अभय टिळक

समुद्रमंथनाची कथा बहुधा सगळ्यांना ठाऊक असतेच. आसुरी प्रवृत्तींच्या विरोधात पुकारलेल्या संघर्षात दैवी शक्तींना अक्षय जयप्राप्ती व्हावी यासाठी अमृत हस्तगत करून घेण्याचा उपाय म्हणून समुद्रमंथनाचा खटाटोप आरंभण्यात आला. त्या मंथनामधून जी १४ रत्ने बाहेर पडली, त्यांचा निर्देश लग्नाच्या वेळी हटकून होतोच. गृहस्थाश्रमामध्ये प्रवेशत असलेल्या वधुवरांना सौख्यानंद प्राप्त व्हावा यासाठी त्या १४ रत्नांची आवाहनवजा प्रार्थना केली जाते. अमृत हे त्या १४ रत्नांपैकीच एक. मात्र, समुद्रमंथनाच्या त्या उपक्रमात अमृताच्याच जोडीने हलाहलाचीही निर्मिती घडून आली. अमृत आणि विष या दोहोंचा संबंध आहे तो विष्णू आणि शिव या आदितत्त्वांशी. या दोन तत्त्वांदरम्यान नांदणारे अभिन्नत्व, विष आणि अमृत यांच्या जन्माच्या कथाभागाशी गुंफून घेत, कमालीच्या रम्य शैलीमध्ये शब्दांकित केलेले आहे नामदेवरायांनी. आदिनाथ शिव कर्पूरगौर कशामुळे बनला आणि विष्णूला ‘घननीळ’ असे संबोधन का लाभले, याचे रहस्य- ‘‘नारायणें सेविलें अमृत। झाला श्वेत महादेव। शंभूनें गिळिलें हलहला। ह्मणोनि विष्णु झाला निळा।’’ अशा मोठ्या मार्मिकपणे नामदेवराय उघड करतात. शिव आणि विष्णू या उभय तत्त्वांच्या एकमयतेचे मधुरत्व असे की, समुद्रमंथन चालू झाल्यानंतर सागरतळातून उसळून वर आलेले विष सृष्टीरक्षणासाठी प्राशन करण्यापूर्वी शिवशंभूने स्मरण केले ते महाविष्णूंचे, अशीच परंपरेची धारणा. या दोन तत्त्वांचे समरूपत्व असे असल्यामुळेच, ‘विष्णुसहित शिव’ असे रूप-स्वरूप धारण करून पंढरीक्षेत्रामध्ये प्रगटलेल्या पांडुरंगाचे आराधन अंगीकारणे भागवत धर्मपरंपरेला सहजसुलभ ठरले. समन्वय आणि परिवर्तनशील सातत्य या परंपरेने जपले-जोपासले ते असे. ज्याने अमृत सेवन केल्यामुळे महादेव श्वेतवर्ण बनला, त्या नारायणाला परमउपास्य दैवत म्हणून प्रतिष्ठित बनवले ते व्यासमहर्षींनी. महाभारताच्या शांतिपर्वामध्ये अंतर्भूत नारायणीय उपाख्यानामध्ये भगवान नारायण व त्याच्यापासून प्रसृत झालेला नारायणीय धर्म यांचा असाधारण महिमा व्यासांनी शब्दांकित केला आहे. विष्णुनारायणाचे नामरूप वर्णन करणारे ‘विष्णुसहस्रानाम’ व्यासरचित महाभारताच्या अनुशासन पर्वातच कसे व का समाविष्ट करण्यात आले असावे, याचा उलगडा आता व्हावा! ‘विश्व’ हे ‘विष्णुसहस्रानामा’तील भगवान विष्णूंचे पहिलेच अभिधान ‘शिव’ आणि ‘विष्णू’ या दोन तत्त्वांच्या सामरस्याचे प्रगट दर्शन पुरेपूर घडविते, हा या सगळ्यांतील सर्वाधिक मननीय व तितकाच रोचक अंश. ‘विश्व’ हे परमतत्त्वाचे आद्यनाम होय, हे गाभासूत्र ‘विष्णुसहस्रानाम’ आपल्या मनावर बिंबवते. मुदलात अरूप आणि म्हणूनच अनाम असणारे अव्यक्त विष्णू हे तत्त्व विश्वरूपानेच प्रगटते, हाच याचा सारभूत इत्यर्थ. म्हणजेच व्यक्त झालेले, इंद्रियगोचर बनलेले विश्व हेच अव्यक्त परमतत्त्वाचे आद्य प्रगटन होय. अव्यक्त असणाऱ्या परमतत्त्वाचे आकलन साधकाने करून तरी कसे घ्यावे, या प्रश्नाचे उत्तर गवसते ते इथे. प्रतिक्षणी अनुभवास येणारे जग हेच जगदीश्वराचे आद्य प्रगटन असल्यामुळे त्याच्या आकलनाचे माध्यमही तेच. हे सूत्र अचूकपणे हेरले ते आमच्या तुकोबांनी. विठ्ठलरूपातील विष्णुतत्त्वाला नमन करत असताना, तुकोबाराय प्रथम उद्गार करतात तो विष्णुतत्त्वाच्या आद्यनामरूपाचा- ‘‘नमो विश्वरूपा विष्णु मायबापा। अपारा अमुपा पांडुरंगा।।’’ हे महाराजांचे शब्द म्हणजे ‘विष्णुसहस्रानामा’च्या हृद्गताचे जणू लघुरूपच!

agtilak@gmail.com