– अभय टिळक

भक्तराज पुंडलिकरायांच्या मातृपितृसेवेला भुलून भीमेच्या काठावर पंढरीक्षेत्रामध्ये २८ युगे विटेवर तिष्ठत उभ्या ठाकलेल्या पांडुरंगाचे महिमान गाणारा तुकोबांचा एक विलक्षण गोड अभंग आहे.  अद्वयदर्शनाचे सारे गाभावैशिष्टय़ तुकोबांनी अभंगाच्या पहिल्याच चरणाच्या अर्ध्याशांमध्येच स्पष्ट केले आहे. विटेवर साकारलेल्या सावळ्या रूपातील परतत्त्वाचे रूपवर्णन तुकोबा, ‘गुणा आला विटेवरी। पीतांबरधारी सुंदर जो,’ अशा शब्दांत करतात. यांतील ‘गुणा’ हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे. शब्दकोशात डोकावले तर, ‘गुणून आलेले फळ’, ‘गुणाकार’, ‘पट’, ‘प्रमाण’ अशा ‘गुण’ शब्दाच्या अनेक अर्थच्छटा आपल्याला सापडतात. ज्या एकाच तत्त्वाचा गुणाकार होऊन हे जग साकारलेले आहे तेच आदितत्त्व पीतांबर धारण करून मनोहर रूपात विटेवर विराजमान आहे, हे तुकोबांचे इथे सांगणे. ही प्रक्रिया अद्वयदर्शनाला अभिप्रेत असणारी अशीच. शक्तीयुक्त शिव हे जगाचे आदिकारण होय, हा अद्वयदर्शनाचा मूलभूत सिद्धान्त. पतिपत्नीच्या नात्याने अनादी काळापासून एकत्रच नांदणाऱ्या शिव आणि शक्ती या युगुलाच्या एकत्र येण्यातून ‘जग’ नावाचे बाळ प्रसवले ही अद्वयदर्शनाची जगनिर्मितीबाबतची भूमिका. शक्ती ही तर शिवाची अर्धागिनी. अविभक्तपणे त्याच्याशी एकरूप झालेली. अर्धनारीनटेश्वराचे दर्शन सूचन घडवते त्याच सामरस्याचे. ऊर्जेची स्थितिज व गतिज अशी दोन रूपे असतात तसेच हे नाते. धरणाच्या जलाशयातील पाणी ही स्थितिज ऊर्जा. तीच गतिमान बनून जनित्रांवर कोसळली की तिच्या त्या गतिज रूपाद्वारे निर्मिती होते विजेची. जगरूपाने प्रगटण्याची ऊर्मी स्थितिज शिवाला झाली की तो गतिज बनतो. निर्मिती वा सृजन ही क्षमता निखळ स्त्रीतत्त्वाचीच. त्यामुळे, स्थितिज शिव गतिज बनून त्याचे शक्तिरूप विश्वदर्शनाद्वारे प्रकाशते. तत्त्व एकच मात्र त्याची अभिव्यक्ती बहुगुणी, बहुरूपी. विश्वोत्तीर्ण शिवाचे हे विश्वात्मक शक्तिरूप विलसन. इथे कोणी कोणाला झाकण्याचा प्रश्नच नाही. विटेवरचा श्रीविठ्ठल, तुकोबांच्या बोधानुसार, याच वास्तवाचे सूचन घडवतो. विठ्ठलाच्या समचरणांशी चित्त एकदा का जडले की त्याच्या रूपरहस्याची सावली मनबुद्धीवर पडते. तसे झाले की, त्याच अभंगात पुढे तुकोबा म्हणतात त्याप्रमाणे, ‘निवारोनि जाय माया । ऐसी छाया जयासी,’ अशी अवस्था होते. दृश्यजगत म्हणजे शिवाच्या शक्तिअंगाचा गुणाकार, हे सारतत्त्व आकळले तर जग आणि जगण्याकडे बघण्याची आपली दृष्टी बदलावी, हे ओघानेच येते. ही अद्वैतदर्शनापेक्षा निराळी प्रक्रिया. अद्वयदर्शनानुसार भौतिक-लौकिक जग म्हणजे शिवमय शक्तीचे विलसन. शक्तीने शिवाला झाकलेले नाही. जग म्हणजे शिवाचेच प्रसरण. विश्वदर्शन हेच शिवदर्शन. शिव आणि शक्ती या दोन तत्त्वांचे नाते ब्रह्म- माया या तत्त्वांच्या नात्यापेक्षा गुणात्मकरीत्या वेगळे आहे. विश्वाचे आदिकारण एकचएक तत्त्व आहे, हा सिद्धान्त अद्वैत आणि अद्वय या दोन्ही दर्शनांमध्ये समानच आहे. अद्वैतदर्शनात बह्म आहे तर अद्वयात आहे शक्तिमान शिव. मायेने निर्माण केलेल्या जगाचे पांघरूण दूर सारल्याविना ब्रह्माची प्राप्ती होत नाही. म्हणून अद्वैतात वजाबाकीला पर्याय नाही. तसा प्रकार अद्वयात नाही.‘म्हणोनि जग परौतें । सारू नि पाहिजे मातें । तैसा नव्हे उखितें । आघवें मीचि,’ असे ज्ञानेश्वरीच्या १४ व्या अध्यायात कृष्णमुखातून ज्ञानदेव वदवितात त्याचे रहस्य हेच.  अद्वयात आहे गुणाकार. वजाबाकी नव्हे.

agtilak@gmail.com