अभय टिळक agtilak@gmail.com
‘गणपती’ हे श्री गजाननाचे अभिधानच स्वरूपत: समूहवाचक होय. ‘गण’ म्हणजे ‘लोक’ अथवा लोकांचा समूह. समूहाचा जो नायक तो ‘गणनायक’! गजमुख गजानन ही समूहप्रधान देवता. भागवतधर्माने प्रवर्तित केलेले भक्तितत्त्वदेखील समूहकेंद्रीच आहे. त्यामुळे भागवतधर्मी संतपरंपरा आणि गजाननाचे नाते अनेक पदरी असे आहे. मुळात, ज्ञानदेवांची परंपरा नाथसंप्रदायाची. भगवान शंकर हे तर नाथसंप्रदायाचे व त्या संप्रदायाने प्रवर्तित केलेल्या शैवागमाच्या तत्त्वदर्शनाचे उगमस्थान. गणपतीबाप्पा हे शिवपुत्र. त्यामुळे शैवपरिवारातील एक उपास्य दैवत म्हणून त्यांचे अधिष्ठान स्वयंसिद्ध! भगवान शंकर आणि गणाधीशांमध्ये असणारे साम्यही बहुपदरी. ‘भालचंद्र’ हे अभिधान शोभते दोघांनाही. नागबंध हा या पिता-पुत्रांना परमप्रिय. त्रिनेत्र असणाऱ्या भगवान शंकरांचा तिसरा डोळा हा ज्ञानचक्षू आणि गणेश हे तर मूर्तिमंत विद्येचेच दैवत. शिवगणांच्या मेळ्यात भगवान शंकरांनी रमावे. तर गणांचे अधिपत्य हे तर गजवदनाचे आद्य स्वरूप. गजचर्म हे भगवान शंकरांचे आवडते आभूषण तर त्यांचा आत्मज ‘गज’ वदन. ‘गज’ ही संज्ञाही विलक्षण अर्थवाही अशीच आहे. मुद्गल पुराणाची साक्ष या संदर्भात कळीची ठरते. मुद्गल पुराणानुसार ‘गज’ या संज्ञेतील ‘ग’  हा विसर्जन वाचक तर ‘ज’ हा आहे सर्जनवाचक. विश्वाची उत्पत्ती सूचित करतो ‘ज’ तर त्याच विश्वाच्या विलयाचे सूचन घडवतो ‘ग.’ विश्वाचे सृजन आणि विसर्जन या दोहोंचे अधिष्ठान असणारे अंतिम आणि एकल तत्त्वाचे म्हणजे ‘गज’मुख गणाधीप. ज्ञानदेवांच्या प्रतिपादनानुसार दृश्य जगाचे उन्मीलन आणि संहार हे एकपात्र, एकल अशा शिवतत्त्वाचे विलसन होय. संहार याचा अर्थ विनाश नव्हे. आपले प्रगट विश्वात्मक असे रूप तो परमशिव त्याला विलासक्रीडेचा कंटाळा आला की त्याच्या इच्छेने पुन्हा आवरून घेतो. एकच ‘तत्त्व’ त्यांच्या इच्छेने प्रगटते आणि त्यांच्या इच्छेनेच स्वत:चे आविष्कृत असे प्रगट रूप पुन्हा अदृश्य बनवते. गजान‘न’ आणि त्यांचे गजचर्मधारी तीर्थरूप भगवान शिव यांचे एकरूपत्व ‘गज’ ही संज्ञा संकल्पना अधोरेखित करते ती अशी. ‘ज्ञानदेवी’च्या पहिल्याच ओवीमध्ये गणरायाला वंदन करत असताना ज्ञानदेवांनी पराकोटीच्या मार्मिकपणे शैवागमांचे तेच गाभासूत्र गणेशवर्णनासाठी योजलेल्या दोन गुणरूपदर्शक विशेषणांद्वारे निर्देशित केलेले आहे. अखिल अक्षरब्रह्माचे अधिष्ठान असणारा ॐकारस्वरूप गणनायक ‘वेद प्रतिपाद्य’ आणि ‘स्वसंवेज्ञ’ असा असल्याचे ज्ञानदेवांचे प्रतिपादन ज्ञानेश्वरीच्या प्रारंभीच ॐनमो जी आद्या। वेद प्रतिपाद्या । जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा। असे शब्दरूप धारण करून अवतरलेले आहे. एक अ-साधारण गंमत केलेली आहे ज्ञानदेवांनी इथे. शैवगमाच्या गाभासूत्रामध्ये ज्ञानदेवांनी गुंफलेले आहे गणेशतत्त्वाचे अवघे रूप. दृश्य विश्वाची निर्मिती आणि लय यांचे सूचन घडविणारे गजतत्त्व आणि विश्वाचे उन्मीलन व संहरण ‘नियंत्रित’ करणारे ‘परमशिव’ हे तत्त्व यांची समरूपता सिद्ध करतात ज्ञानदेव या ठिकाणी. आदिबीज असणारा ओमकार स्वरूप गणनायक ‘विश्वात्मक’ बनला की ‘वेद प्रति पाद्य’ असतो आणि तोच गणाधीश ‘विश्वोत्तीर्ण’ रूपामध्ये केवळ आणि केवळ स्वसंवेद्य असतो, हे सांगत आहेत ज्ञानदेव आपल्याला. गणरायांना शिवात्मज म्हणायचे ते याचसाठी!