News Flash

स्थिर नाहीं एकवेळ

‘संत’ समाजव्यवहारात कशा पद्धतीने नांदतो यांची सैद्धान्तिक चर्चा मुक्ताबाई तिथे मांडतात.

(संग्रहित छायाचित्र)

मुक्ताबाई.. भागवत धर्माची पताका खांद्यावर घेतलेल्या संतमंडळांतील अलौकिक व्यक्तिमत्त्व! ज्ञानदेवादी चार भावंडांमध्ये वयाने सर्वात लहान असणाऱ्या मुक्ताबाईंचा धाक मात्र उदंडच दिसतो. ‘पंढरीरायाचे प्रेमभांडारी’ असा लौकिक गाजणाऱ्या नामदेवरायांनीही- ‘‘लहानगी मुक्ताई जैसी सणकांडी। केले देशोधडीं महान संत।’’ अशा शब्दांत मुक्ताईंचा आब व्यक्त करावा यांतच सर्व आले. असामान्य योगाभ्यासाद्वारे प्रदीर्घ काळ कायारक्षण केलेल्या योगीराज चांगदेवांना- ‘‘चौदाशें वरु षें शरीर केलें जतन। बोधाविण शिण वाढविला।’’ अशा परखड शब्दांद्वारे अंतर्मुख होण्यास भाग पाडणाऱ्या मुक्ताईंचा सादर धाक कोणाला वाटला नसता तरच नवल. तत्कालीन लोकव्यवहाराने केलेल्या उद्दाम, उन्मत्त वर्तनापायी, पराकोटीच्या उद्वेगाच्या एका क्षणी आपल्या कोपीचे दार बंद करून स्वत:ला आतमध्ये कोंडून घेणाऱ्या ज्ञानदेवांना सकणव, परंतु रोकडय़ा शब्दांत त्यांच्या कर्तव्याचे भान आणून देणाऱ्याही मुक्ताबाईच. ताटीचे दार दडपून समाजापासून स्वत:ला अलिप्त राखणे, हे भागवत धर्माला अभिप्रेत असणाऱ्या संतत्वाशी विसंगत ठरते, अशी सडेतोड भूमिका मुक्ताबाई त्या प्रसंगी मुखर करतात. ‘संत’ कोणाला म्हणावे, ‘संत’ या पदवीला प्राप्त झालेल्यांची अंतरंग लक्षणे कोणती आणि भागवत धर्माला अभिप्रेत असणारा ‘संत’ समाजव्यवहारात कशा पद्धतीने नांदतो यांची सैद्धान्तिक चर्चा मुक्ताबाई तिथे मांडतात. त्याप्रसंगी मुक्ताईंच्या मुखातून जी अभंगवाणी उमटली ती ‘ताटीचे अभंग’ अशा नावाने विख्यात आहे. ज्या जगाशी आपला दैनंदिन व्यवहार चालतो ते दृश्य जग म्हणजे वस्तुत: शिवाचेच विलसन आहे, ही अद्वयाची दृष्टी हस्तगत झालेल्याने तरी जगाच्या वागण्याचा खेद मानून घेता कामा नये, असे रुष्ट झालेल्या ज्ञानदेवांना कोपीच्या बाहेर उभे राहून मुक्ताई परोपरीने सांगत राहतात. कोणत्याही वेळी, कोठेही आणि कशाही स्वरूपात आपला व्यवहार जगरूपाने नटलेल्या शिवाशीच निरंतर घडत असतो, हा मुक्ताईंच्या कथनाचा गाभा. जग हे स्वरूपत: असेच आहे; इथे नित्य काहीच नाही; प्रतिक्षणी तेच शिवतत्त्व वेगळे रूप घेऊन आपल्यासमोर प्रगटते; ते वर्षांव करते कधी प्रेमाचा, तर कधी दुरुत्तरांचा.. तेव्हा, जगाने बोल लावला म्हणून आपण विचलित व्हायचे नसते, हे मुक्ताई नाना प्रकारे ज्ञानदेवांना समजावत राहतात. विश्व म्हणजे ‘शिव’ नावाच्या आदिवस्तूचे प्रगटन होय आणि ते प्रत्येक क्षणी नवीन रूप धारण करत असते, हे शैवागमाचे सारतत्त्व मुक्ताबाई- ‘‘ऐसा नटनाटय़ खेळ। स्थिर नाहीं एकवेळ।’’ अशा प्रत्ययकारी शब्दांत मांडतात. स्वभावत:च जग अ-नित्य आहे अथवा असते, हा शांभवाद्वयाचा गाभा सिद्धान्तच मुक्ताईंनी उलगडून मांडलेला आहे. ‘अ-नित्य’ म्हणजे नित्य बदलणारे. खोटे नव्हे! मूळ वस्तू आहे तशीच, तीच असते. स्वरूपाने नित्य असणाऱ्या वस्तूचा बदलतो तो केवळ आकार. इथे भर आहे तो अविरत होत राहणाऱ्या नूतनाविष्कारावर. विलयावर नव्हे. अचल, अविकारी शिवाचे अविरत घडत राहणारे नवदर्शन म्हणजेच हे जग आणि त्यांतील व्यवहार. प्रत्येक क्षणी होणाऱ्या नवदर्शनाद्वारे शिव त्याचे नित्यत्व प्रगट करत राहतो. सागरामध्ये उमटणारी एक लाट दुसरीसारखी नसते. काही क्षणच प्रत्येक लाट समुद्राच्या पृष्ठभागावर नाचते-विहरते आणि लय पावते. मात्र, लाटांची मालिका अविरत चालूच असते. लाटांचे हे नित्यत्व हेच सागरदर्शन. परंतु प्रत्येक लाट निराळी. हाच शिवाचा नटनाटय़ खेळ!

अभय टिळक agtilak@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2021 3:38 am

Web Title: loksatta advayabodh supernatural personality in saints circles zws 70
Next Stories
1 वस्तुप्रभा
2 नित्य-नूतन
3 द्वैताची झाडणी..
Just Now!
X