– अभय टिळक agtilak@gmail.com

‘शब्द’ ही मोठी अचाटच वस्तू. ज्ञानदेव तर, ‘‘बाप उपेगी वस्तु शब्दु’’ अशा गौरवपूर्ण आदरार्थी भाषेमध्ये शब्दाची थोरवी गातात. तुकोबांनी तर शब्दांना थेट देवत्वच बहाल केलेले दिसते. ‘‘तुका म्हणे पाहा। शब्द चि हा देव।’’ असे उद्गार ते काढतात ते काय उगीच! शब्दांची ताकद आहेच तशी उदंड आणि अफाट! शब्द जपून वापरावेत, असे आपण व्यवहारात सतत म्हणतो, त्याचेही कारण तेच. परंतु इथे एक मेख आहे. हिऱ्याची पारख जशी मुरलेल्या जव्हेऱ्यालाच होते, त्याच न्यायाने शब्दांचा मर्मज्ञ जाणकारच त्यांचे सामर्थ्य अचूक जोखू शकतो. दिसायला शब्द दिसतो मोटका; मात्र त्याच्या अर्थवत्तेची व्यापकता असीम असते. पृथ्वीवरून दिसणारे सूर्यबिंब ओंजळीत मावण्याइतपत आटोपशीर भासते; मात्र विश्वाचा कानाकोपरा सूर्य त्याच्या तेजाने उजळून टाकत असतो. ‘‘तैसें शब्दांचे व्यापकपण। देखिजे असाधारण।’’ अशा शब्दांत ज्ञानदेव अगदी हेच सूत्र सूचित करतात. कोशाच्या पानांमध्ये दडलेला शब्द व्यवहारात उतरतो तेव्हा तर त्याला अनंत परिमाणे लगडतात. शब्द एकच असला तरी संदर्भाने त्याची निराळीच अर्थच्छटा व्यक्त होते. ते संदर्भ असतात सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय, प्रसंगी जातीयही. इतकेच नव्हे, बदलत्या काळाबरोबर हे संदर्भही बदलत राहतात. विशेषत: पारंपरिक वा सांप्रदायिक संज्ञा-संकल्पनांबाबतीत आणखी एक दक्षता बाळगावी लागते. शब्दाला त्या त्या संप्रदायाचे, तत्त्वपरंपरेचे जे अर्थपदर लाभलेले असतात त्यांची नेमकी जाण नसेल तर दिशाभूल होते. ‘आभास’ हा शब्द आहे नेमका असाच. ‘भास’, ‘कल्पना’, ‘ग्रह’, ‘अंदाज’, ‘सादृश्य’ हे ‘आभास’ या शब्दाचे कोशात गवसणारे अर्थ शांभवाद्वयाच्या प्रांगणात अप्रस्तुत ठरतात. ‘आभास’ म्हणजे ‘प्रकाश’ अथवा ‘प्रकाशणे’ हा अर्थ शांभवाद्वयाला अभिप्रेत आहे. विश्वरूपाने प्रगटणारा परमशिव प्रकाश आणि विमर्श यांनी युक्त आहे. म्हणजेच, ते शिवतत्त्व स्वत: प्रकाशमय आहेच, परंतु दुसऱ्या पदार्थाना प्रकाशमय करण्याचे सामर्थ्यही त्याच्या ठायी आहे, हा अद्वयाचा सिद्धान्त. आपल्या नित्य अनुभवाला येणारे आणि शिवाइतकेच सत्य असणारे विश्व म्हणजे शिवाचाच प्रकाश होय, हा अद्वयबोधाचा सांगावा याच वास्तवाचे सूचन घडवितो. दिवा आणि त्याचा प्रकाश हे जसे अभिन्न होत, तसेच हे नाते. ‘‘समग्र दीप्ती घेतां। जेवि दीपूचि ये हाता।’’ हे ज्ञानदेवांचे ‘अमृतानुभवा’तील उद्गार तेच सूत्र प्रतिपादन करतात. हातात दिवा धारण केला की त्याचा प्रकाश आपोआपच गोळा होतो अथवा प्रकाशाद्वारे अनुभूती येत राहते ती दिव्याच्याच अस्तित्वाची. हेच तत्त्व ‘चांगदेवपासष्टी’मध्ये योगीराज चांगदेवांना- ‘‘प्रकटे तंव तंव न दिसे। लपे तंव तंव आभासे।’’ अशा शब्दांत ज्ञानदेव विशद करतात. स्वत:चे विश्वोत्तीर्ण रूप लपवून परमशिव विश्वरूपाने प्रकाशतो, हेच ज्ञानदेव सांगत आहेत. स्वत:चे विश्वोत्तीर्ण रूप जपत परमशिवच विश्वरूपाने प्रकाशमान बनतो किंवा विश्वाला प्रकाशमान बनवतो. जग व जगदीश्वर हे परस्परांपेक्षा निराळे आहेत, असे समजणे हीच मूलभूत गफलत. रस्त्यावर पडलेल्या दोरीच्या ठिकाणी संधिप्रकाशात सापाचा भास व्हावा तसे जगाचे आणि जगदीश्वराचे नाते नाही आणि नसते, हे प्रतिपादण्यात शांभवाद्वयाचे आगळेपण सामावलेले आहे. प्रतिक्षणी नित्यनूतन रूप धारण करणारे विश्व म्हणजे शिवाचाच आभास, हे कथन करणारी- ‘‘कैची येथें लोके। हा आभास अनित्य।’’ ही तुकोबांची अनुभवसिद्ध साक्ष म्हणजे याच तत्त्वाचा पुनरुच्चार!