढतो ते जग सत्य आहे, ही अद्वयबोधाची भूमिका जर अंत:करणावर बिंबली तर जगाकडे बघण्याची आपली दृष्टी पालटून जाईल. केवळ दृष्टीच नव्हे तर पालटावी आपली वृत्तीही !

agtilak@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 19, 2021 12:06 am

Web Title: loksatta advayabodh article after the truth abn 97
Next Stories
1 स्थिर नाहीं एकवेळ
2 वस्तुप्रभा
3 नित्य-नूतन
Just Now!
X