– अभय टिळक

संतांच्या पादुका पालखीमध्ये मिरवत भजन करत पंढरीस जाण्याच्या आषाढवारीच्या परिपाठाचे जनक गणले जाणारे नारायण महाराज म्हणजे तुकोबारायांचे तिसरे चिरंजीव. तुकोबारायांच्या वैकुंठगमनाचे फाल्गुन वद्य द्वितीयेच्या दिवशी अगत्याने भक्तिभावपूर्वक स्मरण करण्याचा शिरस्ताही रूढ केला तो नारायण महाराजांनीच. तो काळ होता छत्रपती राजाराम महाराजांच्या अमदानीचा. बीजेच्या सोहळ्याप्रीत्यर्थ देहूनजीकचे येलवाडी हे गाव छत्रपती राजाराम महाराजांनी नेमून दिले. त्या इनामाची दरबारातून जी सनद जारी केली गेली तिच्यामध्ये ‘राजेश्री तुकोबा गोसावी’ असा तुकोबारायांचा करण्यात आलेला निर्देश अतिशय सूचक आणि सूक्ष्म होय. ‘गोसावी’ या तुकोबांना इथे बहाल केल्या गेलेल्या पदवीची उपपत्ती- ‘‘कामक्रोध बंदखाणी। तुका ह्मणे दिले दोन्ही। इंद्रियांचे धणी। आह्मी जालों गोसांवी।’’ अशा प्रकारे तुकोबांनीच त्यांच्या एका अभंगात विवरून कथन केलेली आहे. इंद्रिये ज्याच्या ताब्यात आलेली आहेत अशा जितेंद्रियाला ‘गोसावी’ ही उपाधी सार्थ शोभते, हेच तुकोबा स्वानुभवाने गर्जून सांगतात. या अर्थाने ‘गोसावी’पण हस्तगत करणे कमालीचे दुष्कर. त्याला कारणही तसेच आहे. मन कमालीचे चंचल, तर इंद्रिये मुळातच अवखळ. बुद्धी स्थिर करण्याच्या उपायांचा पूर्वटप्पा म्हणजे प्रथम बुद्धी शुद्ध करणे. त्यासाठी आधी मनादिक इंद्रिये आवरणे अगत्याचे ठरते. मन आणि शरीर एकदा का स्थिर झाले, की क्रमाक्रमाने त्यांचा पोत बदलू लागतो, असा दाखला पैठणनिवासी एकनाथ महाराजही- ‘‘एकांतीं स्थिरावल्या आसन। सहजें वाढे सत्वगुण।’’ इतक्या नितळ शब्दांत आपल्या पुढ्यात ठेवतात. इतस्तत: भटकणारी बहिर्मुख अशी मनादी इंद्रिये त्यासाठी प्रथम बनवावी लागतात अंतर्मुख. भरकटण्याला वाव मिळाला की मन आणि बाकीची इंद्रिये यांची युती होते, हे आपले अनुभवसिद्ध प्रमेय- ‘‘तपासी तें मन करूं पाहे घात। धरोनि सांगात इंद्रियांचा।’’ अशा नेमक्या शब्दांत तुकोबांनी स्पष्ट करून ठेवलेले आहे. मनरूपी घोड्यावर मांड ठोकून पंच ज्ञानेंद्रिये आणि पंच कर्मेंद्रिये चौफेर उधळतात. नियमन करण्यास सर्वाधिक अवघड इंद्रिय म्हणजे मन. गोपाळांसह गोकुळ-वृंदावनात क्रीडा करणाऱ्या बाळकृष्णाच्या बाळलीला वर्णन करणाऱ्या एका अभंगात तुकोबांनी बालकृष्ण आणि त्याचे सवंगडी यांच्या दरम्यानच्या लटक्या तक्रारीचा एक मनोहर प्रसंग शब्दांकित केलेला आहे. कृष्णा तुझ्या दहा गाई दहा दिशांनी धावत सुटतात, आवरता आवरत नाहीत, अशी तक्रार सवंगडी नंदनंदनाकडे करतात. बाकीच्या गाई वळून आम्ही कशा तरी कदंबाच्या तळाशी आणू, पण ती ‘मनेरी’ गाय मात्र आमच्या आवाक्यात येत नाही, तेव्हा तूच काय ते तिची राखण कर, असा त्या तक्रारीतील मुख्य सूर. हे रूपक कमालीचे स्पष्टच नाही का! उधळलेली मनादिक इंद्रिये गोळा करून एकत्र आणायची आणि पुन्हा अंतर्मुख बनवायची हे खायचे काम नाही. अष्टांगयोगातील ‘प्रत्याहार’ हा पाचवा योग त्यासाठीच आहे, असे ज्ञानदेवांचे सांगणे या संदर्भात मननीय ठरते. ‘‘तेव्हां प्रत्याहारें ख्याति केली। विकारांची सपिले बोहली। इंद्रियें बांधोनि आणिलीं। हृदया आंतु।’’ ही ‘ज्ञानेश्वरी’च्या नवव्या अध्यायातील ओवी प्रत्याहाराचे माहात्म्य प्रगट करते. स्थिर करण्यासाठी इंद्रिये बांधून अंतर्मुख करणे हा योगाचा गाभा. ‘(योगी) राजश्री’ आणि ‘गोसावी’ ही दोन्ही संबोधने तुकोबांना सार्थपणे शोभून दिसतात ती हा योग त्यांना साधलेला असल्यामुळेच!

agtilak@gmail.com