‘समत्व’ हा गुण आकाश शिकवत असल्यामुळे, आकाशाला मी आपला गुरू  मानतो, हा माझा दुसरा गुरू  होय, असे अवधूत दत्तात्रेयांचे कथन ‘एकनाथी भागवता’च्या सातव्या अध्यायात नाथ शब्दबद्ध करतात. परंतु, त्याच वेळी, समत्व हा गुण ज्याच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनलेला आहे अशा योग्याची दृष्टी व्यापक असते, हेही, ‘तेणें आकाशदृष्टांतें। ब्रह्मभावें आपणियातें। योगी देखिजे पुरतें। व्यापकत्वें आपुल्या।’ अशा शब्दांत नाथराय तिथेच विदित करतात. समत्व आणि व्यापकत्व यांचा अन्योन्यसंबंधच जणू नाथ स्पष्ट करून सांगत आहेत. इथे आणखी एक गंमत केलेली आहे नाथांनी. व्यापकत्व हे योग्याचे जणू एक व्यवच्छेदक लक्षणच होय, असे निर्देशित करत, ‘योगी’ या संज्ञासंकल्पनेच्या पारंपरिक अर्थाचा परीघ नाथ अधिक व्यापक बनवितात. योगसाधनेइतकाच अंत:करणाचा पोतही ‘योगी’ असण्याशी निगडित असतो, हे नाथ अतिशय सूक्ष्मपणे अधोरेखित करतात. योगप्रधान शैवागमाचा बोधगाभा आणि भागवत धर्मप्रणीत जीवनदृष्टी यांतील जैविक साम्य प्रतीत होते आपल्याला इथे. भागवत धर्माने प्रवर्तित केलेल्या भक्तितत्त्वाचे वर्म पुरते आकळलेल्या वैष्णवाला तपसायास करून एकटय़ानेच वैकुंठप्राप्ती करून घेण्याची आस कधीच नसते, असे ज्ञानदेव त्यांच्या गीताभाष्याच्या नवव्या अध्यायात स्वच्छपणे सांगून टाकतात. ‘कहीं एकाधेनिं वैकुंठा जावें। तें तिहीं वैकुंठचि केलें आघवें। ऐसें नामघोषगौरवें। धवळलें विश्व।’ ही ज्ञानदेवांची ओवी या संदर्भात कमालीची आशयघन ठरते. स्वत:चा उद्धार करून घेण्यासाठी कोणीही प्रयत्न करेल. भागवत धर्मविचाराला नाही वाटत मातबरी त्याची एवढी. आकाशागत विशाल व्यापकत्व हा ज्याचा स्थायीभाव झालेला आहे असा भक्त, एकटय़ानेच वैकुंठस्थान प्राप्त करून घेण्यापेक्षाही उभ्या पृथ्वीलाच वैकुंठस्वरूप बनवून इहलोकातील यच्चयावत जीवांना वैकुंठीचे सुख अनुभवण्याची किमया साध्य करत असतो, हे सुचवितात ज्ञानदेव इथे. तर, ‘तुका म्हणे त्यांनीं। केली वैकुंठ मेदिनी।’ अशा शब्दांत तुकोबा तशा किमयागार विष्णुदासांचे सामर्थ्य वर्णन करतात. वैकुंठ हे महाविष्णूंचे स्थान. एकदा का विष्णुतत्त्वालाच भूतलावर आणले की पृथ्वीला आपसूकच वैकुंठ रूप प्राप्त होईल, हे हेरलेले सांवतामहाराज, ‘वैकुंठीचा देव आणू या कीर्तनी। विठ्ठल गाऊनी नाचो रंगी।’ असा पुकारा करत त्यांसाठीचे हुकमी साधनही सांगून टाकतात. तुकोबा उलगडून सांगतात सामर्थ्य हरिदासांचे तर, सांवतामहाराज विवरतात वैशिष्टय़  हरिकथेचे. परब्रह्मस्वरूपाचे वर्म आकळलेले योगी जीवनामध्ये भेटणे ही तर परमभाग्याची बाब होय, हे सांगणारे नाथरायांचे ‘ब्रह्म  सर्वगत सदा सम। तेथें आनु नाहीं विषम। ऐसें जाणतीं जे योगी वर्म। तयांची भेटी जालिया भाग्य परम।’ हे उद्गार, परतत्त्वाच्या समत्व आणि व्यापकत्व याच दोन गुणलक्षणांचा निर्देश करतात, हे या संदर्भात मननीय शाबित होते. भक्तीच्या साधनेद्वारे परतत्त्वाशी सामरस्य अनुभवणाऱ्या उपासकाचे अंतरंगही त्याच दोन गुणांनी मंडित व्हावे, हे मग ओघानेच येते. जात-वर्ण-पंथ यांवर आधारित क्षुद्र  भेदभाव त्याच्या अंत:करणाकडे चुकूनही फिरकतदेखील नसावेत, इतके साधे व सरळ अनुमान मांडण्यास  ‘या रे या रे लाहान थोर। याति भलते नारीनर। करावा विचार। न लगे चिंता कोणासी।’ तुकोबांचे हे सर्वोदार आवाहन पुरेसे नव्हे काय!

अभय टिळक agtilak@gmail.com