अत्तरियाकडून बाहेर पडलो की आपण हाताला अत्तर लावले नसले तरी काही अंशी अत्तराचा गंध आपल्याला चिकटतोच. तसेच द्वैताने अंतर्बाह्य़ रंगलेल्या या जगात नांदताना हाच न्याय आपल्याला तंतोतंत लागू पडतो. आटोकाट प्रयत्न करूनही समजा द्वैताच्या छटा आपल्या चित्ताला भिडल्याच तर त्या झटकायच्या कशा, हे मोठे बिकटच कोडे. त्याचे उत्तर तर शोधायलाच हवे. जीवनात गुरू- तत्त्वाची संगती याचसाठी आवश्यक असते, असे याचे उत्तर ज्ञानदेव देतात. गुरूतत्त्वाचे साधकाच्या जीवनात प्रयोजन असेल तर ते हेच, हा निर्वाळाही ते देतात. या सहसंबंधांचा मोठा मार्मिक उलगडा ज्ञानदेवांनी केला आहे तो ‘ज्ञानेश्वरी’च्या १८व्या अध्यायात! कुरूक्षेत्रावर अर्जुनाच्या निमित्ताने प्रगटलेल्या श्रीकृष्णोक्तीवर भाष्य करताना या अध्यायात ज्ञानदेवांनी ‘क्रमयोगा’चे विलक्षण विवेचन केले आहे. ‘कर्मयोग’ व ‘क्रमयोग’ या  पूर्णत: वेगळ्या संज्ञा-संकल्पना होत. ज्ञानेश्वरीच्या तिसऱ्या अध्यायात ज्ञानदेवांनी उत्कट विवरण केले आहे ‘कर्मयोगा’चे; तर १८ व्या अध्यायात ते कथन करतात ‘क्रमयोग’! आपल्याला साधकाच्या अवघ्या वाटचालीचा ज्ञानदेवांनी मांडलेला आलेख सापडतो क्रमयोगात. जीवनात गुरूतत्त्वाचा प्रवेश होण्यासाठी साधकाला कोणती पूर्वतयारी अत्यावश्यक ठरते, इथपासून ज्ञानदेव तिथे तपशीलवार बोलतात. गुरूंची भेट होण्यासाठी साधकाची जी बैठक सिद्ध होणे गरजेचे असते तिचे विवरण ज्ञानदेव करतातच, पण ते तिथेच थांबत नाहीत. केवळ गुरू भेटल्याने सर्व काही आपोआप घडते, साधकाला काहीच करणे उरत नाही, अशी काहींची समजूत असेल तर त्याचे निराकरण ज्ञानदेव क्रमयोगाच्या विश्लेषणात करतात. साधकाच्या अंत:करणाला प्रसंगवशात बाधा झालेल्या द्वैताची झाडणी गुरूभेटीखेरीज अशक्यच होय, असा नि:संदिग्ध निर्वाळा ज्ञानदेव ‘हरिपाठा’त ‘द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान। तयां कैचे कीर्तन घडेल नामी।।’ इतक्या स्पष्ट शब्दांत देतात. द्वैत झटकल्याशिवाय नामाच्या ठिकाणी कीर्तन घडणार नाही आणि गुरूतत्त्वाची भेट झाल्याखेरीज द्वैताचा निपटारा व नामचिंतनाच्या ठायी प्रेम या गोष्टी साध्य होणार नाहीत असे ज्ञानदेवांचे हे सांगणे. गुरूची गाठ पडण्याने द्वैत झटकून टाकण्याचा मार्ग उमगतो. मात्र द्वैताने मळलेल्या चित्ताची शुद्धता साधकालाच स्वकष्टाने करावी लागते, हे गाभासूत्र ज्ञानदेव- ‘‘तरी गुरू दाविलिया वाटा। येऊनि विवेकतीर्थतटा। धुऊनिया मळकटा। बुद्धीचा तेणे’’ या प्रत्ययकारी शब्दांत विशद करतात. ज्ञानदेवांचे हे उद्गार म्हणजे साधकाच्या जीवनामध्ये श्रीगुरू नेमकी कोणती भूमिका पार पाडतात याचे विलक्षण मनोज्ञ दर्शनच. गुरूची भेट झाल्याने साधनेची वाट उमगून त्या वाटेने वाटचालीस सुरुवात केलेला साधक, ज्ञानदेवांच्या दाखल्यानुसार, विवेकरूपी तीर्थाच्या काठावर येऊन पोहोचतो. ‘तरून जाता येते ते तीर्थ’ अशी ‘तीर्थ’ संज्ञेची एक व्याख्या केली जाते. प्रवाहामध्ये उतरून जिथे पैलतीर गाठता येतो अशा स्थळाला ‘तीर्थ’ असे अभिधान आहे. गुरूंनी प्रशस्त करून दिलेल्या वाटेने चालत विवेकरूपी प्रवाहाच्या काठावर येऊन ठेपलेल्या साधकाने द्वैताने मळलेले आपले अंत:करण त्या विवेकरूपी प्रवाहात धुऊन त्याचा मळकटपणा स्वप्रयत्नाने दूर करायचा असतो, हा ज्ञानदेवांच्या सांगण्याचा इत्यर्थ. सद्गुरूंची गाठ पडल्यावरही साधकाची जबाबदारी संपत नसते, हेच वास्तव ज्ञानदेवांना इथे अधोरेखित करावयाचे असेल का ?

अभय टिळक agtilak@gmail.com

lakdi pool in Pune
VIDEO : पानिपतच्या युद्धानंतर नानासाहेब पेशव्यांनी तातडीने ‘लकडी पूल’ का बांधून घेतला? वाचा रंजक गोष्ट
Loksatta samorchya bakavarun Congress bjp Declaration Important to the people Purpose of the issues
समोरच्या बाकावरून: माझे मत त्याच उमेदवाराला, जो…
Loksatta anvyarth Muslim students beaten up in Savitribai Phule University Pune
अन्वयार्थ: विद्यापीठांतला राजकीय हेका
How To Make Gudi Padwa Sakhrechya Gathi At Home gudi padwa 2024
गुढी पाडव्यासाठी साखरेच्या गाठी यंदा बनवा घरीच, साखरेच्या बत्तास्यांची सोपी झटपट कृती