अभय टिळक

निवृत्तिनाथांपासून ते निळोबारायांपर्यंतच्या भागवतधर्मी संतांच्या विचाराकाशात सर्वत्र अद्वयानंदाच्या चांदण्याची पखरण झालेली अनुभवास येते. मुळामध्ये काश्मीरमध्ये उदयास आलेल्या शैवमताच्या या प्रवाहाचा परिचय, श्रीमद्भगवद्गीतेवर भाष्य करण्याच्या निमित्ताने ज्ञानदेवांनी मराठी समाजमनाला प्रथम घडविला तो ‘ज्ञानेश्वरी’तून. त्यामुळे, शांभवाद्वय तत्त्वविचाराचे अनंत कवडसे ‘ज्ञानेश्वरी’च्या अंतरंगात गवसतात. भगवान शंकरांपासून प्रसवलेला बोधाचा तो सारा पसारा, मग, योगीराज चांगदेवांना उद्बोधन करण्याच्या निमित्ताने ‘चांगदेवपासष्टी’च्या रूपाने सूत्रमय शैलीत ज्ञानदेवांनी सादर केल्याचे ध्यानात येते. तर, त्याच शांभवाद्वयाच्या तत्त्वबोधाचे कमालीचे काव्यमय, रूप ‘अमृतानुभवा’च्या माध्यमातून सहस्रदल कमलाप्रमाणे उमलून येते. प्रथम ‘ज्ञानेश्वरी’, मग ‘चांगदेवपासष्टी’ आणि पुढे ‘अमृतानुभव’ अशा तीन टप्प्यांमधून अद्वयानंदाच्या तत्त्वज्ञानाचा ओघ प्रवाहित राहतो. अद्वयाच्या समग्र विचारव्यूहाचा परिचय करून घेण्याच्या या तीन पायऱ्यांच जणू. शैवागमाचे बीजारोपण घडून आलेले आहे ते शिवसूत्रांमध्ये. परंतु, अमृतानुभव म्हणजे शिवसूत्रांचा अनुवाद होय, असे मात्र अजिबातच नाही. नाथपरंपरेतील शैवागमाचा गाभा, श्रीमद्भगवद्गीतेच्या माध्यमातून हस्तगत होणारा भागवत धर्मविचार आणि मराठी भूमीमध्ये संजीवन असलेला विठ्ठलभक्तीचा झरा यांच्या समन्वयाद्वारे ज्ञानदेवांनी त्यांच्या तत्त्वदर्शनाची पायाभरणी केलेली दिसते. हा संगम साकारण्यामध्ये ज्ञानदेवांच्या ठायी वसणारे संतत्व प्रकर्षांने प्रतीत होते. अ-लक्षित, उपेक्षित, दुर्बळ आणि हीनदीन अवस्थेमध्ये जीवन कंठणाऱ्या विविध समाजघटकांना जगण्याची ऊर्मी आणि स्वायत्त अशी आत्मखूण प्रदान करण्यासाठी जगाबद्दलचे एक पर्यायी आकलन सिद्ध करणे समकालीन समाजवास्तवाच्या पार्श्वपटावर ज्ञानदेवांना  अनिवार्य वाटल्याने तत्त्वप्रवाहाच्या उपरोक्त तीन धारांचा संगम घडवण्यास ते सिद्ध झाले असले पाहिजेत, असा कयास बांधता येतो. रज्जुसर्पन्यायाच्या परिभाषेऐवजी, म्हणूनच, ज्ञानदेवांना सागर आणि सागरलाटांच्या परस्पराश्रयी क्रीडेचे प्रारूप जीव, जगत आणि जगदीश्वर यांच्या नात्याचे विवरण करण्याच्या दृष्टीने उचित वाटावे, हे समजण्यासारखे आहे. ‘अमृतानुभवा’च्या पहिल्या प्रकरणातील एक ओवी या संदर्भात मननीय ठरते. ‘अहो ऐक्याचे मुदल  न ढळे । आणि साजिरेपणाचा लाभु मिळे । तरी स्वतरंगाची मुकुळे । तुरंबु कां पाणी’ ही ती ओवी.  सागर आणि त्याच्या  लाटा म्हणजे वस्तुत: पाणीच. तत्व एकच परंतु त्याचे आविष्करण मात्र दुपेडी. निखळ अद्वयाचे हे पूर्णदर्शन. लाटारूपाने प्रगटल्याने पाण्याचे ‘पाणी असणे’ काही लोपत नाही. सागराचे पाणीच लाटेच्या रूपाने नर्तन करत असल्याने तिथे द्वैताचा शिरकाव होण्यास वावच नाही. परिणामी, ऐक्याच्या सोहळ्यास बाधा येण्याचा प्रश्न येतोच कोठे? सामरस्याला तडा न जाऊ देता नटण्याचा सुखानंद अनुभवायला मिळणार असेल तर लाटांच्या फुलांचे वा कळ्यांचे गजरे माळून समुद्राने मजेत का मिरवू नये, असे ज्ञानदेवांचे प्रतिपादन होय. अगदी याच न्यायाने, जगद्रूपाने नटून नानाविध माध्यमांद्वारे स्वत:चीच अनुभूती अनंत परीने घेण्यातील आनंद (मुदल) परतत्त्वाने का भोगू नये? आनंदात राहणे हेच प्रत्येकाचे अंतिम ध्येय नव्हे का? मग तो जीव असो अथवा शिव !

agtilak@gmail.com