अभय टिळक

जनाबाई हे खरोखरच असाधारण व्यक्तिमत्व. अद्वयाच्या गंधाने उभे जीवन परिमळून गेलेल्या विभूतींच्या मालिकेत अग्रस्थानी शोभतात माऊली जनाबाई. भक्तीत आत्मविलोपन किती पराकोटीचे असू शकते याचे मूर्तिमंत दर्शन म्हणजे त्यांचे जीवनचरित्र. वयाच्या हिशेबाने नामदेवांपेक्षा त्या वडील. त्यांच्या कुटुंबाशी पूर्णपणे एकरूप झालेल्या. ‘नामयाची जनी’ ही आत्मखुण गौरवाने मिरवणाऱ्या जनाबाई म्हणजे नामदेवांच्या कुटुंबातील १५ व्या सदस्य. परभणी जिल्ह्य़ातील गंगाखेड येथील दमा आणि करूंड या दाम्पत्याने त्यांची मुलगी नामदेवरायांच्या तीर्थरूपांच्या हाती सोपविली आणि  या परिवारात जनाबाईंचा प्रवेश झाला. हे संपूर्ण कुटुंबच नामप्रेमी असल्याने नामसंकीर्तनाचा ध्यास जनाबाईंना लागावा, हे स्वाभाविकच. ‘चौयुगांचा भक्त नामा उभा कीर्तनी। पाठीमागे डोळे झाकुनी उभी ते जनी’ या शब्दांत कीर्तनानंदाची चाखत असलेली अवीट गोडी जनाबाई वर्णन करतात. कीर्तनात देहभान हरपणाऱ्या जनाबाईंना देहभावावर असताना प्रत्येक बाबीत परतत्त्वाच्या अस्तित्वाची अनुभूती यावी, हे त्यांची साधना चरमसीमेला भिडल्याचे रोकडे प्रमाणच. मोजकीच असलेली जनाबाईंची अभंगकळा त्यांच्या जगण्याची ही अनोखी रीत शब्दांतून प्रगट करते. विठ्ठलाचे आणि जनाईंचे नाते बिंब-प्रतिबिंबासारखेच. याच न्यायाने जनाबाईंचे अवघे जगणे अंतर्बाह्य विठ्ठलनिर्भर बनल्याचे देखणे दर्शन त्यांच्या आत्मकथनपर अभंगांतून घडते. त्यांच्या कथनानुसार, घरादारातील केर लोटून एके ठिकाणी गोळा करावा त्यांनी आणि एकत्र केलेला केर टोपल्यात भरून बाहेर टाकावा विठ्ठलाने. पंधरा माणसांचे कुटुंब असणाऱ्या नामदेवरायांच्या घरात कामे काय कमी असणार? कामाच्या रगाडय़ात पार बुडून गेलेल्या जनाबाईंना डोईवरून न्हायलादेखील खूप दिवस फुरसत झाली नाही. केसांच्या पार जटा होण्याची वेळ आली. अखेर एके दिवशी स्वत: देवानेच फणी घेऊन जनाबाईंचे केस मोकळे केले. सचैल नहाणे झाल्यावर जनाबाईंच्याच साक्षीप्रमाणे, ‘आपुल्या हातें वेणी घाली। जनी म्हणे माय झाली’ असे देवाशी त्यांचे आतडय़ाचे नाते. भाबडय़ा भक्तीचे विभ्रम म्हणून जनाबाईंच्या या भावोत्कटतेची बोळवणही करतील कोणी. परंतु इथे एक गोष्ट आपल्या ध्यानात येते का? जाणिवेच्या प्रत्येक क्षणी आपला सारा व्यवहार चैतन्यवस्तूशी चालू आहे, या जनाबाईंच्या विशुद्ध अनुभूतीचे हे कवडसे होत. ही निखळ अद्वयाची दृष्टी. आणखी एका अभंगात जनाबाई याचा नि:संदिग्ध उच्चार करतात. या जगात एकल असे शिवतत्त्वच नानाविध रूपे घेऊन नांदते आहे, या ज्ञानदेवकथित शांभवाद्वयाच्या गाभ्याचा जनाबाई ‘देव देते देव घेते। देवासवें व्यवहारिते’ अशा अनुभवसिद्ध शब्दांत उच्चार करतात. ‘डोळां बैसलें बैसलें। रूप राहोनि संचलें’ ही तुकोबांची अवस्था, तर ‘देव येथें देव तेथें। देवाविणें नाहीं रितें’ ही जनाबाईंची प्रचीती. जगाकडे बघण्याची दृष्टी एकदा बदलली, की लोकव्यवहारातील आपल्या सहभागाचा पोतही बदलतो. जगातील अन्यांचा व्यवहार त्यांच्या त्यांच्या धारणांनुसार चालू असतो. तो तसाच चालणार. पण अद्वयाची नजर लाभलेल्या जनाबाईंसारख्या विभूतींना मात्र आपला व्यवहार नानाविध रंगरूपांनी नटलेल्या परतत्त्वाशीच सतत घडत असतो ही जाणीव अहोरात्र व्यापून असते. ‘जनीं म्हणे विठाबाई। भरूनि उरलें अंतरबाहीं’ ही भूमिका अंत:करणात अचल राहणे हाच साक्षात्कार. परिणामी जीवनाचा कस उंचावतो, व्यवहार शुद्ध बनतो. जगण्याची ही रीत जितकी अनोखी, तितकीचअनुभवायलाही दुष्कर!

agtilak@gmail.com