अभय टिळक agtilak@gmail.com

‘ज्ञानोबा-तुकाराम’ या मध्यमपदलोपी समासातील मध्यदुवा म्हणजे नाथराय. अद्वयबोधाच्या तत्त्वदर्शनाचे ज्ञानदेवांपाशी उगम पावणारे सूत्र तुकोबांपर्यंत आणून भिडवण्यात नाथांचे योगदान भरीव दिसते. त्या दृष्टीने नाथराय आणि तुकोबाराय या दोन महापुरुषांमधील आंतरिक नात्याचे सूक्ष्मातिसूक्ष्म पदर-उपपदर संवेदनशीलतेने उलगडावयास हवेत. अद्वयबोधाने दृष्टी अलंकृत झालेले भागवत अनासक्तपणे लौकिक प्रपंचात किती व कसे रममाण होऊ  शकतात याचा वस्तुपाठ म्हणजे नाथराय आणि तुकोबाराय यांचे जीवन. पारमार्थिक उपासनेचे व्यक्तिगत अंग आणि त्याच साधनेचा सहजविस्तार असणारे सामाजिक परिमाण या दोहोंचा समन्वय प्रगट करणारा असाच या दोघांचा उभा जीवनव्यवहार. अद्वयदर्शनाचे अंतरंग नाथांनी हस्तगत केले ते ज्ञानदेवांकडून. इथेही पुन्हा एक गंमत आहेच. वेदांताची परिभाषा व दृष्टान्त ज्ञानदेव आणि नाथ उपयोजितात विपुल प्रमाणात. परंतु, दोघांची जीवनविषयक दृष्टी मात्र दर्शन घडवते अद्वयबोधाचे. पाणी आणि पाण्याची लाट यांच्या निसर्गसिद्ध एकत्वाचा उद्घोष करणारी रूपके मुबलक प्रमाणात योजलेली दिसतात उभयतांनी. ‘भक्त’ या अवस्थेच्या वर्णनासाठी ज्ञानदेवांनी आणि नाथांनी पाणी आणि पाण्याची लाट यांचेच उदाहरण पुढय़ात ठेवावे, हे या संदर्भात मननीय ठरते. पाण्यावरील तरंग कोणत्याही दिशेने पसरला तरी पाण्याचा पृष्ठभाग सोडून तो ज्या प्रमाणे जमिनीवर येऊ शकत नाही तसेच विश्वात्मकपणे जीवन व्यतीत करणाऱ्या भक्ताचे जगणे असते, हे चिरंतन सत्य, ‘गेलियाही भलतेउता । उदकपणें पांडुसुता । तरंगाची एकात्मता । न मोडेचि जेवीं’ अशा अनुपम शब्दकळेद्वारे विदित करतात ज्ञानदेव. ‘कर्मसंन्यास’ हा ज्याचा स्व-भाव बनलेला आहे अशा अकर्मयोग्याची आत्मखूण वर्णन करण्यासाठी हाच दृष्टान्त देतात नाथराय. ‘एकनाथी भागवता’च्या दुसऱ्या अध्यायात विश्लेषण मांडलेले आहे नाथांनी त्या साऱ्या प्रक्रियेचे. नामस्मरणरूपी विकर्माच्या प्रवाहापायी अंतरंग विशुद्ध बनलेल्या उपासकाच्या अंत:करणात परतत्त्व चिरंतन ठाण मांडूनकसे अचल राहते याचा उलगडा,‘कृतनिश्चेंसी बुद्धी । होऊनि ठाके समाधी । ऐशी देखोनि ह्रदयशुद्धी । तेथोनि त्रिशुद्धी न निघे हरी’ इतक्या लाघवी शैलीमध्ये करतात नाथराय. नामसाधनेची ही अंतिम परिणती अभिप्रेत आहे भागवतधर्माला. नि:स्सीम नामधारकाच्या अंतरंगातील बावनकशी शुद्धतेला भुलून तिथेच विसावलेल्या परतत्त्वाला त्याच्याच अस्तित्वाचे विस्मरण होते आणि त्यांपायी तिथून पाय बाहेर काढण्याचे नावच ते काढत नाही, अशी मोठी ह्रदयंगम उपपत्ती ‘हरिनामप्रेमप्रीतीवरी । ह्रदयीं रिघाला जो हरी । तो निघों विसरे बाहेरी । भक्तप्रीतिकरीं कृपाळू’ अशा शब्दांत मांडतात नाथराय त्या साऱ्या आंतरिक परिवर्तनाची. परतत्वाने ज्याच्या अस्तित्वाचाच अंतर्बाह्य़  ताबा घेतलेला आहे अशा त्या भक्ताला, त्याच्या हातून घडणारे  काम भगवंताला अर्पण करण्यासाठी वेगळे परिश्रम करण्याची गरजच उरत नाही. पाण्यावरील तरंग ज्या प्रमाणे पाणी जिकडे जाईल तिकडे जात राहतो अगदी त्याच न्यायाने, भक्ताच्या हातून साकारलेले प्रत्येक कर्म त्याच क्षणी सहजभावाने भगवंताला अर्पण होत राहते हा सहजधर्म, ‘उदकी तरंग अतिचपळ । जिकडे जाय तिकडे जळ । तैसें भक्ताचें कर्म सकळ । अर्पे तत्काळ भगवंतीं’ अशा शब्दांत प्रगट करतात नाथराय. ‘ज्ञानाचा एका’ या रूढ लोकोक्ती मागील रहस्य बहुधा हेच असावे !