अभय टिळक

भागवतधर्मी संतमंडळात दोन विभूतींचा उल्लेख ‘काका’ अशा सन्मानदर्शक आदरार्थी बहुवचनाने केला जातो. तेरढोकीचे रहिवासी आणि परमार्थाच्या प्रांतात भाजलेले परिपक्व मडके कोणते आणि कच्चे कोणते याची परीक्षा करण्यासाठी संतमंडळाने ज्यांना आवर्जून पाचारण केले त्यातले गोरोबा हे एक. संतमंडळामध्ये गोरोबा हे वयाने सर्वात ज्येष्ठ. तर,  ज्ञानदेवांपेक्षा दोन वर्षांनी लहान सोपानदेवांनाही ‘सोपानकाका’ असे संबोधले जाते. सोपानदेवांना ‘काका’ असे संबोधण्याशी, बहुधा, संबंध असावा अथवा दिसतो तो, ‘बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ’ अशा, ज्ञानदेवांच्या समाधीप्रसंगी मुखातून उमटलेल्या नामदेवरायांच्या शोकविव्हल उद्गाराचा. ज्ञानदेवांच्या ठायी मातृत्व आणि  पितृत्व यांचा समसमा संयोग असल्याची संतमंडळाची धारणा नामदेवरायांच्या या शब्दकळेमध्ये प्रतिबिंबित झालेली दिसते. ज्ञानदेवांच्या पाठोपाठ बरोबर एक महिन्याच्या अंतराने, म्हणजे, इ. स. १२९६ या वर्षांतील मार्गशीर्ष वद्य त्रयोदशीच्या दिवशी सोपानदेवही समाधिस्थ झाले. काकांची फार थोडी अभंगरचना उपलब्ध आहे. मुळातच सोपानदेवांनी मोजकी अभंगनिर्मिती केली की काळाच्या ओघात त्यांचे अभंग लुप्त झाले, याचा पत्ता लागत नाही. अल्पसंख्यच असली तरी सोपानकाकांची अभंगसंपदा कमालीची प्रगल्भ आणि अनुभूतीपूर्ण आहे. ‘ज्ञानदेवी’ या ज्ञानदेवांच्या गीताटीकेप्रमाणेच सोपानदेवांनीही गीतेवर समश्लोकी रचना सिद्ध केली. ‘सोपानदेवी’ हे त्या लेखनाकृतीचे नाव. परतत्वाच्या क्षर आणि अक्षर या दोन अवस्थारूपांचे  सजग भान, हे सोपानदेवांच्या विभूतिमत्वाचे सारसर्वस्वच जणू. परमशिवाच्या अक्षर अशा विश्वात्मक रूपाचे झालेले दर्शन, ‘निर्गुणीं सगुण गुणांमाजी गुण । जन तूं संपूर्ण दिससीं आहृां ।।’ अशा प्रकारे सोपानदेव करतात. तर, त्याच परतत्वाचे क्षर असे सावयव रूप भिवरेकाठी विटेवर उभे ठाकलेले आहे, अशी साक्ष सोपानकाका, ‘तेंची रू प रू पस दाविसी प्रकाश । पंढरीनिवास होऊनी ठासी’ इतक्या नितळपणे नोंदवितात. परतत्वाच्या व्यक्ताव्यक्त रूपाचे अद्वयत्व मांडत असतानाच सोपानदेव शिव आणि पंढरीचा श्रीविठ्ठल यांचे ऐक्यही सूचित करतात. जगामध्ये भरून असलेले एकच एक तत्व त्याला पाहिजे तेव्हा, पाहिजे तिथे, पाहिजे त्या रूपात प्रगटते, हा शांभवाद्वयाचा गाभासिद्धान्त सोपानदेव ‘आपरूप हरी आपणचि देव । आपणचि भाव सर्व जाला’ इतक्या निखळपणे उलगडतात. विश्वरूपाने प्रगटलेला परमशिव सर्वत्र सर्वकाळ ठासून भरलेला असल्यामुळे या विश्वात विषम असे अणुमात्रही काही अस्तित्वातच नाही, ही आपली अनुभूती, ‘सर्वकाळ सम नाहीं तेथें विषम । आपणची राम सर्व ज्योती’अशा शब्दांत विदित करणाऱ्या सोपानदेवांचा सारा भर आहे तो चराचरात भरून राहिलेले समत्व अधोरेखित करण्यावर. त्रलोक्यातील समत्वाची रोकडी प्रचीती आल्यामुळे ज्याचा व्यवहारही समतापूर्ण बनलेला आहे त्यालाच ‘साधू’ म्हणावे, असे स्पष्टपणे सांगणारे नामदेवराय, ‘इहलोकीं तोचि सर्वाभूती सम । शरीराचा भ्रम नेणे कदा’ अशी  साधुत्वाची अंतर्खुणही उलगडून सांगतात. ‘योग्यांची माऊली’ असे यथार्थ बिरुद नामदेवराय ज्यांना बहाल करतात ते ज्ञानदेव ‘अर्जुना समत्व चित्ताचें। तेंचि सार जाण योगाचें’असे उद्गार भगवंताच्या मुखी घालत, चित्ताचे समत्व हेच योगाचे सार होय, अशी द्वाही फिरवतात यात मोलाचे सूचन दडलेले आहे. योगासने म्हणजे योग नव्हे !

agtilak@gmail.com