News Flash

भागवत

शांभवाद्वयाचे अंतरंग उलगडून मांडण्यासाठी भगवान कृष्णकथित श्रीमद्भगवद्गीतेचा आश्रय ज्ञानदेवांनी करावा यात मोठे गम्य दडलेले आहे.

(संग्रहित छायाचित्र)

– अभय टिळक

शांभवाद्वयाचे अंतरंग उलगडून मांडण्यासाठी भगवान कृष्णकथित श्रीमद्भगवद्गीतेचा आश्रय ज्ञानदेवांनी करावा यात मोठे गम्य दडलेले आहे. शैवागमाचे उद्गाते असणारे भगवान शिव आणि श्रीमदभगवद्गीतेत ज्याचे विवरण मांडले आहे त्या भागवत धर्माचे प्रणेते असणारे विष्णू या दोहोंचे समरूपत्व हा झाला त्या गम्याचा एक पैलू. तर शैवागमाचा तात्त्विक गाभा व भागवत धर्मविचाराचा सत्वांश यांतील एकवाक्यता हा ठरतो दुसरा पैलू. शांभवाद्वयाचे मूल्यलेणे धारण केलेली विभूती व भागवत धर्माचे गाभासत्त्व हस्तगत झालेला उपासक यांचेही भौतिक जगाबद्दलचे आकलन कमालीचे एकात्म व एकरस ठरते, ते या दोन तत्त्वदर्शनांतील एकमयतेपायीच. श्रीमद्भगवद्गीता आणि श्रीमद्भागवत या दोन्ही प्रबंधांचे निर्मिक भगवान श्रीकृष्ण! विस्मयाचा भाग असा की, या उभय कृतींद्वारे प्रगट झालेल्या श्रीकृष्णोक्तीचे शब्दांकन घडून आले ते महर्षी व्यासांच्या माध्यमातून. महाभारताच्या भीष्मपर्वामध्ये श्रीमद्भगवद्गीतेचा, तर शांतिपर्वात श्रीमद्भागवताचा अंतर्भाव असावा, यांमागील सूत्र नेमके हेच. किंबहुना, म्हणूनच श्रीमद्भगवद्गीता म्हणजे भगवान श्रीकृष्णांचे तत्त्वदर्शन, तर श्रीमद्भागवत म्हणजे त्याच श्रीकृष्ण परमात्म्याचे लीलादर्शन होय, अशी परंपरेची दृढ धारणा. भागवत धर्माचे अवघे मूल्यसंचित या अक्षरकृतींतून प्रगट होते. ‘भागवत धर्म’ या संकल्पनेला लाभल्या आहेत तीन अर्थच्छटा. प्रत्यक्ष भगवंताने जो सांगितला वा प्रत्यक्ष भगवंतापासूनच ज्याची उत्पत्ती झाली तो धर्मविचार म्हणजे भागवत धर्म- ही झाली या तिपदरी अर्थांतरातील पहिली अर्थच्छटा. व्यासरचित भागवत पुराणात ज्याचे विवरण सांगोपांग मांडले आहे असे तत्त्वदर्शन म्हणजे भागवत धर्म- हा झाला अर्थांतराचा दुसरा पदर. तर, भक्तांचा जो धर्म तो भागवत धर्म-  ही झाली तिसरी अर्थच्छटा. ‘भागवत’ म्हणजेच ‘भक्त’! भक्ताची जी जीवनरीत तिला भागवत धर्म असे संबोधावे, हा अर्थ यांद्वारे निष्पन्न होतो. ‘संपूर्ण जग विष्णुमय होय’ हा उपदेश तुकोबा परोपरीने करतात तो भक्त-भागवतांनाच. ‘अइका जी तुह्मी भक्त भागवत। कराल तें हित सत्य करा’ असे आवाहनवजा उद्बोधन भागवतांना करण्यामागे तुकोबांचा मुख्य हेतू हाच. अखिल विश्वात एका विष्णुतत्त्वाखेरीज अन्य काहीही नाही, ही जाणीव मनीमानसी जपत लोकव्यवहारात वर्तावे, हा भागवत धर्मविचाराच्या अनुयायांना तुकोबांचा उपदेश. भागवत धर्मविचाराला अभिप्रेत असलेल्या भक्ताच्या लेखी जग व जगदीश्वर यांत नांदतो पूर्ण अभेद. उभयतांमध्ये अणुमात्रही भिन्नत्व नाही. जग म्हणजेच जगदीश्वर हे भक्त-भागवतांचे जीवनविषयक तत्त्वज्ञान. ‘जें जें भेटें भूत। तें तें मानिजें भगवंत’ ही भक्तांची जीवनविषयक दृष्टी अंकुरते ती याच जीवनविषयक तत्त्वज्ञानाच्या गर्भातून. विश्वात्मक होऊन प्रगटलेले ते परमात्मतत्त्व विशुद्ध सुखरूप होय, असा स्वानुभवसिद्ध सिद्धान्त- ‘सुखरूप ऐसें कोण दुजें सांगा। माझ्या पांडुरंगा सारिकें तें’ अशा प्रश्नार्थक शैलीत तुकोबा विदित करतात. परमतत्त्व निखळ सुखरूप असल्यामुळे जगातील यच्चयावत जीवमात्रांचे जगणे सुखमय व्हावे यासाठी आमरण झटणे हेच भागवत धर्माच्या अनुयायांचे जीवितध्येय बनते. गीतेत याच भागवत धर्मप्रणीत जीवनदृष्टीचे विवरण होय, असे प्रतिपादन करतात लोकमान्य टिळक त्यांच्या ‘श्रीमद्भगवद्गीतारहस्य’ या प्रबंधात. ‘उपदेश अर्जुना जनीं जनार्दना। अखंड भावना भूतदया’ अशा शब्दांत नामदेवरायांनी तेच पूर्वी सांगून ठेवले नव्हते का ?

agtilak@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2021 12:06 am

Web Title: loksatta bhagwat advayabodh article abn 97
Next Stories
1 विष्णुमय
2 विश्वरूप
3 त्यांसी पाहिजें सांभाळिलें…
Just Now!
X