News Flash

स्थूल—सूक्ष्म

ताटी उघडा’ म्हणून मुक्ताईंनी धरलेला हट्ट आणि ज्ञानदेवांचे हे कथन यांतील जैविक नाते इथे पूर्णपणे उलगडते.

अपरंपार तिरस्कार, अपमान, निंदा यांचीच भिक्षा झोळीमध्ये पडत राहूनही ज्ञानदेवादी भावंडांच्या मनात तत्कालीन लोकमानसाबद्दल राग अथवा प्रतिशोधाची भावना कशी उमटली नसावी याचा विस्मय वाटल्याखेरीज राहत नाही. ‘आह्मां गांजी जन। तरि कां मेला नारायण’ इतपत उद्वेगाचे उद्गार मुखामधून उमटावेत अशी गांजणूक समाजाकडून होऊनही त्याच समाजाच्या हितासाठी, ‘तुका ह्मणे वरावरी। जातों तरी सांगत’ अशा पोटतिडिकेने बोधाचा दिवटा पाजळत तुकोबा समाजपुरुषाला शिकवत कसे राहिले असतील, हा विचार काही केल्या पाठ सोडत नाही. या प्रश्नाचे संभाव्य उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणारे दोन लोकोत्तर पुरुष म्हणजे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि आचार्य विनोबा भावे. कौतुकाने गळ्यात हार घालणारा आपला चाहता म्हणजे विश्वरूपाने प्रगटलेल्या परतत्त्वाचे सौम्य, प्रेमळ रूप होय; तर त्वेषाने शाब्दिक अथवा शारीरिक प्रहार करणारा आपला विरोधक हे त्याच परतत्त्वाचे रौद्र, उग्र स्वरूप होय, ही धारणा मनामध्ये स्थिर राखण्याचा उपदेश न्यायमूर्ती रानडे त्यांच्या भागवत धर्मपर एका व्याख्यानामध्ये श्रोत्यांना करतात. तर परतत्त्वाच्या ‘सौम्य’ आणि ‘उग्र’ अशा दोन रूपांना विनोबाजी अनुक्रमे ‘स्थूल’ आणि ‘सूक्ष्म’ अशी दोन नावे योजतात. षडैश्वर्यसंपन्न राम आणि कृष्ण ही परतत्त्वाची स्थूल रूपे आपल्या परिचयाची आणि म्हणूनच आपल्याला प्रियही असतात. परंतु विरोधीभक्तीचा आश्रय करणारे अनुक्रमे रावण आणि कंस हीदेखील त्याच परतत्त्वाची रूपे होत, हे सूक्ष्म भान आपल्यापाशी नसते, असे विनोबांचे यासंदर्भातील विश्लेषण. परतत्त्वाच्या स्थूल आणि सूक्ष्म अशा दोन्ही रूपांची ओळख पटावी यासाठी अंतर्मुख होऊन प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते, यावर विनोबाजी म्हणूनच जोर देतात. न्यायमूर्ती रानडे काय किंवा विनोबाजी काय, हे दोघेही ज्या जीवनदृष्टीकडे निर्देश करत आहेत ती निखळ भागवत धर्मसिंचित जीवनदृष्टी होय. ज्ञानेश्वरीच्या १२व्या अध्यायातील दोन ओव्या या वास्तवाची साक्ष पुरेपूर पुरवितात. संत आणि समाज यांचे एकमेकांशी असलेले नाते ‘तरी सिंधूचेनि माजें। जळचरां भय नुपजे। आणि जळचरीं नुबगिजे। समुद्रु जैसा’ अशा नितांत आशयसंपन्न शब्दांत ज्ञानदेव विशद करतात. ऐन भरतीचा समुद्र कितीही खवळला तरी त्याच्या पोटात राहणाऱ्या जलचरांना त्या उधाणाची भीती वाटत नसते. तसेच आपल्या पोटात वास करणाऱ्या जलचरांच्या दंगामस्तीचा कितीही उपसर्ग पोहोचवला तरी समुद्र ती दांडगाई पोटात घालत राहतो, हा तर आपल्या परिचयाचा निसर्गव्यवहार होय. समुद्राइतकाच उदंड वाव पोटी वागविणारे लोकशिक्षक संत आणि वरकड समाज यांचे परस्परांशी असणारे नातेही नेमके असेच असते, हे मग ज्ञानदेव ‘तेविं उन्मत्तें जगें। जयासि खंती न लगे। आणि जयाचेनि आंगें। न शिणे लोकु’ अशा विलक्षण अर्थगर्भ पद्धतीने विवरून सांगतात. आपल्याशी बेगुमानपणे व्यवहार करणारा समाज म्हणजे परतत्त्वाचे उग्र-तामस रूपच होय, ही अनुभूती जागृत असणारा लोकशिक्षक जगाच्या उन्मत्त वर्तनाची खंत बाळगत नसतो. एवढेच केवळ नव्हे, तर जगाला शीण होईल अशी आपली जीवनरहाटी असणार नाही याबाबतही तो दक्ष असतो, हे ज्ञानदेव अधोरेखित करतात. ‘ताटी उघडा’ म्हणून मुक्ताईंनी धरलेला हट्ट आणि ज्ञानदेवांचे हे कथन यांतील जैविक नाते इथे पूर्णपणे उलगडते.

– अभय टिळक agtilak@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2021 4:08 am

Web Title: loksatta advayabodh article macro micro zws 70
Next Stories
1 वाव
2 मेघवृष्टी
3 हा तों नव्हे कांहीं निराशेचा ठाव…
Just Now!
X