अभय टिळक

loksatta kutuhal features of self aware artificial intelligence
कुतूहल : स्वजाणीव- तंत्रज्ञानाची वैशिष्टये..
peter higgs
अन्वयार्थ: ‘देव कणा’मागचा द्रष्टा!
upsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : सामान्य विज्ञान
27 March Daily Mesh To Meen Rashi Bhavishya
२७ मार्च पंचांग, राशी भविष्य: कुणाच्या नशिबी नात्यांचं प्रेम, सुख व गोडवा तर कुणाची वाढेल डोकेदुखी, आज काय होणार?

‘शांभवाद्वय’ या  संज्ञा-संकल्पनेच्या उत्पत्तीसंदर्भात ‘ज्ञानेश्वरी’च्या उपसंहारात ज्ञानदेवांनी मांडलेले कथन अनोखे आहे. क्षीरसिंधुच्या परिसरात पार्वतीच्या कानात भगवान शंकरांनी जे तत्त्वदर्शन प्रगट केले, तेच हे ‘शांभवाद्वय’! शंभुशंकराने ते शब्दरूपाने व्यक्त केले, त्याची उत्पत्ती झाली म्हणून ‘शांभव’ व त्या तत्त्वदर्शनप्रवाहाचे नाव ‘अद्वय’ म्हणून ‘शांभवाद्वय’ अशी उपपत्ती ‘ज्ञानेश्वरी’च्या १८व्या अध्यायाअखेर ज्ञानदेव स्पष्ट करतात. शक्तीच्या कानांत कथन केलेले ते अद्वयदर्शन योगीन्द्र मच्छिद्रांनी प्रथम ग्रहण केले. त्याचा बोध पुढे त्यांनी केला गोरक्षनाथांना. त्यांच्याकडून तो हस्तांतरित झाला गहिनीनाथांकडे. आपले सत्शिष्य निवृत्तिनाथांना तो ठेवा प्रदान केला गहिनीनाथांनी. भगवान शंकरांपासून चालत आलेले ते बोधरूपी संचित सद्गुरू निवृत्तिनाथांकडून मला प्राप्त झाले असे ज्ञानदेव विदित करतात. माझ्यापर्यंत आलेले हे बोधसंचितच गीताटीकेच्या रूपाने मी सिद्ध केले आहे असे ज्ञानदेव सांगतात. शक्तिमय शिव हे शांभवाद्वयाचे उद्गाते आदितत्त्व विलक्षण आहे. शिवासह अनादि काळापासून अभिन्नपणे नांदणारे ‘शक्ती’ हे तत्त्व पाच मुख्य आयामांनी युक्त आहे. चित्, आनंद, इच्छा, ज्ञान आणि क्रिया ही ती पाच परिमाणे. या पाचांतील चित् आणि आनंद हे आयाम वस्तुत: शक्तिविशेषांपेक्षाही शिवाचे स्वभाववाचक ठरतात. विश्वरूपाने नटलेले शिव हे तत्त्व स्वरूपत:, स्वभावत:च चिन्मय, आनंदस्वरूप होय. ज्ञान, इच्छा व क्रिया या तीन शक्तिविशेषांनी समृद्ध असल्यामुळेच विश्वात्मक रूप धारण करून विश्वरूपाने विलसत राहणे त्या परमशिवाला शक्य बनते, असे शांभवाद्वयाचे प्रतिपादन. शिव- शक्ती या युगुलाच्या नात्याचे विलक्षण काव्यमय विवेचन ज्ञानदेवांनी विलक्षण रसमय शैलीत मांडले आहे ते अनुभवामृतामध्ये. शिवामुळेच शक्तीला आणि शक्तीमुळेच शिवाला अर्थवत्ता व अस्तित्व कसे प्राप्त झाले आहे ते ज्ञानदेव ‘जेणे देवे संपूर्ण देवी। जियेवीण काहीं ना तो गोसावी’ अशा प्रत्ययकारी शब्दांत विदित करतात. शक्तीचे अविरत साहचर्य लाभल्यामुळेच विश्वात्मक बनण्यासाठी अन्य कशाचीही मदत घेण्याची आवश्यकताच शिवाला भासत नाही. विश्वोत्तीर्ण व विश्वात्मक या उभय रूपांमध्ये स्वत:च्या इच्छेप्रमाणे रूपांतरित अथवा अवस्थांतरित होत राहण्याची जी स्वायत्तता शिवाला लाभते ती या शक्तीमुळेच. यालाच शांभवाद्वयाने नाव दिले आहे ‘विमर्श’! परमशिव विमर्शयुक्त आहे तो या अर्थाने. विभोत्तीर्ण अवस्थेत स्पंदरूपाने विराजमान असताना विश्वात्मक बनण्याची आणि विश्वात्मक रूपाने विलसत असताना विश्वोत्तीर्ण अवस्थेप्रत पुनश्च जाण्याची इच्छा परमशिवाच्या ठायी बीजरूपाने विद्यमान असते. ऊर्मी येईल तेव्हा विश्वोत्तीर्ण वा विश्वात्मक असे कोणतेही रूप परमशिव धारण करतो विमर्शाच्या बळावर. बीजामधून वृक्ष बहरणे म्हणजे विश्वोत्तीर्ण अवस्थेतून प्रसरण पावत शिवाने विश्वात्मक बनणे. याच न्यायाने दृश्य जगाचा जन्म होतो, हे शांभवाद्वयाच्या सारबोधाचे आगळेपण. म्हणून ज्ञानदेवांच्या लेखी दृश्य जगत हा ‘अध्यास’ नसून ‘विलास’ आहे. एका वस्तूवर जेव्हा दुसरे एखादे काहीतरी वरून ठेवले जाते, आरोपित केले जाते त्याला ‘अध्यास’ वा ‘अध्यस्त’ असे म्हणतात. शांभवाद्वयाच्या बोधानुसार, परमशिवावर दृश्य जगाचे झाकण घातलेले नाही वा आरोपणही केलेले नाही. विश्वोत्तीर्ण अवस्थेतून विश्वात्मक रूपाचे उन्मीलन होते. म्हणूनच ज्ञानदेवांच्या दृष्टीने दृश्य जगत म्हणजे ‘विवर्त’ नसून ‘विमर्श’ होय!

agtilak@gmail.com