व्यापकत्व हा गुण आकाश व सागर या दोहोंमध्ये समान वसतो. ही दोन्ही अस्तित्वे खऱ्या अर्थाने अथांगच. समाजमनावर सात्त्विकतेचे, ऋजुतेचे संस्कार घडविण्यासाठी उक्ती-कृतीने अहोरात्र झटणाऱ्या विवेकी लोकमनस्कांच्या ठायी याच दोन गुणांची निकड असते, कारण समाजमन सहजी ऐकत नसते. त्यातल्या त्यातही पुन्हा अनिष्ट रूढी आणि चालीरीती तर कमालीच्या चिवट. त्यांचे निराकरण हे तर सर्वात जटिल. समाजपुरुष तर प्रसंगी असा विक्षिप्तासारखा वागतो की, त्याचे भलेबुरे समजावून सांगण्यासाठी सक्रिय बनलेल्या लोकशिक्षकांची टवाळी होते. लोकापवाद, निंदा, अपमान यांचे लेणे धारण करावे लागणे, हे तर मग ओघानेच येते. १९व्या शतकात पहाटलेल्या प्रबोधन पर्वातील पहिल्या-दुसऱ्या  पिढय़ांतील समाज- सुधारकांचे जीवनाख्यान या वास्तवाची साक्ष देते. महात्मा जोतीराव फुले यांच्यापासून ते न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्यापर्यंत कोणा म्हणजे कोणालाही ते दिव्य चुकले नाही. महात्मा फुले, ‘लोकहितवादी’ गोपाळ हरि देशमुख, न्या.रानडे, विठ्ठल रामजी शिंदे ही सुधारकांची मांदियाळी भागवत धर्माच्या मूल्यसंस्कारांनी सिंचित बनलेली. समाजानेच केलेली हेटाळणी, छळ, टीका समाजाच्या हितसंवर्धनासाठी त्यांनी शांतपणे सहन केली. त्यांच्या ठायीचा असा अभंग धीर आणि सोशीकपणा हे त्या संस्कारांचेच कवडसे. अशा पुरुषोत्तमांना ज्ञानदेव उपमा देतात सागराची. ‘घेउनि जळाचे लोट । आलियां नदीनदांचे संघाट । करीं वाड पोट । समुद्र जेविं’ अशी अन्वर्थक शब्दकळा योजलेली आहे ज्ञानदेवांनी त्यासाठी. विशेषकरून पावसाळ्यामध्ये दुथडी भरून वाहणाऱ्या नदी, नाले, ओढे, वहाळ  शुद्धाशुद्ध अशा सगळ्या प्रकारचे पाणी घेऊन समुद्राला मिळत राहतात. आभाळातून बरसणारे पाणी जरी निर्मळ असले तरी जमिनीवरून वाहणारे त्याच पाण्याचे लोट वाटेतील राडारोडा, कचरा वाहून आणत अखेर समुद्राशी एकरूप होतात. तो सगळा प्रपात बऱ्यावाईटाची फिकीर न करता समुद्र पोटामध्ये रिचवून घेतो. समाजशिक्षकाची वृत्ती नेमकी त्या सागरासारखीच असते अथवा असावी, हे ज्ञानदेवांना सुचवायचे आहे. लोकांच्या भल्याबुऱ्या, मंगल-अमंगल, सात्त्विक-तामसी अशा यच्चयावत वृत्तिप्रवृत्तींनी रंगलेले वागणे सागरासारखेच सर्वोदार बनून लोकशिक्षक पोटामध्ये घालत असतो. भागवत धर्माला अभिप्रेत अशा समाजमनस्क संतांचे वर्णन तुकोबा ‘वाव तरी उदंडच पोटीं । धीर सिंधु ऐसे जगजेठी’ अशा अनुपम शब्दकळेद्वारे करतात. ‘जेठी’ म्हणजे पहिलवान. लोकशिक्षणाचे व्रत अंगीकारलेल्या विभूती सर्व विश्वात बळजोर गणल्या जातात कारण, त्यांचा धीर सागरासारखाच अथांग असतो, ही पहिली बाब सांगतात तुकोबा. आपण करत असलेल्या प्रयत्नांना समाजाकडून अपेक्षित असा प्रतिसाद लाभला नाही तर निराश होऊन घरी बसण्याइतका त्यांचा नेट लेचापेचा नसतो. त्याचवेळी, समाजाने त्यांच्याशी चालविलेले कशाही प्रकारचे वर्तन पोटात घालण्याइतका समुद्रासारखाच अथांग वाव त्यांच्या पोटी असतो, हे तुकोबांचे या संदर्भातील दुसरे सांगणे. परंतु, एवढय़ानेही भागत नाही. समाजाच्या अनुचित वर्तनाचे रिचवलेले कडवट घोट उद्वेगपूर्ण अशा कटू शब्दांच्या रूपाने मुखातून उमटूही द्यावयाचे नाहीत, या त्या पुढील परीक्षेलाही लोकशिक्षकाला उतरावे लागते. ‘मधुरा वाणी ओटीं । तुका म्हणे वाव पोटीं’ हीच ती सर्वोच्च कसोटी!

– अभय टिळक agtilak@gmail.com