अभय टिळक

‘वासुदेव’ ही काय संस्था आहे..? असा प्रश्न विचारला तर आजच्या शहरी शाळकरी मुलांच्या चेहऱ्यावर एक भले मोठे प्रश्नचिन्ह उमटावे. अगदी साहजिकच आहे ते. मोरपिसांची वरच्या टोकाला निमुळती होत जाणारी मुगुटाच्या आकाराची गोल टोपी, अंगामध्ये चांगला घोळदार अंगरखा, मुद्रेवर अष्टगंधाने रेखलेल्या नाममुद्रा, गळ्यामध्ये माळ, मानेवरून दोन्ही खांद्यांवर सोडलेला शेला, कंबरेला वेढलेले उपरणे, काचा मारून कसलेले धोतर, पायात चाळ, ओठांवर टेकलेली बासरी एका हातात, तर दुसऱ्या हातात झांजा वा चिपळ्या आणि मुखामध्ये नामाचा घोष.. असा परिवेश धारण केलेला वासुदेव हा आमच्या लोकसंस्कृतीचा एके काळचा बहुमोल ठेवाच जणू. लोकसंस्कृतीचा हा उपासक आपल्या सबोध-अबोध मनातून आता केव्हाच अंतर्धान पावलेला आहे. सडासंमार्जन केलेल्या, छान सारवलेल्या अंगणात आपली पावले उमटवत जनरूपाने नटलेल्या जनार्दनाचे स्मरण उभ्या समाजमनाला नामचिंतनाच्या माध्यमातून रोज पहाटे करून देणारा ‘वासुदेव’ म्हणजे साधीसुधी लोकसंस्था नव्हे. ‘दान पावलं’ म्हणून तोंडभर आशीर्वाद देणारा ‘वासुदेव’ नेमके कशाचे दान मागतो आहे, याची निर्मळ जाणीव तुकोबांचे धाकटे बंधू कान्होबाराय त्यांच्या वासुदेव या नावाच्याच रूपकात्मक एका अभंगात- ‘‘विनवितों सकळां जनां। कर जोडोनि थोरां लाहनां। दान इतुलें द्या मज दीना। ह्मणे तुकयाबंधु राम ह्मणा गा।’’ इतक्या नितळ शब्दकळेद्वारे समाजपुरुषाला करून देतात. लहानथोरांच्या जिभेवर नामाचा संस्कार झाला की ‘वासुदेवा’ला त्याचे दान पावले, असा कान्होबांचा हा सांगावा. इथे, नामचिंतन हेदेखील शरीराच्या पातळीवर सवयीने घडणारे निव्वळ एक कर्मकांडच ठरावे, हे अपेक्षित ना ‘वासुदेवा’ला, ना संतांना. प्रतिक्षणी नूतन भासणारे, अनंत नामरूपांनी सजलेले दृश्य जग म्हणजे जगदीश्वराचेच प्रगटन होय, या जाणिवेचा उदय प्रत्येक जीवमात्रामध्ये घडून येण्याचे माध्यम म्हणजे नामस्मरण ही जाणीव जागृत करण्यासाठी ‘वासुदेव’ हे तत्त्व गतिमान राहते, हा संदेश भागवतधर्मी संतांनी ‘वासुदेव’नामक लोकसंस्थेच्या माध्यमातून प्रवाही राखला. झोपलेल्या जगाला जागे करण्यासाठी भल्या पहाटे नामाचा गजर घुमवत ‘वासुदेव’ नित्याने दारोदारी येतो या लौकिक व्यवहारामध्ये अनुस्यूत असणारे पारलौकिक सूचन कोणते असेल तर ते हेच. ‘‘आतां ऐसेंची अवघे जन। येते जातें तयापासून। जगीं जग झालें जनार्दन।’’ ही वस्तुस्थिती मनामनांवर बिंबवत, जग आणि जगदीश्वर यांच्या अभेदाचे सजग भान प्रत्येक जीवमात्राच्या ठायी अखंड नांदावे यासाठीच ‘वासुदेवा’ची भ्रमंती चालू असते, हे ज्ञानदेवांचे कथन या संदर्भात कळीचे शाबीत होते. प्रत्येक वस्तुमात्रामध्ये जनार्दनच व्यापून उरलेला असेल तर मग तो दिसत का नाही, असा प्रश्न पैठणनिवासी नाथांना त्या काळी एखाद्या महाभागाने विचारला असावा. त्याला नाथांनी दिलेले उत्तरही तितकेच मार्मिक होय. साखर दिसते मात्र तिची गोडी दिसत नाही म्हणून ती साखरेपेक्षा वेगळी मानावी काय, असा प्रतिप्रश्न करत- ‘‘तैंसा जनीं आहे जनार्दन। तयातें पहावया सांडीं अभिमान।’’ असा रोकडा उतारा नाथ त्या संदर्भात सुचवितात. आपण कोणी तरी ‘स्पेशल’ आहोत ही जाणीव विरून जाणे हीच जागृतीची खूण होय, हे मर्म ज्ञानदेव- ‘‘उदो प्रगटला बिंबले भान’’ अशा शब्दांत त्यांच्या एका ‘वासुदेव’पर अभंगाद्वारे उलगडून स्पष्ट करतात ते काय उगीच!

agtilak@gmail.com