‘यदु’ हे यादवकुळाचे मूळ पुरुष. त्यांच्या नावावरूनच त्या कुळात पुढे निपजलेल्या वंशजांना ‘यादव’ असे संबोधले जाऊ लागले, अशी परंपरेची धारणा. आपले पूर्वज असणाऱ्या यदुराजांच्या चरित्रातील एक प्रसंग यादवकुलोत्पन्न भगवान श्रीकृष्ण त्यांचे अंतरंग भक्त असणाऱ्या उद्धवांना सांगतात असा एक प्रसंग श्रीमद्भागवतात आपल्याला सापडतो. यदु आणि अवधूत यांची भेट व उभयतांमध्ये पुढे झालेल्या संवादाभोवती ते कथानक गुंफलेले आहे. ‘एकनाथी भागवता’च्या सातव्या, आठव्या आणि नवव्या अध्यायांत नाथांनी त्यावर विस्तृत विवेचन केलेले आढळते. दत्तात्रेयांनी केलेल्या २४ गुरूंचे विलक्षण मननीय विवरण यदु व अवधूत यांच्या संवादाद्वारे उलगडते. शिक्षणप्रक्रिया आणि त्या प्रक्रियेमध्ये अनुस्युत असणाऱ्या गुरू व शिष्य या दोन भूमिकांसंदर्भातील आगळे दर्शन त्या संवादाच्या माध्यमातून नाथराय तिथे साकारतात. आत्मानंदामध्ये निमग्न, सदैव सतेज, टवटवीत, उत्फुल्ल अशा मनोकायिक अवस्थेत विहरणाऱ्या अवधूतांना पाहून विस्मयचकित झालेले यदुराजे अवधूतांच्या त्या उन्मनी, प्रसन्न अस्तित्वाचे रहस्य विचारतात, इथून प्रारंभ होतो दोघांच्या संवादाला. ‘जीवनामध्ये मी जे २४ गुरू केले त्यांच्याकडून हस्तगत केलेल्या जीवनकलेमुळे मी असा निरंतर, निरामय आनंदी असतो,’ असा उलगडा अवधूत संवादाच्या अगदी प्रथम चरणातच यदुराजांना करतात. यदुराजांच्या चेहऱ्यावर उमटलेले प्रश्नार्थक भाव हेरून आपले गुरूत्व प्रदान केलेल्या २४ विभूतींचा तपशीलही अवधूत पुरवितात. एक-दोन नव्हे, तर तब्बल २४ गुरू यांना कसे भेटले असावेत, ही यदुराजांच्या मनातील जिज्ञासा ‘अवधूत, जो जो जयाचा घेतला गुण। तो तो म्यां गुरू  केला जाण। गुरुसी आलें अपारपण। जग संपूर्ण गुरू दिसे’ अशा शब्दांत शमवितात. अभ्यासार्थी शिष्याची प्रामाणिक भूमिका धारण करून निखळ शिष्यत्व अंत:करणात स्थिर केले तर गुरूत्वाची प्रचीती भवतालात सर्वत्र अनुभवता येते, हा अवधूतांच्या त्या अ-लौकिक कथनाचा गाभा. गुरूत्वाच्या जोडीनेच शिष्यत्वाची कसोटीच जणू अवधूत यानिमित्ताने सिद्ध करतात. आपल्याला मुदलात शिकण्याची तीव्र, दुर्दम्य इच्छा आहे का, हा प्रश्न ठरतो यासंदर्भात कळीचा. किंबहुना, हेच प्रथम प्रत्येकाने निर्ममपणे तपासून बघावे, हे आहे अवधूतांचे कळीचे आवाहन. शिष्यत्व आपल्या ठायी पुरेपूर बिंबलेले असेल तर अनुकरणीय अशा घटना-प्रसंगांद्वारेच केवळ नव्हे, तर अननुकरणीय अशा बाबींच्या माध्यमातूनही आपण सतत शिकत राहतो, शिकू शकतो, हे बिंबवायचे आहे अवधूतांना इथे. ‘ज्याचा गुण घेतला। तो सहजें गुरुत्वा आला। ज्याचा गुण त्यागरूपें घेतला। तोही गुरू  झाला अहितत्यागें’ हे अवधूतांचे उद्गार म्हणजे आत्मनिर्भर, स्वयंपूर्ण शिक्षणपद्धतीचा चिरंतन गुरुमंत्रच जणू. विवेकरूपी अंजन डोळ्यांना लेववून शिष्यत्वाची भूमिका अंत:करणात स्थिर केली की दृश्य जगात सर्वत्र गुरूत्वाची प्रचीती येत राहते, हे सूक्ष्मतम सूत्र- ‘एवं त्यागात्याग समतुकें। दोहींसी गुरुत्व आलें निकें। राया तूं पाहें पां विवेकें। जगचि असकें गुरू  दिसे’ अशा अंतर्मुख होण्यास भाग पाडणाऱ्या शब्दांत यदुराजाच्या निमित्ताने अवधूत आपल्यापुढे मांडतात. ज्ञानाचे लोकशाहीकरण झालेल्या आजच्या शिक्षण-व्यवहारात सर्वत्र घाऊक वानवा कशाची असेल, तर ती निर्मळ, प्रामाणिक शिष्य-भूमिकेचीच!

– अभय टिळक agtilak@gmail.com