अभय टिळक

‘बहिणाबाई’ म्हटले की बुचकळ्यात पडायला होते. नेमक्या कोणत्या बहिणाबाईंबद्दल बोलतो आहोत याचा अनेकदा उलगडा होत नाही. त्याला कारणही तसेच आहे. गेल्या काही पिढय़ांना ठाऊक असणाऱ्या बहिणाबाई म्हणजे कवी सोपानदेव चौधरी यांच्या मातोश्री. ‘अरे संसार संसार’ वा ‘मन वढाय वढाय’सारख्या अवीट रचनांच्या निर्मिक म्हणून बहिणाबाई चौधरी आपल्या परिचयाच्या असतात. परंतु या ठिकाणी आपण बोलतो आहोत ते तुकोबाशिष्या बहिणाबाई यांच्याबद्दल. तुकोबांचे वैकुंठगमन होण्याआधी दोनएक वर्षे बहिणाबाई सहकुटुंब देहूत वास्तव्यास होत्या. राहत्या घरातील आनंदओवरीत भजनात निमग्न तुकोबा शब्दबद्ध केले बहिणाबाईंनी. स्वप्नामध्ये येऊन तुकोबांनी आपल्याला अनुग्रह दिल्याचेही बहिणाबाई नमूद करतात. ‘तुकोबा केवळ पांडुरंग’ अशा विलक्षण प्रत्ययकारीतेने तुकोबांचा आध्यात्मिक अधिकार समाजमनाला सांगणारे साक्षात्कारसंपन्न व्यक्तिमत्त्व म्हणून भागवतधर्मी संतपरंपरेत मान्यता लाभलेल्या बहिणाबाईंचे जीवनवृत्त असाधारण म्हणावे असेच. वेरूळनजीकच्या देवगाव या आडगावात १६२८ साली जन्मलेल्या बहिणाबाईंचे लग्न त्यांच्या आईवडिलांनी लावून दिले ते ३० वर्षे वयाच्या बिजवराशी. त्यानंतर लगोलग या कुटुंबाच्या नशिबी आले देशाटन व भ्रमंती. वयात प्रचंड अंतर असणारा बहिणाबाईंचा नवरा तापट आणि संशयी. त्यामुळे संसारात बहिणाबाईंना मन:स्वास्थ्य काही लाभलेच नाही. मात्र, विरक्तीचे लेणे उपजतच ल्यालेल्या बहिणाबाईंनी तुकोबांचा आशीर्वाद व अंत:प्रेरणेने केलेल्या साधनेच्या बळावर मोठा पारमार्थिक अधिकार प्राप्त करून घेतला. गीता-भागवताच्या सुरात सूर मिळवत परंपरेत प्रवाही राहिलेल्या अद्वयबोधाच्या अनुभूतीची अधिकारसंपन्नता बहिणाबाईंच्या अभंगकळेत स्वच्छपणे प्रतिबिंबित होते. ‘अभेदूनी भेद स्थापिला पै अंगी। वाढवावया जगी प्रेमसुख’ हे बहिणाबाईंचे यासंदर्भातील उद्गार प्रचंड अन्वर्थक होत. अद्वयदर्शनाच्या बोधसंचिताचा आगळा आयाम बहिणाबाईंनी इथे कमालीच्या सहजतेने प्रकाशमान बनवला आहे. भक्तीचा उभा व्यवहार देव व भक्त यांचे पृथक अस्तित्व गृहीत धरल्याखेरीज साकारूच शकत नाही. उपासक व उपास्य दैवत यांच्यादरम्यानचा भेद हा भक्तीचा पाया होय, हे पारंपरिक भक्तिशास्त्राचे गाभासूत्र. मुळात एकल शिवतत्त्वच विश्वरूपाने नटले, प्रगटलेले असल्याने भेद ही संकल्पनाच तिथे अप्रस्तुत ठरते. अशा परिस्थितीत ‘भक्ती’ नामक व्यवहार साकारावा कसा, असा प्रश्न कोणी उपस्थित केलाच तर त्याला बहिणाबाई इथे उत्तर देतात. ‘भक्त’ व ‘भगवंत’ या उभयतांमध्ये नांदणाऱ्या अनाम, विशुद्ध प्रेमभावाची लज्जत चाखण्याची अमर्याद इच्छा दाटून आल्याने ते परमतत्त्वच ‘भक्त’ हे अस्तित्व धारण करून प्रगटले आणि प्रेमसुखाचा आकंठ आस्वाद घेऊ लागले. एकच तत्त्व ‘भक्त’ व ‘भगवंत’ अशा दोन्ही रूपांनी प्रगटले असल्याने दोन पृथक अस्तित्वे तर आहेत, पण भेद मात्र कणभरही नाही, असा भक्तीचा हा आगळावेगळा आविष्कार. एकत्वाला अणुमात्रही छेद जाऊ द्यायचा नाही, परंतु ‘भक्त’ व ‘भगवंत’ यांच्यातील नात्याचा गोडवा अनुभवत त्या प्रेमसुखाची महती विश्वामध्ये वाढविण्यासाठी अभेदाचे अधिष्ठान असणारा भेद प्रस्थापित करावयाचा, ही अद्वयदर्शनाची आद्यखूण सिद्ध करण्यात बहिणाबाईंचा अंतरंग अधिकार सामावला आहे. तुकोबांकडून लाभलेले सानुग्रह शिष्यत्व  बहिणाबाई सार्थ ठरवतात ते असे!

agtilak@gmail.com