News Flash

जयां ऐहिक धड नाहीं…

शब्दकोशात पाहू गेल्यास ‘अवधूत’ या संकल्पनेस अर्थांतराचे विविध पदर आढळतात

(संग्रहित छायाचित्र)

– अभय टिळक

शब्दकोशात पाहू गेल्यास ‘अवधूत’ या संकल्पनेस अर्थांतराचे विविध पदर आढळतात. ‘विरक्त’, ‘विरागी’, ‘दिगंबर’ हे त्यांतील काही. सर्वसंग परित्यागी, लौकिकावर पाणी सोडलेला, व्यावहारिक जगाशी, त्यातील बहुपेडी लोकव्यवहाराशी सुतराम घेणेदेणे नसलेला फक्कड बैरागी, असाच ‘अवधूत’ या संज्ञेचा अथवा उपाधीचा मुख्य गाभा असल्याचे जाणवते. मात्र ‘अवधूत’ या संकल्पनेला लौकिकाचा अनमोल आयाम बहाल करत प्रपंचविन्मुख गणल्या जाणाऱ्या त्या अधिष्ठानाला थेट समाजाभिमुखतेची अर्थच्छटा बहाल केली ती पैठणनिवासी शांतिब्रह्म एकनाथ महाराजांनी. समाजपुरुषावरील नाथांचे हे उपकार खरोखरच अपूर्व. ‘एकनाथी भागवत’च्या सातव्या, आठव्या व नवव्या अध्यायात यदू आणि अवधूत यांचा संवाद मांडलेला आहे नाथरायांनी. अवचितच दृष्टीला पडलेले अवधूत यदुराजाला कसे दिसले-भासले, याचे मनोज्ञ वर्णन नाथ तिथे मांडतात. तिथे विवेचनाच्या प्रारंभीच ‘अवधूत’ या पदाचा अर्थ विशद करताना- ‘‘सभोंवता समस्तु। प्रपंच निजबोधें असे धूतु। यालागीं बोलिजे ‘अवधूत’।’’ अशी आगळी शब्दकळा नाथांनी पेरलेली आहे. ‘अवधूत’ या अधिष्ठानाला असे अपूर्व परिमाण बहाल करण्यात अद्वय व भागवत या दोन तत्त्वदृष्टींचे सार नाथांनी एकवटपणे एकजीव केलेले आहे. प्रपंचापासून फटकून राहतो तो ‘अवधूत’ नव्हे, तर आपल्याला हस्तगत झालेल्या जीवनपोषक ज्ञानाचा ठेवा भवतालातील लोकव्यवहारात निर्माण झालेला हिणकस अंश धुऊन टाकण्यासाठी उपयोगात आणतो त्याला ‘अवधूत’ ही उपाधी शोभते, हेच नाथराय सांगत आहेत. आजची परिभाषा वापरायची, तर ‘अवधूत’ या अवस्थेला पोहोचलेली विभूती ‘बोलकी’ नव्हे, तर ‘कर्ती’ सुधारक असावी, हीच नाथांची अपेक्षा! अद्वय दृष्टीचे हे समूर्त साकार रूपच जणू. जग हा ‘त्यागण्याचा’ नव्हे, तर ‘सुधारण्याचा’ विषय होय. हे पटून आपल्या परीने लोकव्यवहार शुद्ध आणि निर्मळ करण्यासाठी जो प्रवर्ततो तो ‘अवधूत’. ज्ञानदेवांनी मागितलेल्या ‘पसायदाना’च्या मुळाशी असलेली जीवनविषयक दृष्टी नेमकी हीच. ‘‘बुडतां हे जन न देखवे डोळां। येतो कळवळा म्हणउनि।’’ या तुकोक्तीचा उगम होतो याच तत्त्वदृष्टीच्या मुशीतून. परमशिवाचेच विलसन असणाऱ्या अशा पूर्ण सत्य जगामध्ये जे जे म्हणून असुंदर आहे, विद्रूप आहे, तेही त्या शिवाचेच प्रगटन होय. त्यामुळे एकाच तत्त्वाच्या शिव (मंगल) आणि अ-शिव अशा दोन्ही रूपांचे सम्यक भान असणाऱ्या ‘अवधूतां’नी असुंदराचे रूपांतर सुंदरामध्ये घडवून आणण्यासाठी सदैव कार्यतत्पर बनायचे असते, ही भागवत धर्मविचारास अभिप्रेत असलेली संतवृत्ती उमलते याच तत्त्वविचारामधून. मनुष्याच्या लौकिक व पारलौकिक जीवनातील नैसर्गिक आंतरिक संगती उमगण्यामधूनच या जीवनदृष्टीची अभिव्यक्ती होत असते. व्यक्तीचे वा समाजाचे ऐहिक जीवन आणि त्या जीवनाचा गुणात्मक स्तर यांवरच त्या व्यक्तीच्या आणि समूहाच्या पारलौकिक जीवनाचा गुणात्मक  दर्जा निर्भर असतो. हे साऱ्यातील मुख्य अंत:सूत्र. निकृष्ट, नीतिहीन, दांभिक अशा लौकिक जीवन-व्यवहाराच्या पायावर आध्यात्मिक वैभवाचे मजले उठवले जाणे हे केवळ अशक्य होय. हाच या अंत:सूत्राचा गर्भितार्थ. ‘‘जयां ऐहिक धड नाहीं। तयांचें परत्र पुससी काई। म्हणोनि सांगों कां वाई। पंडुकुमरा।’’ अशा शब्दांत ज्ञानदेव निर्देश करतात तो याच चिरवास्तवाकडे!

agtilak@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2021 12:05 am

Web Title: loksatta advaybodh article abn 97 2
Next Stories
1 आहिक्य-परत्र
2 शांती
3 दादरा
Just Now!
X