गुरूंचा म्हणून शोध असा तुकोबांना करावाच लागला नाही. उलट, तुकोबांनाच शोधत बाबाजी चैतन्य आले असावेत, असेच त्या संदर्भातील तुकोबांच्या एका अभंगावरून दिसते. आपल्याला झालेल्या सद्गुरुकृपेचा अनुभव तुकोबांनी तंतोतंत शब्दबद्ध करून ठेवलेला आहे. अभंगांच्या अंतरंगाद्वारे डोळ्यांपुढे उमलून येणारे तुकोबांचे जीवनदर्शन विलक्षण रोचक, उद्बोधक आणि रोमांचित करणारे आहे. सद्गुरू बाबाजी चैतन्यांची आणि तुकोबांची भेट नक्की केव्हा व कोठे झाली, याबाबत निश्चित दाखले काही हाताशी लागत नाहीत. तो तपशील लुप्त झाला आहे सुदूर इतिहासाच्या पोटात. त्या संदर्भात अभ्यासकांनी त्यांच्या त्यांच्या संशोधनांती त्यांना भावलेले अंदाज व्यक्त केले आहेत. मात्र, गुरुभेटीचा तुकोबांच्या जीवनातील तो साराच प्रसंग असाधारण असाच म्हणावा लागतो. त्याची प्रस्तुतता व त्यात अनुस्यूत असलेला संदेश आजही तितकाच टवटवीत आहे. ‘‘सांपडविलें वाटे जातां गंगास्नाना। मस्तकीं तो जाणा ठेविला कर।’’ अशा शब्दांत तुकोबा गुरुकृपेचा प्रसंग व विधी प्रगट करतात. ‘सांपडविलें’ ही तुकोबांची शब्दकळा विलक्षण मार्मिक होय. प्रचंड अर्थवत्ता दडलेली आहे त्यात. कोणी कोणाला सापडविले? बाबाजी चैतन्यांनी तुकोबांना? की, तुकोबांनी बाबाजी चैतन्यांना? बाबाजी चैतन्यांची भेट होईपर्यंत तुकोबांना कोणाचे मार्गदर्शन लाभले? की, अभ्यासाच्या प्रांतातील तिथवरचा प्रवास तुकोबांनी एकाकीपणेच केला? सगळेच प्रश्न! गाथेमधील काही अभंगांत उजळतात या प्रश्नांची उत्तरे शोधण्याच्या ढोबळ दिशा. जीवनातील श्रेयसाचा माग घेण्याचा पंथ तुकोबांनी निखळ अंत:प्रेरणेने निवडला असावा अथवा होता, याच्या स्पष्ट खुणा- ‘‘तुका म्हणे याचा संग नव्हे भला। शोधीत विठ्ठला जाऊं आतां।’’ या तुकोबांच्या उद्गारांत उमटलेल्या दिसतात. तुकोबांच्या लौकिक जीवनातील नेमक्या कोणत्या टप्प्यावर त्या शोधप्रक्रियेचा उगम घडून आला, याचाही केवळ अदमासच बांधावा लागतो आपल्याला. एक मात्र खरे की, विठ्ठलाचा शोध घेण्याचा निर्धार तुकोबांनी मनोमन केला असावा अंत:प्रेरणेच्या बळावरच. शोधपर्वाच्या प्रथम चरणात तरी मानवी देहधारी कोणी मार्गदर्शक अथवा वाटाडय़ा तुकोबांना लाभला नसावा, असे मानण्यास एक जागा पुन्हा तुकोबांच्या एका अभंगातच आपल्याला सापडते. ‘गुरू परंपरेचे अभंग’ या शीर्षकाचा एक अभंगगुच्छ वारकरी सांप्रदायिकांच्या नित्य पठणात असतो. त्यांतील तुकोबांचा एक अभंग अतिशय आशयगर्भ होय : ‘‘माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव। आपण चि देव होय गुरू।’’ हे त्या अभंगाचे पहिले चरण. शोधाच्या मार्गावर पाऊल ठेवताना मानवी देहधारी गुरुतत्त्वाचे मार्गदर्शन मिळण्याच्या शक्यता दिसत नसल्याने तुकोबांनी प्रत्यक्ष विठ्ठलाकडेच आपले गुरुत्व सुपूर्द करत अभ्यासाचा श्रीगणेशा केला, एवढे तरी या अभंगचरणावरून आपल्या ध्यानात येते. इथे, ‘‘गुरू विठ्ठल गुरू देवता विठ्ठल’’ असा घोष करणाऱ्या नामदेवरायांची सय आल्याखेरीज राहात नाही. तुकोबांची ही धाटणी एकलव्यापेक्षाही निराळीच आहे. अभ्यासाच्या प्रक्रियेचे एक दिव्य सूत्र इथे दडलेले आहे. साधकाच्या अंत:करणात अभ्यासाची ऊर्मी प्रबळ आणि निखळ असेल तर त्याच्या जीवनात गुरुत्व कोणत्या ना कोणत्या रूपात प्रगटतेच, हा शाश्वत बोध म्हणजे तुकोबांच्या जीवनातील शोधपर्व. मग शोधाभ्यासाचा प्रांत लौकिकाचा असो वा पारलौकिकाचा!

– अभय टिळक agtilak@gmail.com