अभय टिळक

लहानपणी ऐकलेली एक गोष्ट. तशी लहानशीच, परंतु प्रचंड आशयसंपन्न. ती ऐकली परिचयातील एका सत्शील गृहस्थांकडून. शिक्षण क्षेत्रात अध्ययन-अध्यापनाचे काम प्रामाणिकपणे करून तृप्त मनाने निवृत्त झालेल्या त्या आजोबांपाशी शालेय विश्वातील कथांचा जणू संभारच असे. त्यातलीच एक कथा. गोष्ट तशी बरीच जुनी. एके दिवशी एका शाळेत शाळा-तपासणीसाठी आले तपासनीस. शाळेचे ‘इन्स्पेक्शन’ असल्यामुळे सर्व वर्ग टापटीप राहतील याची दक्षता घेतलेली. शाळा- तपासणीसाठी आलेल्या निरीक्षकांनी समजा मुलांची परीक्षा घेतलीच तर भानगड नको म्हणून वर्गातील त्यातल्या त्यात हुशार, चुणचुणीत मुले पहिल्या बाकांवर बसवलेली. एकामागून एक वर्ग तपासत अधिकारी असेच एका वर्गात आले. पहिल्याच ओळीतील पहिल्याच बाकावर बसलेला मुलगा बघताक्षणीच वाटत होता प्रत्युत्पन्नमती. त्याच्या जवळ जात मायेने त्याच्या पाठीवर हात ठेवत तपासणी अधिकारी उद्गारले, ‘‘बाळा, या जगात देव कोठे आहे ते मला सांग पाहू. नेमके उत्तर दिलेस तर बक्षिसादाखल तुला मी एक पेरू देईन.’’ तो मुलगाही काही कच्च्या गुरूचा चेला नव्हता. पापणी लवायच्या आत त्याने उत्तर दिले, ‘‘गुरुजी, या जगात देव कोठे नाही हे आपण मला सांगितलेत तर मीच आपल्याला दोन पेरू देईन बक्षिसादाखल!’’ मुलाचे ते उत्तर ऐकून तपासणी अधिकारी सर्द झाले. तपासणी संपली.. आणि गोष्टही! शांभवाद्वयाचा सारा गाभाच जणू त्या मुलाच्या उत्तरात एकवटलेला आहे. ‘ऐसें कळलें उत्तम। जन तेंचि जनार्दन’ असे प्रतीतीचे सार्थ उद्गार मुक्ताईंच्या मुखातून उमटतात ते याच वास्तवाचे दर्शन घडल्यानंतर. ‘जनार्दन’ हे भगवान विष्णूंचे एक नाव. सर्व लोक ज्याची याचना करतात, ज्याच्यापाशी मागतात, तो ‘जनार्दन’ असा ‘जनार्दन’ या संज्ञेचा खुलासा विनोबाजींनी केलेला आहे. परतत्त्वाचे ‘विष्णू’ हे अभिधान विस्तारवाचक होय. जे विस्तारक्षम आहे, ज्याचा व्याप असीम आहे असे तत्त्व ‘विष्णू’ या नामाने निर्देशित केले जाते. जनरूपाने विनटलेल्या अशा जनार्दनाला पैठणनिवासी एकनाथ ‘जगीं जो नांदतो जनीं एवढा जनार्दन तो खरा। तयाचिया चरणावरी मस्तक निर्धारा’ अशा विनम्रभावाने दंडवत घालतात. या जगातील लोकमात्रांच्या रूपाने जनार्दनच प्रगटलेला आहे, या कथनाद्वारे व्यासप्रणीत भागवत धर्म आणि शांभवाद्वय या दोन तत्त्वविचारांचा संगमच एकनाथमहाराज सूचित करतात. भौतिक जगाबाबतच्या दृष्टिकोनाबाबत एवढे व असे मतैक्य असल्यामुळेच शिवोपासक नाथ आणि भागवत धर्माची पताका खांद्यावर मिरविणारा विष्णुपूजक वारकरी यांचा समन्वय इथे साकारला. भागवत धर्माने प्रवर्तित केलेल्या भक्तीविचाराचे सारे आगळेपण ‘अवलोकिता जन दिसे जनार्दन’ या नाथरायांच्या अनुभूतीमध्ये एकरसपणे उतरलेले आहे. भागवत धर्मातील भक्तीचे हे वैशिष्टय़ आकळलेल्या साधकाला जन आणि जनार्दन यांत भिन्नता औषधालादेखील गवसत नसते. त्याच्या लेखी जगाची सेवा हीच जगदिश्वराची सेवा. ‘सर्वाभूतीं दया भेद नोहे चित्ता। साधी परमार्थ हाचि एक’ असे नाथरायांचे सद्गुरू जनार्दनस्वामी जे सांगतात, त्याचा मथितार्थही हाच. जन आणि जनार्दन यांच्या अन्योन्य नात्याच्या या वास्तव स्वरूपाचे भान सदोदित जागे राहून त्यांद्वारे उभा लोकव्यवहार विशुद्ध बनावा याचसाठी ‘आह्मां सांपडलें वर्म। करू भागवत धर्म’ अशी हाळी देत नामदेवरायांनी पंजाबातील घुमानपर्यंत समाजजीवन घुसळून काढले. आपला खरा वारसा कोणता असेल, तर तो हाच!

agtilak@gmail.com